Breaking newsBuldanaBULDHANAChikhaliHead linesVidharbha

जिल्ह्यात तुफान गारपीट; गहू, हरभरा, कांदा झोपला; आंब्याचा सडा!

– शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा थेट निवासी जिल्हाधिकार्‍यांना फोन; तातडीने उद्यापासूनच नुकसानीचे पंचनामे चालू करा – तुपकरांची मागणी
– शेतकर्‍यांची झोपच उडाली, पहिल्याच नुकसानीच्या मदतीची अद्याप प्रतीक्षा असताना आता नवीन संकट कोसळले!

बुलढाणा/सिंदखेडराजा (बाळू वानखेडे/अनिल दराडे/ऋषी दंदाले) – जिल्ह्यात आज (दि.२६) सायंकाळी तुफान गारपीट झाली, मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि गारपिटीमुळे काढणीला आलेला गहू, हरभरा, मका, कांदा ही पिके झोडपली गेल्याने भुईसपाट झाली असून, आंब्याचा तर नुसता सडा पडला होता. घाटाखालील नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, खामगाव, मलकापूर तालुक्यांतील काही गावांमध्ये रात्री उशिरापर्यंत वादळीवार्‍्यासह जोरदार पाऊस आणि गारपिटीचा तडाखा सुरूच होता. घाटावरील सिंदखेडराजा, लोणार, देऊळगावराजा, मेहकर, चिखली या तालुक्यांना तर गारपिटीने झोडपून काढले होते. अनेक गावांमध्ये संत्र्यासह गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, मका, भाजीपाला पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी पुरता उद््ध्वस्त झाला आहे. आधीच्याच पीक नुकसानीची सरकारने काही मदत दिली नसताना आता हे नवे संकट शेतकर्‍यांवर कोसळल्याने बळीराजाची अक्षरशः झोप उडाली आहे. दरम्यान, रात्री उशिरा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी निवासी जिल्हाधिकारी यांना फोन लावून, गारपिटीने झालेल्या नुकसानीची माहिती दिली. तसेच, उद्यापासूनच पंचनामे सुरू करा, शेतकर्‍यांना तातडीने मदत देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, अशा सूचना प्रशासनाला दिल्यात. सद्या, बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने अनेक गावांत शाळा इमारतींचे नुकसान झाल्याने मोठा पेचप्रसंग निर्माण झालेला आहे.

सोमवारी सायंकाळी जिल्ह्यात अचानक अवकाळी पावसाने तुफान गारपिटीसह हजेरी लावली. त्यामुळे शेतकर्‍यांची एकच धांदल उड़ाली. सिंदखेड़राजा तालुक्यातील दुसरबीड़, तढेगाव, केशवशिवणी, जऊळका, देऊळगावराजा, लोणार, चिखली, मेहकर या तालुक्यांतही सोसाट्याच्या वार्‍यासह पाऊस पड़ला. यामुळे गहू, कांदा, शाळू, हरभरा यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जळगाव जामोद तालुक्यातील ईस्लामपूर, रायपूर, हनवतखेड़, निमखेड़ी, कहूपट्टासह इतर भागातही वादळासह तुफान पाऊस सुरू होता. यामुळे शेकड़ो एकरातील गहू, हरभरा झोपला असून, अनेक भागात सुमारे अर्धा तासाच्यावर गारांसह पाऊस झाल्याची माहिती आहे. संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकालसह इतर भागातही या पावसाने धुमाकूळ घातला होता. तसेच नांदुरा, शेगावसह इतर भागही पावसाने झोडपला आहे. अगोदरच्या नुकसानीच्या मदतीची प्रतीक्षा असताना आता नवीन संकट ओढवल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी, असा टाहो शेतकरी फोड़त आहे. संग्रामपूर तालुक्यातही मोठे नुकसान झाले असून, नुकसानीचा निश्चित आकड़ा उद्या समजेल, असे संग्रामपूरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले. लोणार तालुक्यातील बिबी व परिसरात तुफान गारपीट झाल्याने शेतमालाचे अतोनात नुकसान झालेले आहे. लोणार, मेहकर, सिंदखेडराजा, देऊळगावराजा, चिखली या तालुक्यांत संत्र्यासह गहू, हरभरा, ज्वारी, कांदा, मका, भाजीपाला फळबागा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने अगोदरच आर्थिक डबघाईस आलेला शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. तालुक्यात असंख्य गावांमध्ये वादळीवार्‍यासह गारपीट व अवकाळी पावसाने वीज पुरवठा खंडित झाला होता. नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड, तढेगाव केशवशिवणी, जऊळका व इतर परिसरामध्ये अचानक वातावरण बदल होऊन शेतकर्‍यांचा हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावून घेतला. गहू, हरभरा, शाळू, कपाशी या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. चिखली तालुक्यातील मेरा, अंढेरा, मिसाळवाडी, शेळगाव आटोळ, अंचरवाडी परिसरातही तुफान पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे रब्बी पिकांसह फळबागांचे व आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. गारपीट व पावसामुळे काढणीला आलेल्या ज्वारीचे मोठे नुकसान होण्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत. ज्वारीची कणसे काळे पडून उत्पादनावर परिणाम होणार आहे. शेडनेटचेही अनेक गावांत नुकसान झाल्याने भाजीपाला उत्पादक धास्तावले आहेत. गहू, हरभरा पिकांनाही चांगला फटका बसला आहे.

दोन दिवसांच्या ‘अवकाळी’ने जिल्ह्यातील २२ हजार हेक्टरवरील पिकांवर फिरवला नांगर!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!