हातकणंगलेमध्ये राजू शेट्टींची राजकीय कोंडी; शिवसेने(ठाकरे)कडून सत्यजीत पाटलांना उमेदवारी!
मुंबई / हातकणंगले (खास प्रतिनिधी) – शेतकरी नेते व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व महायुती यांनी चांगलीच राजकीय कोंडी केली असून, शिवसेना (ठाकरे) पक्षाने या मतदारसंघात शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजीत पाटील सरूडकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सत्यजीत पाटलांच्या उमेदवारीमुळे हातकणंगले मतदारसंघात आता चौरंगी लढत होणार आहे. राज्यात सहा जागा लढविण्याची घोषणा करणारे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीशी, खास करून उद्धव ठाकरे यांच्याशी गाठीभेटी घेऊन स्वतःची सोय पाहण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, आधी महाआघाडीत या नंतर पाठिंब्याबाबत पाहू, असे ठाकरे यांनी त्याना कळवले होते. त्यावर शेट्टी यांनी विनाअट पाठिंबा मागितला होता. त्यांची ती ऑफर नाकारून ठाकरे यांनी या मतदारसंघात आपला हुकमीएक्का असलेला उमेदवार दिला आहे. ठाकरेंची ही चाल शेट्टी यांना मोठा शह मानला जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व बुलढाण्यातून लोकसभेच्या मैदानात उतरलेले रविकांत तुपकर हे लोकसभेत पोहोचण्याची दाट शक्यता निर्माण झाली असताना, दुसरीकडे, हातकणंगलेच्या चौरंगी लढतीत राजू शेट्टी यांचे काय होणार? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाने दुसरी आणि शेवटची यादी आज जाहीर केली. बहुचर्चित कल्याण मतदारसंघातून वैशाली दरेकर, तर हातकणंगलेमधून सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. दुसर्या यादीत एकूण चार उमेदवार उद्धव ठाकरेंनी घोषित केले. यामध्ये पालघर लोकसभा मतदारसंघातून भारती कामडी, जळगावमधून करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याआधी शिवसेने १७ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात वैशाली दरेकर या लढणार आहेत.
महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यासाठी आघाडीच्या नेत्यांनी माझ्यापुढे मशाल चिन्हावर लढण्याची अट ठेवली होती. मशाल चिन्हावर लढल्याने मी शेतकर्यांना आणि माझ्या संघटनेला वार्यावर कसं काय सोडू, असे सांगून मशाल चिन्हावर लढण्यास नकार दिल्यानेच हातकणंगले मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार दिला असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.
राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसोबत यावे, यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून शेट्टी यांच्याबरोबर चर्चा केली होती. स्वतः शेट्टी यांनीदेखील उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. परंतु, शेट्टी यांनी महाआघाडीत न येता उलट महाआघाडीला विनाअट पाठिंबा मागितला होता. त्यामुळे ठाकरे यांनी शेट्टी यांना पाठिंबा जाहीर न करता आपला उमेदवार तिथे दिला. हातकणंगलेच्या जागेसाठी माजी आमदार सुजीत मिणचेकर आणि सत्यजीत आबा पाटील सरूडकर यांच्यात शिवसेनेचे तिकीट मिळविण्यासाठी जोरदार चुरस होती. अखेर सत्यजीत पाटलांनी बाजी मारली व शिवसेनेचे तिकीट आणले. त्यांच्या उमेदवारीमुळे शाहूवाडी तालुक्याचे खासदारकीचे स्वप्न होत होणार असल्याचे बोलले जात आहे.
लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी तिहेरी लढत पहायला मिळणार आहे. वंचित बहुजन आघाडीने लोकसभेच्या पाच जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात नांदेडमधून अविनाश बोसीकर, परभणीतून बाबासाहेब उगाळे, छत्रपती संभाजीनगरमधून अफसर खान, तर शिरूर मतदारसंघातून मंगलदास बागल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पुणे शहर लोकसभा मतदारसंघात वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर बारामती मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
शिवसेना (ठाकरे) पक्षाचे २१ शिलेदार
बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख
मावळ – संजोग वाघेरे-पाटील
सांगली -चंद्रहार पाटील
हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
धाराशीव – ओमराजे निंबाळकर
शिर्डी- भाऊसाहेबर वाघचौरे
नाशिक – राजाभाई वाजे
रायगड – अनंत गीते
सिंधुदुर्ग-रत्नागिरी – विनायक राऊत
ठाणे – राजन विचारे
मुंबई-ईशान्य – संजय दिना पाटील
मुंबई-दक्षिण – अरविंद सावंत
मुंबई-वायव्य – अमोल कीर्तिकर
परभणी – संजय जाधव
मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई
वैशाली दरेकर : कल्याण
सत्यजित पाटील : हातकणंगले
करण पवार : जळगाव
भारती कामडी : पालघर
कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. परंतु, शिवसेनेत फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाकडे आली आहे. तर, महायुतीत या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात धुसफूस सुरू आहे. शिंदे गटाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे या मतदारसंघात खासदार असतानाही त्यांना या जागेवरून पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. तर, ठाकरे गटाकडे या जागेसाठी पात्र उमेदवार सापडत नसल्याचे म्हटले जात होते. परंतु, आता ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. वैशाली दरेकर यांनी यापूर्वी २००९ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लोकसभा निवडणूक लढली होती.
—————–
दैनिक तरूण भारत कोल्हापूरला राजू शेट्टी यांनी दिलेली मुलाखत.