– दोन गटांत तुंबळ हाणामारी, दोघे जखमी
चिखली (महेंद्र हिवाळे) – तालुक्यातील रायपूर पोलीस ठाणेहद्दीतील सातगाव भुसारी येथे काल, दि. २६ एप्रिलच्या रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास तरुणांच्या दोन गटात किरकोळ वादावरून लाठ्या-काठ्याने मारहाण होऊन दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी झालेल्या मारहाणीत दोघे तरुण जखमी झाले आहे. रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दुर्गेश राजपूत यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व बुलढाणा, चिखली आणि धाड येथून दंगाकाबू पथक, अतिरिक्त पोलीस कुमक बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणली. या दंगलप्रकरणी दोन्ही गटातील १८ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी आज (दि.२७) दुपारी ३ वाजता दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना कोर्टापुढे हजर केले असता, कोर्टाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे. दरम्यान, गावात बंदोबस्त कायम असून, कुणी कायदा हातात घेतला तर त्यांची गय केली जाणार नाही, असा खणखणीत इशारा ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी दिला आहे. काल मतदानाचे वातावरण होते, त्यामुळे पोलिसांनी वेळीच ही दंगल रोखून मोठा अनर्थ टाळला होता.
सविस्तर असे, की सातगांव भुसारी येथील दोन गटात मागील काही दिवसांपासून कुणकुण सुरू होती. अशात काल रात्री दोन्ही गट समोरासमोर आले व एकमेकांना जबर मारहाण केली. त्यामुळे गावातील शांतता बाधित होऊन दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणी रायपूर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी अनंता कळमकर यांच्या तक्रारीवरून दोन्ही गटातील दंगलखोरांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीच पोलिसांनी आरोपींचा शोध घेत १८ आरोपींना अटक केली आहे. गावात शांतता व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी बुलढाणा येथून दंगाकाबू पथक, तसेच चिखली, धाड पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांनीही गावात भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. रात्री अटक करण्यात आलेल्या सर्व १८ आरोपींना शनिवारी चिखली कोर्टात हजर केले असता त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीन मिळालेल्या आरोपींत विशाल रमेश गाडे, अमोल दत्तात्रय भुसारी, युवराज संजय काळे, ऋषिकेश अनिल भुसारी, अंकलेश गजानन भुसारी, सागर राजेन्द्र भुसारी, पंकज दिलीप भुसारी, विशाल गजानन ढगे, ऋषिकेश संजय सोनाळकर, रविन्द्र गणेश वाघ, स्वप्नील संजय मोरे, संजय सुखदेव मोरे, राहुल राजु मोरे, सुरज अरुण जाधव, सागर वसंता जाधव, गणेश सुरेश जाधव, राहुल प्रकाश इंगळे, प्रविण सखाराम हिवाळे यांचा समावेश असून, सर्व आरोपी हे सातगाव भुसारी गावातीलच आहेत. या सर्वांना कोर्टाने जामिनावर सोडले आहे.
ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी दिला इशारा…
यापुढे रायपूर पोलीस स्टेशन हद्दीत कुठल्याही गावात कोणत्याही व्यक्तीने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास तसेच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास त्याची पोलीस स्वतः दखल घेऊन अशाच प्रकारची कठोर कारवाई करतील, असा इशारा रायपूर ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी दिला आहे.
सदर घटनेत पोलिसांनी दखल घेऊन प्रभावी कारवाई केल्याने गावातील बरेच लोकांनी कारवाईचे समाधान व्यक्त केले आहे. कारण बऱ्याच गावातील तरुणाई यांचे वर्तन सध्याची परिस्थितीमध्ये गुन्हेगारी स्वरूपाचे होऊन त्यांचेत गट तट निर्माण झाले आहे. त्यातून सदर तरुणाई हे आमचा गट हा किती श्रेष्ठ व प्रभावी आहे असे दिखाऊपणा करण्याचा प्रयत्न करीत असतो व त्यातूनच बरेच वेळेचं गावातील विविध मिरवणूकमध्ये वाद विवाद होऊन शांतता भंग होत असते , तरी याबाबत रायपूर पोलिसांनी याबाबत वेळीच दखल घेऊन प्रभावी कारवाई केल्याने तरुणाईमध्ये पोलिसांचा वचक निर्माण झाला असल्याचे दिसून येत आहे.