ChikhaliHead linesVidharbha

चिखलीतून प्रा. खेडेकरांना १२ हजारांचे मताधिक्क्य; आ. श्वेताताईंसाठी धोक्याची घंटा!

बुलढाणा/चिखली (संजय निकाळजे) – बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीचे प्रतापराव गणपतराव जाधव यांनी बाजी मारली. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रा. नरेंद्र खेडेकर आणि रविकांत तुपकर यांना हा निकाल धक्का देणारा ठरला. शेवटपर्यंत आपण निवडून येऊ, अशी आशा असणारे महाविकास आघाडीचे प्रा. खेडेकर यांना मात्र, सत्ताधारी पक्षाच्या आमदार असतानासुद्धा चिखली विधानसभा मतदारसंघात ११ हजार ९२० मतांची आघाडी मिळाली. प्रा. खेडेकरांना चिखली मतदारसंघातून झालेले मतदान हे भाजपच्या आमदार श्वेताताई विद्याधर महाले पाटील यांच्यासाठी मोठी धोक्याची घंटा ठरणारे आहे. विशेष म्हणजे, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनादेखील याच मतदारसंघातून प्रतापराव जाधव यांच्या खालोखाल मते मिळालेली आहेत. घाटाखालील भाजपचे आमदार आकाश फुंडकर व संजय कुटे यांच्या जळगाव जामोद व खामगाव मतदारसंघातून ‘लीड’ मिळाल्यामुळेच प्रतापराव जाधव हे चौथ्यांदा खासदार होऊ शकलेत. दुसरीकडे, भाजपच्या आमदार श्वेताताई महालेंच्या मतदारसंघात मात्र जाधव हे दुसर्‍या क्रमांकवर राहिलेत.

सतत तीन विधानसभा आणि तीन वेळेस लोकसभा निवडणूक जिंकणार्‍या खा. प्रतापराव जाधव यांनी सलग सातव्या निवडणुकीत विजयाची परंपरा कायम ठेवत, आपणच विकासपुरुष असल्याचे दाखवून दिले. या निवडणुकीत नेहमीप्रमाणे खा. प्रतापराव जाधव यांना घाटाखालील खामगाव आणि जळगाव जामोद या विधानसभा मतदारसंघाने प्रचंड मताधिक्य दिले. याउलट चिखली विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या आमदार श्वेताताई महाले यांच्या मतदारसंघात प्रा. नरेंद्र खेडेकर हे पहिल्या क्रमांकावर राहिले. चिखली विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना ४९ हजार २४४ मते मिळाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडकर यांना ६१ हजार १४४ मते मिळाली. अपक्ष लढणारे रविकांत तुपकर यांना ४४ हजार ५१५ मते मिळाली. म्हणजे, तब्बल ११ हजार ९२० मतांची आघाडी प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी घेतली. सत्तेत असणार्‍या भाजप पक्षाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांचा हा मतदारसंघ असतानासुद्धा, येथे महायुतीचे उमेदवार खा. जाधव यांचे मतदान घटले तर महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. खेडेकर यांनी बाजी मारली. तसेही प्राध्यापक नरेंद्र खेडेकर हे याच मतदारसंघातील रहिवासी असल्यामुळे आणि चिखली तालुक्यातील सवणा जिल्हा परिषद सर्कलमधून ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले असताना, त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम सभापती, त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदाची कारकीर्द गाजवली होती. त्यांनी निर्माण केलेला जनसंपर्क व विकासकामे त्यांच्यासाठी आता जमेची बाजू ठरली आहे. त्यामुळे चिखली विधानसभा मतदारसंघात त्यांचे मताधिक्य वाढणे स्वाभाविक आहे.
असे असले तरी सध्या सत्ताधारी पक्षाच्या श्वेताताई महाले ह्या चिखली मतदार संघाच्या आमदार आहेत, व त्यांच्याच पक्षाशी युती केलेल्या शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे महायुतीकडून उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक रिंगणात होते. त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट), पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) हेसुद्धा महायुतीमध्ये सहभागी आहेत. यातील पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) जिल्हाध्यक्ष (दोन्ही गवई)सुद्धा याच मतदारसंघातील रहिवासी असल्याने महायुतीच्या उमेदवारापेक्षा महाविकास आघाडीच्याच उमेदवाराला चिखली विधानसभा मतदारसंघात मतांची आघाडी मिळणे म्हणजे एक चिंतनीय बाब म्हणावी लागेल. त्यामुळे आता पाच ते सहा महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येणार्‍या काळात या माध्यमातून विविध घडामोडीसुद्धा या निमित्ताने घडू शकतात, अशी चर्चा कालपासूनच चिखली विधानसभा मतदारसंघात मतदारांमध्ये होऊ लागली आहे, हेही तितकेच खरे..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!