बिबी (ऋषी दंदाले) – येथे मेहकर – जालना महामार्गावर पोलीस स्टेशन व भारतीय स्टेट बँकच्या मधोमध स्वराज चहाची हॉटेल आहे. आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास चहा बनवत असताना गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतल्याने काहीकाळ या परिसरात भितीने वातावरण तयार झाले होते. परंतु याचवेळी मांडवा येथील सादीक पठाण व इम्रान पठाण या दोन्ही भावांनी मोठ्या हिमतीने त्या सिलिंडरला विझविल्याने मोठा अनर्थ टळला होता.
स्वराज चहाची हॉटेल ही मेन रोडवर असून, या हॉटेलच्या बाजूला भारतीय स्टेट बँक, बुलढाणा अर्बन, तलाठी कार्यालय तसेच समोर वसंतराव नाईक महाविद्यालय आहे, आणि बाजूलाच पोलीस स्टेशन आहे. त्यामुळे हा परिसर एकदम वर्दळीचा असतो. सकाळी साडेदहाची वेळ असल्यामुळे शाळेत जाणारी मुले, बँक कामानिमित्ताने आलेले नागरिक, तसेच तलाठी कार्यालयात शेतकरी या परिसरात मोठ्या प्रमाणात आलेले होते. आणि त्याचवेळी गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतल्यामुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली होती. काही काळ इथे भीतीचे वातावरण तयार झाले होते. महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक काहीकाळ खोळंबली होती. काय करावे कोणालाच काही सूचत नव्हते. तेवढ्यात मांडवा येथील सादीक पठाण आणि इमरान पठाण हे दोघे भाऊ काही कामानिमित्त इथे आले असता, त्यांनी ही सर्व परिस्थिती पाहिली आणि मोठ्या हिमतीने इम्रान पठाण यांनी लोखंडी गजाच्या सहाय्याने सिलिंडरला हॉटेलमधून बाहेर ओढत रोडवर आणले आणि त्यावर सादीक पठाण यांनी बकेटीने पाणी टाकून तो पेटलेला सिलिंडर विझविला. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. या दोन्ही भावांनी दाखवलेल्या हिमतीने मोठा अनर्थ होता होता टळला. यावेळी उपस्थित नागरिकांनी या दोन्ही भावांचे कौतुक केले.