BULDHANAHead linesSINDKHEDRAJAVidharbha

साखरखेर्ड्यातील मोहरम मिरवणुकीतील दगडफेकप्रकरणी ३४ युवकांवर गुन्हे दाखल; ११ युवकांना अटक

– जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी घेतली शांतता कमेटी सदस्यांची बैठक; दंगलखोरांवर कठोर कारवाईचे आश्वासन

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – काल मोहरम मिरवणूक शेवटच्या टप्प्यात असताना अचानक दगडफेक झाल्याने १० ते १२ व्यक्ती जखमी झाले. या दगडफेकीत पोलीस वाहनाचेही नुकसान झाले असून, दगडफेक, दंगलसदृश परिस्थिती निर्माण करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी ३४ युवकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी ११ युवकांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आज, दि. १९ जुलैला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी परिस्थितीची माहिती घेऊन या दंगलीमागे कोण आहे, याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, आणि गावात शांतता प्रस्थापित कशी होईल, यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना पोलिसांना केली आहे.

काल, दि. १८ जुलैला गुजरी चौकातून मिरवणूक जात असताना मिरवणुकीतील काही युवक आरडाओरड करीत, या हुसेन या हुसेन असे नारे देत व इतर समाजाच्या भावना दुखावल्या जातील, असे हातवारे करून चिथावणीसारखे इशारे करीत होते. मिरवणुकीत काही गडबड होऊ नये, म्हणून पोलिसांनी युवकांना पुढे जाण्याची विनंती केली. मिरवणूक पुढे गेल्यानंतर पुन्हा काही युवक मागे पळत लोटपाट करीत मंदिराच्या ओट्यावर पडले. त्यांना तातडीने तेथून हटवित असताना अचानक मिरवणुकीच्या दिशेने विटा व गिट्टीचे खडे फेकून मारले. यात १० ते १२ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तर पोलीस टाटा मोटार वाहन क्रमांक एमएच २७ ए ९५५६ ची समोरील काच फोडून नुकसान केले. अशी फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन प्रतापराव जाधव यांनी दिली. या तक्रारीवरून राहुल नन्हई, हर्षल खरात, आकाश निकम, गोपाल रमेश इंगळे, सूरज सुभाष जैस्वाल, उमेश गणेश नगरकर, धर्मा रामा मंडळकर, कार्तिक विनायक शहाणे, महेश खरात, नंदू मंडळकर, जगदीश जगताप, मोहन वाघमारे, योगेश नन्हई, गुड्डू इंगळे, नीलेश रमेश मोरे, दत्ता जगताप, प्रफुल्ल राजू अवचार, सोनू दसरे, वसीम कुरेशी, समीर काझी, दानिश कुरेशी, जहीर शहा, जाबाज शहा, राजू सय्यद, फस्सी इलियास काझी, बबलू पठाण, शेख अर्शिद, शेख आरीफ, शेख आसीफ शेख युसूफ, जिल्लू कुरेशी, अकीब पठाण, शेख आयुब शेख मुसा, सलीम शेख, शेख दानिश शेख अजीस व इतर युवकांवर अप क्रमांक १७०/२०२४ कलम १३२, १८९, (२),१९१(२), १९१(३), १९०, १२५, ३२४, (४), १२१, २२१ एनबीएस सहकलम १३५ सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही समाजातील उमेश नगरकर, कार्तिक शहाणे, महेश खरात, मोहन वाघमारे, गोपाल इंगळे, सागर दसरे, राहुल नन्हई, हन्नान शहा मन्नान शहा, मेहबूब शहा रहीम शहा, तैहनिज शहा अकील शहा, शेख रिजवान शेख आयुब या ११ युवकांना करण्यात आलेली आहे.
आज केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी आज साखरखेर्डा येथे येऊन परिस्थितीचा आढावा घेतला, आणि जे व्यक्ती नेहमी नेहमी वाद उकरून काढून दोन्ही समाजातील भावना दुखावण्याचा प्रयत्न करतात, अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करा, आणि नेहमी नेहमी साखरखेर्ड्यात तणाव निर्माण होणार नाही, यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलावीत, अशी सूचना यावेळी मंत्रीमहोदयांनी केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, ठाणेदार स्वप्निल नाईक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राम जाधव, माजी समाजकल्याण सभापती बाबुराव मोरे, सरपंच सुनील जगताप, भाजपा नेते रावसाहेब देशपांडे , तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष मंडळकर, संदीप मगर, बाबुसेठ कुरेशी , रामदाससिंह राजपूत, माजी सरपंच कमलाकर गवई आदी उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दुपारी एक वाजता साखरखेर्डा येथील राम मंदिर परिसरात जाऊन पाहणी केला. त्यांनतर शांतता कमेटी सदस्यांची बैठक घेऊन यातील आरोपींचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!