BULDHANAHead linesVidharbha

दोन दिवसांच्या ‘अवकाळी’ने जिल्ह्यातील २२ हजार हेक्टरवरील पिकांवर फिरवला नांगर!

– मेहकरसह पाच तालुक्यांत नुकसान नाही! : कृषी विभागाचा अंदाज
– जिल्हा अवकाळीने जिल्हा झोड़पणे सुरूच, देऊळगाव साकरशा परिसरात एक तास धुव्वाधार, गहू, हरभरा झोडपला!


– गारपीट आणि अवकाळी पाऊस नुकसान (प्राथमिक अंदाज) –

  • गावे संख्या – २५९
  • – शेतकरी संख्या – ३१,५१०
  • – शेतीक्षेत्र – २१,७६० हेक्टर

बुलढाणा (बाळू वानखेडे) – काल व आज अशा दोन दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे २१ हजार ७६० हजार हेक्टरवरील गहू, हरभरा, कांदा, ज्वारीसह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, यामध्ये २५९ गावांतील ३१ हजार ५१० शेतकरी बाधीत झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. विशेष म्हणजे, मेहकर, चिखली, मोताळा, मलकापूर, शेगाव आदी तालुक्यात नुकसान झाले असतानाही या तालुक्यांत नुकसान नाही, असे या अंदाजात नमूद आहे. यामध्ये अवकाळी पावसाचा सर्वाधिक तड़ाखा संग्रामपूर तालुक्याला बसल्याचे दिसत आहे. अर्थात हा अंदाज असून, बांधीत क्षेत्र वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, आज दि. २७ फेब्रुवारीरोजी संध्याकाळीही अवकाळी पावसाने दणका दिला. इतर भागासह मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा परिसरात एक तास पावसाने धुव्वाधार हजेरी लावली. यामुळे गहू, हरभरा झोडपला गेला असून, ज्वारी, कांदा, मका, आंबा यासह फळभागांचेही मोठे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात २६ फेब्रुवारी व आज, २७ फेब्रुवारी रोजी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. काही भागात तुफान गारपीटही झाल्याने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने सविस्तर व स्वयंस्पष्ट वृत्त प्रसारित करताच कृषी विभागाकड़ून नुकसानीचा आढावा घेण्यात येऊन तातड़ीने प्राथमिक अंदाज काढण्यात आला आहे. यामध्ये बुलढाणा तालुक्यातील १२ गावे बाधीत झाली असून, ३ हजार ४०० शेतकर्‍यांचे २१९० हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झालेले आहे. तर खामगाव तालुक्यातील २५ गावांतील ५१२ शेतकर्‍यांचे ३८७ हेक्टर, नांदुरा तालुक्यातील २३ गावांतील २३५० शेतकर्‍यांचे १२०० हेक्टर, जळगाव जामोद तालुक्यातील ५४ गावांतील ४ हजार ४८८ शेतकर्‍यांचे ३ हजार ७९१ हेक्टर, संग्रामपूर तालुक्यातील १०५ गावातील २५ हजार ३२२ शेतकर्‍यांचे ८ हजार ८९२ हेक्टर, लोणार तालुक्यातील ११ गावातील ९५० शेतकर्‍यांचे ८९० हेक्टर तर देऊळगावराजा तालुक्यातील ११ गावे बाधीत असून, १ हजार ५७० शेतकर्‍यांचे २ हजार ३१४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे.
अवकाळीमुळे गहू, हरभरा, मका, कांदा, पानमळे, फळबागा सह इतर पिकांचे क्षेत्र बाधीत झाल्याचे यामध्ये नमूद आहे. यामध्ये मेहकर, चिखली, मोताळा, मलकापूर, शेगाव आदी तालुक्यांत नुकसानच नाही, असाही अंदाज कृषी विभागाचा आहे. अर्थात जेथे पाऊस पड़ला तेथे नुकसान होतेच. अर्थात हा अंदाज असून, प्रत्यक्ष पाहणीत नुकसानीचा आकड़ा वाढण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, आज २७ फेब्रुवारीरोजी संध्याकाळी अवकाळी पावसाने जिल्ह्यात धूमाकूळ घातला. जिल्ह्यात इतर भागासह मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा परिसरात जवळजवळ एक तास पाऊस कोसळत होता. तसेच जानेफळसह, चिखली, सिंदखेडराजा व इतरही भागात पावसाने हजेरी लावली. यामुळे काढणीला आलेला गहू, हरभरा, तसेच कांदा, ज्वारीसह इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. तर सोंगून ठेवलेला हरभरा पूर्णतः भिजून गेला आहे. संकटांची मालिका सुरूच असल्याने शेतकरी पूर्णत: खचला असून, शासनाच्या मदतीची चातकासारखी वाट पाहत आहे.

जिल्ह्यात तुफान गारपीट; गहू, हरभरा, कांदा झोपला; आंब्याचा सडा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!