नंदूरबार (आफताब खान) : जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अंबाबारी येथील देहली नदीवरील देहली मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने ओव्हरफ्लो होण्यास सुरुवात झाली आहे. देहली मध्यम प्रकल्पाच्या धरण व पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सद्यस्थितीत पाणीपातळी 197.70 मीटरची नोंद झाली आहे. प्रकल्पाच्या सांडव्यातून पाणी वाहण्यास सूरवात झाली आहे. एकंदरीतच मागील गेल्या 40 वर्षापासून रखडलेले काम यंदा पावसाळ्यापूर्वी युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात आले होते.
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील बहुचर्चित असा देहली मध्यम प्रकल्प प्रथम वर्षी पहिल्याच पावसात पूर्ण क्षमतेने भरला आहे. प्रकल्पात 19.08 दसलक्ष घन मिटर इतका जलसाठा उपलब्ध झाल्याने अक्कलकुवा तालुक्यातील शेतकरी व परिसरातील लगतच्या गावांना आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नसल्याने प्रशासन व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. देहली मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने परिसराततील ग्रामस्थांनी व नागरिकांनी अंबाबरी येथील देहली मध्यम प्रकल्पातून होणाऱ्या सांडव्याचे मनमोहक दृश्य बघण्यासाठी एकच गर्दी केल्याचे चित्र दिसून येत होते. परंतु, देहली काठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. असे आवाहन नंदूरबार जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.