Head linesPachhim MaharashtraPune

मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री दहावेळा तिकिटांसाठी दिल्लीला जातात; पण कांदाप्रश्नांवर कधी तोंड उघडत नाही!

– कांद्याला भाव, थ्रीफेज लाईट, बिबट्याच्या प्रश्नांवर हे सरकार काहीच बोलत नाही – डॉ. कोल्हे

पुणे (वैष्णवी मांडेकर) – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री तिकीट वाटपासाठी दहावेळा दिल्लीला जातात. मात्र, कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नावर बोलायला जात नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि मंत्री शिरूरमध्ये येतात पण आम्हाला दिवसा थ्री फेज लाईट द्या या मागणीवर काही बोलत नाही. बिबट्याच्या प्रश्नाविषयी कुणी ठोस भूमिका घेत नाही, असे टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी डागले. जुन्नर तालुक्यातील डिंगोरे पिंपळगावजोगा जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित गावभेट दौर्‍यानिमित्त उदापूर येथे आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते.

मावळते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणातून महायुतीच्या सरकारचे चांगलेच वाभाडे काढले. आता कांदा उत्पादक शेतकरी भर उन्हातान्हात शेतातील कांदा काढत आहे. मात्र त्यांच्या कांद्याला भाव मिळणार का याची गॅरंटी नाही. तर आपले पंतप्रधान मोदी हे सतत सर्व गोष्टींची गॅरंटी देतात, पण सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या पिकाच्या हमीभावाची गॅरंटी ते देत नाहीत. मोदी ही गॅरंटी देऊच शकत नाहीत. हे या देशाचे दुर्दैव असल्याचे सांगून, शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली कांद्याचा प्रश्न असेल, बिबट्याचा प्रश्न असेल सातत्याने संसदेत मांडतो, त्यासाठी भांडतोय. आज दिल्लीच्या सरकारकडून महाराष्ट्राचा स्वाभिमान चिरडण्याचे काम होतय. शिवसेनेच्या बाबत काय झाले, राष्ट्रवादीत काँग्रेस बाबत काय झाले आपण सर्व पाहातोय, अशी टीकाही डॉ. कोल्हे यांनी केली. तसेच आता बळकट हाताने स्वाभिमानाची मशाल पेटवून महाराष्ट्राच्या अस्मितेची तुतारी फुकायची आहे, हिच सर्वाना विनंती. १३ मे ला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हापुढील बटन दाबून आपला मतदानरूपी आशीर्वाद द्यावा, असे आवाहन यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
या सभेला माजी आमदार बाळासाहेब दांगट ,विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उपजिल्हाप्रमुख अनंतराव चौगुले, तालुकाध्यक्ष तुषार थोरात, माजी जि.प.सदस्य शरद लेंडे, अंकुश आमले, मोहित ढमाले, माजी सभापती बाजीराव ढोले, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक संभाजी तांबे, शरद चौधरी, सुनिल मेहेर, राहुल सुकाळे, ज्योत्स्ना महाबरे, चैताली केंगले, उदापूर ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव कुलवडे, सरपंच सचिन आंबडेकर, विद्याविकास विकास मंडळ अध्यक्ष प्रभाकर शिंदे, पाडुरंग शिंदे, रोहिदास शिंदे, प्रकाश कुलवडे, संजय शिंदे, संजय बुगदे, संतोष होनराव, पुष्पलता शिंदे, प्रमिला शिंदे, उदापूर ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व परीसरातील महाविकास आघाडीला मानणारे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


डॉ.अमोल कोल्हे यांचे बनकरफाटा येथे चार जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करून व फटाक्यांच्या आतषबाजीने स्वगत करण्यात आले. तदनंतर उदापूर गावात बसस्थानकापासून बैल गाडीत मिरवणूक काढण्यात आली. उदापूर येथे समाज मंदिरात जाऊन कोल्हे यांनी भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेतले. सह्याद्रीत चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नतमस्तक झाले. उदापूरच्या सभेनंतर नेतवड, माळवाडी असे एकूण डिंगोरे पिंपळगाव जोगा जिल्हा परिषद गटातील २५ गावांना भेट दिली. दरम्यान, शेतातील कांदा अरणीत कांदा निवडीचे काम करणार्‍या महिला शेतकर्‍यांबरोबर डॉ.अमोल कोल्हे यांनी शेतात जाऊन संवाददेखील साधला.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!