ChikhaliVidharbha

देऊळगाव घुबे, कोनड, मिसाळवाडी परिसरात ज्वारी, गहू झोपला; कोट्यवधींचे नुकसान!

– पंचनाम्याचे भानगडीत न पडता सरसकट 40 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी

देऊळगाव घुबे, ता. चिखली (राजेंद्र घुबे) – देऊळगाव घुबे, कोनड, अमोना,पिंपळवाडी, मलगी, भरोसा, मिसाळवाडी, शेळगांव अटोळ परिसरात काल (दि.26) सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीने अक्षरशः धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांना धरणीमायसुद्धा जागा देण्यास तयार नाही, अशी परिस्थिती शेतकऱ्यावर ओढवली आहे. विदारक नुकसान झाल्याने शेतकरी खचून गेला असून, शासनाने पंचनाम्यांचा घाट न घातला, रब्बी पिकासाठी सरसकट हेक्टरी तीन हजार रुपये मदत पिकपेऱ्यानुसार देण्यात यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

देऊळगाव घुबे येथील शेतकरी भालचंद्र घुबे, उत्तमराव घुबे, शिवाजी घुबे, मुरलीधर घुबे, रामेश्वर चेके व इतर ब-याच शेतकरी यांचे काढणीसाठी आलेले ज्वारीचे पिक काहींनी सोंगून टाकले तर काहींचे ऊभे होते. या शेतकरीवर्गाने सांगितले की, या परिसरात काढणीसाठी आलेले ज्वारीचे पिक काहींनी सोंगून टाकले तर काहींचे ऊभे होते. कालच्या पावसामुळे व गारपिटीने ऊभे पिक खाली पडून कणसे जमीनीत घुसली तर सोंगून टाकलेली कणसे मातीत दिसल्यामुळे त्याचा पू होणार आहे. चारा सडून जाणार आहे. तर गव्हाची तीच अवस्था झाली आहे. ऊभे गहू नेस्तनाबूत झाल्यामुळे व हरभऱ्याचे घाटे मातीत मिसळून गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पिकांची धुळधान झाल्यामुळे शेतकऱ्यावर कुऱ्हाडच कोसळली आहे. मायबाप सरकारने या पुर्वी झालेल्या अवकाळीमुळे एक रुपयाही शेतकऱ्याला फेकून मारला नाही. शेतकरी आपल्या दारी अशा कार्यक्रमात सरकारचे प्रतिनिधी मशगूल असून कोट्यावधीं रुपयाच्या विकास कामाच्या जाहीराती मधे ही मंडळी गुंतली आहेत. शेतकऱ्यांच्या हाती आतापर्यंत फक्त भोपळाच आला आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड संतप्त असून ग्रामीण भागात सरकारच्या विरोधात फार मोठी लाट निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा देण्याची गरज निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात तुफान गारपीट; गहू, हरभरा, कांदा झोपला; आंब्याचा सडा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!