Marathwada

‘एक घर, एक झाड’ संकल्पना करमाड ग्रामपंचायतीने राबवावी!

– करमाड, भांबर्डा येथे 25 हेक्टरवर 40 हजार रोपट्यांचे रोपण

– विद्यार्थ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांनी केले वनभोजन; भाबर्ड्यातील वृक्षरोपणाचीही केली पाहणी

औरंगाबाद (विजय चिडे) – करमाड येथील न्यू हायस्कूल आणि ग्रामपंचायतीने गावात स्वच्छता मोहीम राबवावी. त्याचबरोबर गावात ‘एक घर, एक झाड’ अशी संकल्पना प्रत्यक्षात उतरावी, यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज केले. औरंगाबाद तालुक्यातील करमाड येथील टेकडीवर 15 हेक्टरवर 24 हजार, भांबर्डा येथील टेकडीवर 10 हेक्टरवर 16 हजार अशी एकूण 40 हजार रोपे वन महोत्सव 2022 अंतर्गत लावण्यात येत आहेत. त्याची पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली.

यंदाच्या वन महोत्सवांतर्गत जिल्ह्यातील वृक्षरोपन कार्यक्रमाचा शुभारंभ करमाड येथे जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.  करमाडचे सरपंच कैलास उकर्डे,  वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक सत्यजित गुजर,  सामाजिक वनीकरण विभागाचे वनसंरक्षक शिवाजी फुले,  निवासी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य,  निवासी विभागीय वनाधिकारी किर्ती जमधडे,  वनक्षेत्रपाल अनिल पाटील,  एस.बी. तांबे,  सहायक वनसंरक्षक नोव्हेल पाखरे, तहसीलदार ज्योती पवार,  न्यू हायस्कूलच्या मुख्याध्यापक उज्ज्वला पवार आदींची कार्यक्रमास उपस्थिती होती. जिल्हाधिकारी चव्हाण यांच्याहस्ते वृक्षरोपण झाल्यानंतर वृक्षारोपणास आलेल्या न्यू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.  यामध्ये त्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी पालक, शिक्षक आणि मित्रांची महत्त्वपूर्ण भूमिका असते.  त्यामुळे त्यांचा सदैव आदर करावा. अभ्यासाला महत्त्व देत निसर्गाचेही जतन,  संवर्धन करण्यासाठी पुढाकार घ्यावे,  असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.  न्यू हायस्कूलच्या राष्ट्रीय हरित सेनेतील विद्यार्थ्यांनी ‘एक विद्यार्थी, एक झाड’ याप्रमाणे करमाड येथील टेकडीवर वृक्षांचे रोपन केले. या रोपांमध्ये कडूलिंब, चिंच, करंज, बांबू, वड, पिंपळ आणि उंबर आदींचा समावेश आहे. उपसरपंच रमेश कुलकर्णी, डॉ.जिजा कोरडे, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब कुलकर्णी, साळुबा कुलकर्णी, कचरू कुलकर्णी, योगेश कुलकर्णी, विठ्ठल उकर्डे, गणेश कोरडे, मंडळ अधिकारी देवराव गोरे, तलाठी विशाल मगरे, ग्रामविकास अधिकारी एस.बी. सोळसे, न्यू हायस्कूलचे सहशिक्षक अरूण देवकर, नाना शिंदे, श्रीराम तारव, श्रीमती चेतना वरकड, श्रीमती बी.टी. मादणीकर आदींसह न्यू हायस्कूलचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांचे वनभोजन
करमाड येथील वृक्षारोपनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर न्यू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी चव्हाण यांना कार्यक्रम ठिकाणीच त्यांच्यासोबत जेवण्याची विनंती केली. विद्यार्थ्यांनी वृक्षरोपन कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी घरूनच जेवणाचे डब्बे सोबत आणले होते. विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान देत खुद्द जिल्हाधिकारी चव्हाण, मुख्य वनसंरक्षक गुजर, वनसंरक्षक फुले व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांनी आणलेल्या त्यांच्याच डब्ब्यात जेवण केले. दहावीतील विद्यार्थीनी रूपाली भवर, शिक्षक नाना शिंदे यांच्या डब्ब्यात जेवत असताना विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे, शाळेचे कौतुक जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केले. हा वन भोजनाचा आनंद कायम स्मरणात राहील, असेही विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी चव्हाण यांनी आवर्जून सांगत विद्यार्थ्यांना धन्यवाद दिले. विद्यार्थ्यांसोबत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी जेवण केल्याने विद्यार्थी आणि शाळेचे शिक्षक यांना अत्यानंद झाल्याचे मुख्याध्यापक पवार यांनी सांगितले.
‘भांबर्ड्यात शेततळ्यांची निर्मिती करा’
करमाडच्या वृक्षारोपनानंतर बाजूलाच असलेल्या भांबर्डा येथे लावण्यात आलेल्या 10 हेक्टरवर 16 हजार वृक्ष रोपे, नालाबांध, गुरे प्रतिबंधक चर आदींची पाहणी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केली. पाहणी दरम्यान या ठिकाणी नालाबांध, प्लास्टिक आच्छादित शेततळे करावित. त्याचबरोबर रोपवाहिकांसाठी वनीकरण विभागाने तत्काळ प्रस्ताव सादर करावा,  अशा सूचना जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिल्या.  यावेळी भांबर्ड्याचे सरपंच भीमराव पठाडे,  श्री. मते व गावातील नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!