मोहाडी गावावर शोककळा; नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून युवा शेतकर्याने विष घेतले!
चिखली/सिंदखेडराजा (कैलास आंधळे) – सिंदखेडराजा तालुक्यातील मोहाडी येथील विलास पंजाबराव रिंढे (वय ३५) या युवा शेतकर्याने कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून काल, दि. २ एप्रिल, मंगळवारी दुपारी विष प्राशन केले होते. साखरखेर्डा येथे प्राथमिक उपचारानंतर त्याला बुलढाणा येथे हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान आज दि. ३ एप्रिल, बुधवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. सकाळी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
मोहाडी येथील पंजाबराव दौलत रिंढे ह्यांच्याकडे १० एकर शेती आहे. पत्नी गंगुबाई, मुलगा विलास, संदीप, सूना नातवंडे असा एकत्रित परिवार होता. १० एकर शेतीत कुटुंबाचे भागत नाही म्हणून गावातील दुसर्या एका शेतकर्याची १० एकर शेती करण्यासाठी घेतली होती. रिंढे कुटुंबीयांतील मृतक विलास, आई गंगुबाई व भाऊ संदीप यांच्या नावावर प्रत्येकी एक लाख रुपये असे एकूण तीन लाख रुपये शेतीकर्ज, तर आईच्या नावावर ट्रॅक्टरचे सहा लाख रुपये असे एकूण नऊ लाख रुपये कर्ज होते. ट्रॅक्टरच्या नादुरुस्तीचे रडगाणे सुरु असतांनाच दि. २९ मार्च, शुक्रवारी आलेल्या अवकाळी पावसामुळे त्यांच्या दोन एकर कांदा पिकाची नासाडी झाली. ह्या सगळ्या अडचणींच्या दबावाखाली विलासचा जीव मेटाकुटीला आला होता. त्यामुळे त्याची मनस्थिती व्यवस्थित नसल्याची मित्र मंडळीत चर्चा आहे. त्यातच काल दि. २ एप्रिल, मंगळवारी विलासने विष प्राशन केले. ही बाब समजताच काँग्रेसचे नेते शिवदास रिंढे ह्यांच्या जीपमधून त्याला साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांस तातडीने बुलढाणा येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रात्री उशीरा विलासची प्राणज्योत मालवली. आज दि. ३ एप्रिल, बुधवारी सकाळी मोहाडी येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्देवी घटनेने गावात शोककळा पसरलेली आहे. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा कर्जमाफी करावी, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवदास रिंढे यांनी केली आहे.
————