डॉ. राजेंद्र शिंगणेंसह पाच आमदारांची अजितदादांच्या बैठकीकडे पाठ?
– अनेक आमदारांना लागले घरवापसीचे वेध : सूत्रांची माहिती
मुंबई (खास प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीच स्थापन केलेला पक्ष फोडून, त्यांच्याच विरोधात बंड पुकारणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता चांगलेच बॅकफूटवर गेले आहेत. शरद पवारांनी १० पैकी ८ खासदार हे निवडून आणले. तर दुसरीकडे अजित पवारांचा एकच खासदार निवडून आला. अजित पवार हे त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनाही निवडून आणू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये आता चलबिचल सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, अजितदादांनी बोलावलेल्या बैठकीला पाच आमदारांनी विविध कारणे सांगून दांडी मारली असल्याची बाब उघडकीस आली असून, त्यात डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह धर्मराव बाबा आत्राम, नरहरी झिरवळ, सुनील टिंगरे, आण्णा बनसोडे यांचा समावेश असल्याची माहिती आहे. याबाबत शिंगणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.
लोकसभा 2024 च्या निवडणुकीनंतर आज अजित पवार यांच्या नेतृत्वात मुंबईतील ट्रायडन्ट हॉटेलमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट)च्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत पराभव झाला तरी चालेल, पण अजित पवार यांची साथ सोडणार नाही, असे आमदारांनी एकमताने निर्धार केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कुठलाही आमदार शरद पवार यांच्या पक्षातील आमदारांच्या संपर्कात नसल्याची ग्वाहीदेखील बैठकीला उपस्थित असणाऱ्यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर आणि जनतेचा भाजपसहित त्यांच्या मित्रपक्षांवर असेलला रोष पाहता, तसेच जनतेच्या न्यायालयात ‘खरी राष्ट्रवादी’ ही शरद पवार यांचीच असल्याचे सिद्ध झाल्यानंतर अजितदादांच्या आमदारांमध्ये कमालीची अस्वस्थता पहावयास मिळत आहे. निवडणुकीनंतर अजित पवारांनी त्यांच्या गटाच्या मंत्र्यांची ‘देवगिरी’ या आपल्या शासकीय बंगल्यावर बैठक घेतली. त्यानंतर सर्व आमदारांची मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला धर्मराव बाबा आत्राम, नरहरी झिरवळ, सुनील टिंगरे, आण्णा बनसोडे आणि राजेंद्र शिंगणे या आमदारांची अनुपस्थिती होती. तथापि, या बैठकीला दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, अनिल पाटील, आदिती तटकरे, संजय बनसोडे, आनंद परांजपे, रामराजे निंबाळकर आदी नेते मात्र हजर होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा भोपळा फुटला असला, तरी केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. याच पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी पवारांनी ही तातडीची बैठक बोलावली होती. दरम्यान, केंद्रातील एनडीएच्या सरकारमध्ये अजित पवारांच्या वाट्याला एक मंत्रीपद तर शिवसेनेच्या वाटेला एक राज्यमंत्री आणि एक कॅबिनेट पद येण्याची शक्यता आहे. ७ आणि ८ तारखेला अजित पवार हे दिल्लीत एनडीएच्या बैठकीला जाणार असून, नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत, असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा, आमदार तुमच्या संपर्कात आहेत का? असा प्रश्न पत्रकारांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना केला. यावर जयंत पाटील यांनी एका वाक्यात उत्तर दिले. सध्या माझ्या मोबाईलचा वापर वाढला आहे एवढंच सांगतो, असे सूचक विधान पाटलांनी केले. त्यामुळे अजित पवार गटातील काही आमदार घरवापसीच्या तयारीत असल्याची चर्चा मुंबईत रंगली होती. पक्षात आऊटगोईंग होणार असल्याच्या चर्चेनंतर अजित पवारही अॅक्शन मोडवर आलेत. आपल्या आमदारांच्या त्यांनी बैठकाही घेतल्यात. मात्र लोकसभा निकालात झालेला पराभव, शरद पवारांना मिळालेले यश, त्यामुळे आपल्या आमदारांना एकसंध ठेवण्याचे मोठे आव्हान अजितदादा पवार यांच्यासमोर आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर ४० हून अधिक आमदार हे अजित पवारांसोबत गेले होते. असे असले तरी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शरद पवारांना मोठे यश मिळाले. शरद पवारांनी १० पैकी ८ खासदार हे निवडून आणले. तर दुसरीकडे अजित पवारांचा एकच खासदार निवडून आला. अजित पवार हे सुनेत्रा पवारांनाही निवडून आणू शकले नाहीत.