चिखली (तालुका प्रतिनिधी) – छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा हा अस्मितेचा सोहळा होता. तरूणपिढीसमोर शिवरायांचा आदर्श प्रस्तुत करताना शिवरायांचे चरित्र हे तरूणपिढीमध्ये रूजविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मराठा सेवा संघ तथा ‘शिवधर्मा’चे संस्थापक शिवश्री पुरूषोत्तम खेडेकर यांनी केले. येथील राधाबाई खेडेकर विद्यालय येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खेडेकर हे बोलत होते.
या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यास पंजाबराव देशमुख शिक्षक कक्षाचे प्रवक्ते अशोक ढोणे, संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष शिवश्री पांडुरंग पाटील, डॉ. सत्येंद्र भुसारी, राधाबाई खेडेकर विद्यालयाचे प्राचार्य शिवश्री सुनील बिडवे सर यांच्यासह शहाजीराजे विद्यालय उदयनगरचे प्राचार्य चेके सर, संभाजीराजे विद्यालय केळवदचे मुख्याध्यापक सुनील देशमुख, स्वराज्य शिक्षक संघाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष तथा कै. भास्करराव शिंगणे हायस्कूल, मंडपगाव-चिंचखेडचे मुख्याध्यापक शिवश्री प्रवीण मिसाळ, सूर्यभानबापू खेडेकर विद्यालय खैरवचे मुख्याध्यापक समाधान खरात, राजर्षी शाहू विद्यालय दहीगावचे मुख्याध्यापक शिंदे सर, ताराबाई शिंदे प्राथमिक शाळा चिखलीचे मुख्याध्यापक अंभोरे सर, सूर्यभानबापू पाटील खेडेकर प्राथमिक शाळा चिखलीचे मुख्याध्यापक राठोड सर, माजी गटशिक्षणाधिकारी खेडेकर साहेब, आरमाळ साहेब आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना शिवश्री पुरूषोत्तम खेडेकर यांनी शिक्षण व्यवस्था, छत्रपतींचे चरित्र व कार्य, आणि विचार यासह प्राप्त परिस्थितीवर प्रखडपणे भाष्य केले. या कार्यक्रमाला सर्व बालवाडी, कॉन्व्हेंट शिक्षक, शिक्षिका, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. रवींद्र साळवेसर यांनी केले.
—————–