- UPDATE
- लोकसभा निवडणूक २०२४च्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज २६ एप्रिल रोजी मतदान पार पडले. या टप्प्यात देशातील १३ राज्यातील ८८ लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. ज्यात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि केरळ आदी राज्यांचा समावेश होता. त्रिपूरातील एका जागेवर सर्वाधिक ६६.९७ टक्के इतके मतदान झाले. तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी ८ जागेवर अनुक्रमे ५३.१७ आणि ५३.७१ टक्के इतके कमी मतदान झाले.
- दरम्यान, शुक्रवारी सकाळी ७ वाजता दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली होती. दुसऱ्या टप्प्यात एकूण १२ राज्यातील मिळून ८८ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. महत्त्वाचे म्हणजे उन्हाचा पारा बघता अनेक ठिकाणी मतदानाची वेळ सायंकाळी ६ पर्यंत वाढवण्यात आली होती. महत्त्वाचे म्हणजे १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले होते. यावेळी देशभरातील १०२ मतदारसंघांत ६५.५ टक्के मतदान झाले होते.
– निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ, कुठे इव्हीएम बंद पडले तर कुठे अस्तित्वातील मतदारांचे नावे झालीत डिलीट!
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – राज्यातील आठ लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडले. सकाळी 7 वाजता सुरू झालेले मतदान काही ठिकाणी सायंकाळी सहा वाजेनंतरही सुरू होते. सकाळी धीम्यागतीने सुरू झालेल्या मतदानाची दुपारनंतर वेगाने सुरूवात झाली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 53.51 टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आय़ोगाने दिली आहे. देशातील 12 राज्यांत आज झालेल्या मतदानाची सर्वाधिक कमी टक्केवारी महाराष्ट्रात नोंदवली गेली आहे.
महाराष्ट्रातील अमरावती, नांदेड, परभणी, बुलढाणा, यवतमाळ-वाशिम, अकोला, वर्धा आणि हिंगोली या लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडले. एकूण 204 उमेदवारांचे भाग्य आज इव्हीएममध्ये सीलबंद झाले आहे. जवळपास 1.49 कोटी मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यात 77 लाख 21 हजार 374 पुरूष व 72 लाख 4 हजार 106 स्त्री मतदारांचा समावेश होता. तर 432 तृतीयपंथी मतदारांनीदेखील आपला हक्क बजावला. राज्यातील 16 हजार 589 मतदान केंद्रांवर हे मतदान शांततेत पार पडले. काही ठिकाणी इव्हीएम मशीन बंद पडल्याने गोंधळ उडाला होता. तर अनेक अस्तित्वातील मतदारांची नावे मतदार यादीत डिलीट असल्याचे नमूद असल्याने अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. राज्यातील सर्वाधिक मतदान हे वर्ध्यात 56.66 टक्के इतके नोंदवले गेले असून, बुलढाण्यात सर्वात कमी 52.24 टक्के इतके मतदान पाच वाजेपर्यंत झाले होते. आयोगाच्या माहितीनुसार, नांदेड 52.47, अकोला 52.49, यवतमाळ-वाशिम 54.04, अमरावती 54.50, हिंगोली 52.03 तर परभणीत 53.79 टक्के मतदान झाले होते.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी सुरू असलेल्या मतदानादरम्यान मतदानयंत्र व व्हीव्हीपॅट नादुरुस्तीमुळे अनेक ठिकाणी मतदान खोळंबले होते. बुलढाणा शहरातील एका केंद्रावर अर्धा तास खोळंबा झाल्याने यंत्रणांची धावपळ झाली. यामुळे हजारो मतदारांची गैरसोय झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. दुपारी तीन वाजेपर्यंत मतदारसंघातील विविध केंद्रांवर २६ बॅलेट युनिट, १३ कंट्रोल युनिट, तर २५ व्हीव्हीपॅट नादुरुस्त झाल्यामुळे मतदानात खोळंबा निर्माण झाला होता. मात्र यंत्रणांनी पर्यायी संयंत्र लावल्यावर मतदान सुरुळीत झाले. दुसरीकडे प्रत्यक्ष मतदान सुरू करण्यापूर्वी केंद्राध्यक्ष मतदान मॉक ड्रिल घेतात. या तालीम दरम्यान २४ बॅलेट , १२ कंट्रोल युनिट तर २२ व्हीव्हीपॅट बिघडल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली होती. ही यंत्रे बदलून घेतल्यावर प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात करण्यात आली. बुलढाणा येथील बसस्थानक समोरील प्रशासकीय इमारत मतदान केंद्र क्रमांक १९९ येथील मतदान यंत्रात बिघाड झाला होता. परिणामी, मतदान खोळंबले. यामुळे मतदारांनी संताप व्यक्त केला. मोताळा तालुक्यातील कोराला बाजार व बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट केंद्रावरदेखील असाच प्रकार घडला होता.