BuldanaBULDHANAHead linesPolitical NewsPoliticsVidharbha

मतदानाची टक्केवारी घसरली; जिल्ह्यात 57.27 टक्के मतदान!

अपडेट

दरम्यान, रात्री उशिरा जिल्हाधिकारी यांनी मतदानाची अंतिम टक्केवारी कळवली. त्यानुसार, जिल्ह्यात 57.27 टक्के मतदान झाले असून, त्यामध्ये खामगाव विधानसभा मतदारसंघात 64.36 टक्के, चिखली 60.79 टक्के, जळगाव जामोद 49.55 टक्के, बुलढाणा 46.56 टक्के, मेहकर 61.14 टक्के, सिंदखेडराजा 61.00 टक्के असे एकूण 6 विधानसभा मतदार संघात 57.27 टक्के मतदान झाले आहे. यावर्षी मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता होती. पण, ती शक्यता फोल ठरली आहे.

– जिल्ह्यात सर्वाधिक चालला “पाना”; “मशाल” दुसर्‍या क्रमांकावर!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात यंदा सर्वात कमी मतदान नोंदवले गेले आहे. सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 57.27 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.  6 वाजेनंतरही अनेक मतदार रांगेत होते. मागीलवेळी (२०१९च्या लोकसभेसाठी) ५७ टक्के मतदान झाले होते, ते पाहाता यंदा मतदानाची टक्केवारी वाढण्याची आशा होती. परंतु, मतदारयाद्यात घोळ झाल्याने ही टक्केवारी घसरली असल्याचे जाणकारांचे मत आहे. मतदारयादीत मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे दिसून आले असून, प्रामुख्याने मुस्लीम भागात १५ ते २० व इतर भागात २० ते ३० टक्के मतदारांची नावे यादीत नसल्याचे किंवा ‘डिलीट’चा शिक्का असल्याचे दिसून आल्याने अनेक ठिकाणी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. अनेक मतदारांची नावे यादीत होती, परंतु त्यावर ‘डिलीटचा शिक्का’ असल्याने या मतदारांना मतदान करता आले नाही, त्यामुळे निवडणूक विभागाच्या अधिकार्‍यांनी ‘माती खाल्ली’, अशा संतप्त प्रतिक्रिया मतदारांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, जिल्हाभरात घाटाखाली व घाटावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनाच मतदान झाले असून, चोहीकडे ‘पाना’च चालला असल्याची माहिती आमच्या ठिकठिकाणच्या पत्रकारांनी दिली आहे. ‘पाना’ खालोखाल शिवसेना (ठाकरे) पक्षाचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या ‘मशाल’ चिन्हावर मतदान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात खरी लढत ही तुपकर व खेडेकर यांच्यातच झाल्याचे अनेक मतदारांनी आमच्या पत्रकारांशी बोलताना सांगितले.

जिल्हाभरात अनेक ठिकाणी पाऊस व वादळाचाही मतदान प्रक्रियेला तडाखा बसला. सकाळी संथगतीने सुरू झालेले मतदान सायंकाळपर्यंत अतिशय संथगतीनेच सुरू होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत फक्त ५२.२४ टक्के इतके सरासरी मतदान झाले होते. मतदानाची ही आकडेवारी थोडीफार वाढेल, असे निवडणूक अधिकार्‍यांनी सांगितले. ५ वाजेपर्यंत मेहकर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५८.७२, खामगाव ५५.८३, चिखली ५३.२१, जळगाव जामोद ४९.५५, बुलढाणा ४२.६७, सिंदखेडराजा ५३.२१ टक्के इतके मतदान झाले होते. सर्वात कमी मतदान बुलढाणा विधानसभा मतदारसंघात झाले होते. दरम्यान, मतदारयादीत मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे. त्यामुळे प्रामुख्याने मुस्लिम भागात ३० टक्के व इतर २० टक्के मतदारांची नावे यादीतच नाही. त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरणार आहे. बुथवरील एका यादीत नाव आहे, तर दुसर्‍या यादीत डिलीटचा शिक्का आहे. ही सर्व बाब निवडणूक निर्णय अधिकारी संबंधितांच्या लक्षात आणून दिली. परंतु काही उपयोग झाला नाही.त्याचे असंख्य पुरावे आमच्याकडे आहेत, अशी माहिती आझाद हिंद संघटनेचे अ‍ॅड. सतिशचंद्र रोठे यांनी दिली.


दरम्यान, चिखली तालुक्यातील साकेगाव मतदान केंद्रातही असाच अनुभव आला असल्याचे आमचे चिखली प्रतिनिधी महेंद्र हिवाळे यांनी कळवले आहे. साकेगांव केंद्रावर ११९४ एकूण मतदारांपैकी ६२•३१ टक्के मतदान झाले. तसेच, जे सद्या जीवंत मतदार आहेत त्यांना आपला हक्क बजावता आला नाही. काही मतदार रोजगारासाठी मुंबई, पुण्यात गेले आहेत. ते मतदानासाठी गावात आले असता, त्यांना मतदानाचा अधिकार बजावता आला नाही. त्यांची नावे मतदारयादीतून डिलीट केली असल्याचे सांगण्यात आल्याने, या केंद्रावर तीव्र संताप व्यक्त केला जात होता. निवडणूक विभागाच्या या बहुचर्चित गोंधळाबाबत शेकडो वंचित मतदारांनी भरउन्हात पायपीट करून निवडणूक अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून मदत मागितली. पण साँरी काही करु शकत नाही, म्हणून त्यांनी मतदारांची घोर निराशाच केली. परिणामी मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणावर घसरली, असल्याचा तीव्र संताप जिल्ह्यात व्यक्त होत होता. निवडणूक अधिकार्‍यांनी ‘माती खाल्ली’ व आमची नावे डिलीट केली, अशी प्रतिक्रिया संतप्त ग्रामस्थ देत होते.


दरम्यान, घाटाखाली व घाटावर अशा जिल्ह्याच्या दोन्ही भागात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना जोरदार मतदान झाले असून, जिल्ह्यात पानाच चालला, असल्याची प्रतिक्रिया मतदारांनी आमच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केल्या आहेत. तुपकर यांच्या खालोखाल शिवसेना (ठाकरे) पक्षाचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांना मतदान झालेले आहे, असेही सांगण्यात आले. तर विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे तिसर्‍या क्रमांकावर असल्याचे दिसून आले. येत्या ४ जूनरोजी निकाल हाती येणार असून, प्रत्यक्षात निकाल काय लागतो, याकडे आता जिल्हावासीयांच्या नजरा खिळलेल्या आहेत.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी सुरू असलेल्या मतदानादरम्यान मतदानयंत्र व व्हीव्हीपॅट नादुरुस्तीमुळे अनेक ठिकाणी मतदान खोळंबले होते. बुलढाणा शहरातील एका केंद्रावर अर्धा तास खोळंबा झाल्याने यंत्रणांची धावपळ झाली. यामुळे हजारो मतदारांची गैरसोय झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. दुपारी तीन वाजेपर्यंत मतदारसंघातील विविध केंद्रांवर २६ बॅलेट युनिट, १३ कंट्रोल युनिट, तर २५ व्हीव्हीपॅट नादुरुस्त झाल्यामुळे मतदानात खोळंबा निर्माण झाला होता. मात्र यंत्रणांनी पर्यायी संयंत्र लावल्यावर मतदान सुरुळीत झाले. दुसरीकडे प्रत्यक्ष मतदान सुरू करण्यापूर्वी केंद्राध्यक्ष मतदान मॉक ड्रिल घेतात. या तालीम दरम्यान २४ बॅलेट , १२ कंट्रोल युनिट तर २२ व्हीव्हीपॅट बिघडल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली होती. ही यंत्रे बदलून घेतल्यावर प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात करण्यात आली. बुलढाणा येथील बसस्थानक समोरील प्रशासकीय इमारत मतदान केंद्र क्रमांक १९९ येथील मतदान यंत्रात बिघाड झाला होता. परिणामी, मतदान खोळंबले. यामुळे मतदारांनी संताप व्यक्त केला. मोताळा तालुक्यातील कोराला बाजार व बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट केंद्रावरदेखील असाच प्रकार घडला होता.

राज्यात मतदानाचा टक्का घसरला; 53.71 टक्के मतदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!