साखरखेर्डा (अशोक इंगळे) – येथे सालाबादाप्रमाणे याहीवर्षी मोहरम मिरवणूक निघाली. माळीपुर्यात राम मंदिराजवळ मिरवणूक पोहोचल्यानंतर अचानक दगडफेक सुरू झाली. या दगडफेकीत १० ते १२ जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. उपरोक्त घटना ही १८ जुलैरोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. सद्या गावात तणावपूर्ण शांतता असून, मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.
साखरखेर्डा येथील मोहरम मिरवणूक दुपारी तीन वाजता गुजरी चौकातून निघाली. रोहीलपुरा, माळीपुरा आणि गरीब शहा बाबा दर्गा येथे (भोगावती नदीवर) विसर्जन होणार होती. मिरवणूक माळीपुर्यातून जात असताना अचानक दगडफेक सुरू झाली. नेमकी कुणी दगडफेक सुरू केली हे कळत नव्हते. तथापि, दगडफेक सुरू होताच पळापळ सुरु झाली. यात माजी सरपंच कमलाकर गवई, माजी सरपंच दाऊदशेठ कुरेशी, माजी उपसरपंच आयुबसेठ कुरेशी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम जाधव यांच्यासह १० ते १२ जण जखमी झाले. पोलीसांनी तातडीने आश्रुधुराची नळकांडी फोडून जमाव पांगवला. त्यानंतर एका बाजूने हातात लाठ्याकाठ्या घेऊन काही युवक रस्त्यावर उतरले. परंतु, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्वप्निल नाईक, रवी सानप आणि पोलीसांनी युवकांना पिटाळून लावले. ही वार्ता संपूर्ण गावात पसरताच संपूर्ण व्यापारी बाजारपेठेतील सर्व दुकाने पटापट बंद झाली. गुजरी चौकात पोलिसांनी तातडीने तगडा पोलीस बंदोबस्त लावला असून, माळी पुर्यातही पोलीस कुमक वाढविण्यात आली आहे. बसस्थानक परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी परिस्थितीची माहिती घेऊन मेहकर, बिबी, किनगावराजा, बुलढाणा येथून राखीव पोलीसदल पाठवून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले आहे. वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
माळी पुर्यात मिरवणूक आली असता, मंदिरासमोरून पुढे गेली होती. त्यातील काही मुलांचे आपसातच भांडण झाल्याने गिट्टीचे दगड एकमेकांवर भिरकावले. ते दगड मंदिराच्या परिसरातील मुलांना लागल्याने ते आपणावरच दगडफेक करीत आहेत, असा संभ्रम निर्माण झाल्याने दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी सरपंच सुनील जगताप यांनी दिली.
———