९ जूनला ‘एनडीए’ सरकारचा शपथविधी; नरेंद्र मोदी तिसर्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ!
– मंत्रिपदाच्या वाटपांबाबत भाजपच्या सहयोगी पक्षांशी वाटाघाटी सुरू!
– केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रपतींना नवीन खासदारांची यादी व राजकीय पक्षांच्या संख्याबळाबाबत अहवाल सादर
नवी दिल्ली (आवेश तिवारी) – स्वबळावर बहुमतापासून दूर असलेल्या भारतीय जनता पक्षाने सहयोगी पक्षांच्या सहाय्याने केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, आता मोदी नव्हे तर ‘एनडीए’चे सरकार अस्तित्वात येणार असून, नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची येत्या ९ तारखेला शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याला शेजारील राष्ट्रे बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका यांचे प्रमुख हजर राहणार आहेत. दरम्यान, मोदी यांना लोकसभेत धारेवर धरण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची इंडिया आघाडीने विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे लोकसभेत मोदीविरूद्ध राहुल गांधी असा जोरदार ‘सामना’ नजीकच्या काळात पहायला मिळणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना लोकसभा निवडणुकीचा अहवाल सादर केला आहे. तसेच, नवनियुक्त खासदार आणि राजकीय पक्षाचे संख्याबळ याबाबतदेखील आपला अहवाल सुपूर्त केला आहे. बहुमतप्राप्त पक्षाच्या नेत्याला पंतप्रधानपदासाठी शपथ घेण्याकरिता राष्ट्रपती हे पाचारण करतील, असे घटनात्मक संकेत आहेत.
लोकसभा निवडणुकीत केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही एका राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त झालेले नाही. भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून, या पक्षाला २४० जागा मिळालेल्या आहेत. तर सरकार स्थापन करण्यासाठी २७२ जागांची मॅजिक फिगर आहे. तथापि, भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएला २९२ जागा मिळालेल्या आहेत. त्यात चंद्रबाबू नायडू यांच्या नेतृत्वातील तेलुगू देसम पक्षाचे १६ खासदार असून, नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे १२ खासदार आहेत. तर एकनाथ शिंदे गटाचे ७ खासदार आहेत. या सहयोगी पक्षांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा दिलेला आहे. त्यासाठी या सहयोगी पक्षांना कोणती व किती मंत्रिपदे द्यायची, त्यांच्या अटी काय आहेत, याबाबत राजनाथ सिंह, अमित शाह व जेपी नड्डा हे भाजपचे नेते चर्चा करत आहेत. दरम्यान, नरेंद्र मोदी हे लवकरच सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रपतींकडे दावा दाखल करणार असून, ते ९ जूनरोजी पंतप्रधान पदाची राष्ट्रपती भवनात शपथ घेणार आहेत, अशी माहिती राजकीय सूत्राने दिली आहे. या शपथविधी सोहळ्याला बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना, नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल हे येणार आहेत. तसेच, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रनील विक्रमसिंघे यांनीही या सोहळ्यासाठी येण्याचे कबुल केलेले आहे.
‘एनडीए ‘सरकारचा शपथविधी ९ जूनला सायंकाळी सहा वाजता होणार असून, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला असल्याचे सूत्राने सांगितले. नरेंद्र मोदी यांना पहिल्यांदाच आघाडीच्या सरकारचे नेतृत्व करावे लागत असून, भाजपला स्पष्ट बहुमत नसल्याने तब्बल १४ राजकीय पक्षांच्या सहाय्याने मोदी तिसर्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. भाजपच्या २४० जागांव्यतिरिक्त या १४ पक्षांचे ५३ खासदार आहेत. तेलुगू देसम पक्षाने लोकसभेचे सभापतीपद व पाच महत्वाची मंत्रालये मागितली असून, जनता दलाची नजर रेल्वे, कृषी मंत्रालयासह बिहार राज्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज मिळवण्यावर आहे. तसेच, अमित शाह यांना गृहमंत्रीपद देण्यासही सहयोगी पक्षांचा विरोध असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे मोदींना हे सरकार चालवताना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
———