चिखली (महेंद्र हिवाळे) – धोत्रा भणगोजी या गावातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतीच्या वादातून सख्ख्या पुतण्याने ५५ वर्षीय काकाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना चिरडले. ३५ वर्षीय पुतण्या इतका हैवान झाला होता, की काका तडफडत असताना त्याला त्यांची अजिबात दयामया आली नाही. त्यामुळे काकाने जागीच जीव सोडला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडालेली आहे.
सविस्तर असे, की धोत्रा भणगोजी येथील जर्नाधन तुकाराम जोशी (वय ५५) व समाधान उत्तम जोशी (वय ३५) या काका पुतण्यात शेतजमिनीवर गेल्या पाच ते सहा वर्षांपासून वाद आहेत. दोघांचेही शेत एकमेकांना लागून असून, एकाची जमीन दुसर्याकडे थोडी जास्त असल्याने त्यांच्यात सातत्याने भांडणे होत होती. आज दुपारी जनार्धन जोशी हे शेतात काम करत असताना, पुतण्या त्याच्या शेतात ट्रॅक्टर चालवत होता. यावेळी दोघांत जमिनीवरून पुन्हा वाद झाला. परंतु, काका जर्नाधन जोशी हे तेथून जात असताना पुतण्या समाधान याने पाठमोर्या काकावर भरधाव वेगाने येत ट्रॅक्टर घातला. जर्नाधन जोशी हे ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडले गेले. यावेळी ते तडफड करत असताना त्यांची काहीच दयामाया पुतण्याला आली नाही. त्यामुळे जर्नाधन जोशी यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणाची माहिती मिळताच अमडापूरचे ठाणेदार सचिन पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात पाठवून दिला. आरोपी समाधान जोशी याच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात येत होते. अधिक तपास अमडापूर पोलिस करत आहेत.
———-