गारपीट, ‘अवकाळी’ने शेतकरी उद्ध्वस्त केला तरी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी झोपेत; शेतकर्यांचा कैवारी रविकांत तुपकर भल्यापहाटे शेतबांधावर पोहोचले!
– रविकांत तुपकरांनी थेट बांधावर जात केली अवकाळी व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी
बुलढाणा/शेगाव (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यात काल, दि. २६ फेब्रुवारी रोजी गारपीट व अवकाळी पावसाने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतला आहे. जिल्ह्यावर आणि शेतकर्यांवर एवढे मोठे संकट कोसळले असताना जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी आज शेतकर्यांच्या बांधावर धावला नाही, की त्यांच्या मदतीसाठी काही हालचाल केली नाही. परंतु, शेतकर्यांचे वैâवारी असलेल्या शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी काल रात्रीच निवासी जिल्हाधिकार्यांना फोन लावून तातडीने पंचनाम्यांची मागणी केली, तसेच आज दिवस उजाडताच त्यांनी उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्यांच्या शेतबांधावर धाव घेत त्यांना दिलासा दिला. तुपकरांनी आज (दि.२७) शेगाव तालुक्यातील पहूरपूर्णा शिवारात प्रत्यक्ष बांधावर जात नुकसानीची पाहणी केली व शेतकर्यांना आधार दिला. तसेच तलाठी व कृषी सहाय्यक यांनाही बांधावर घेवून जात तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली. तत्पूर्वी काल संग्रामपूर भागात दौर्यावर असतांना त्यांनी निवासी जिल्हाधिकारी यांच्याशी फोनवरून संवाद साधत, तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली होती, तर महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्याशी संवाद साधत, खोळंबलेला विद्युत पुरवठा तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवत तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणीदेखील केली आहे.
रविकांत तुपकरांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद आहे, की बुलढाणा जिल्हात काल, दि.२६ फेब्रुवारी २०२४ रोजी सर्वदूर मोठ्या प्रमाणात गारपीट व अवकाळी पाऊस झाला असून, यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. त्यात गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला व फळबागा यासह उभे पीक नष्ट झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे हिरावून गेला आहे. मागील खरीप हंगामातील सोयाबीन-कापसाला भाव नसल्याने आजही ५० टक्केपेक्षा जास्त शेतमाल शेतकर्यांच्या घरात पडून आहेत. तर येलो मोझॅक, बोंडअळी तसेच गारपीट व अवकाळी पावसानेही मागील खरीप हंगामात मोठे नुकसान झाले होते, त्यातील अवकाळी व गारपिटीची मंजूर असलेली नुकसान भरपाई अद्याप शेतकर्यांना मिळालेली नाही. त्यातच आता काल झालेल्या अवकाळी व गारपिटीने रब्बी हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी शेतकर्यांना आता उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत उरलेला नाही, त्यामुळे कर्जबाजारी होवून आत्महत्त्येची वेळ शेतकर्यांवर आली आहे. त्यामुळे काल, दि.२६ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकर्यांना १०० टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी शासन दरबारी केलेली आहे. भल्यापहाटे रविकांत तुपकरांना शेतबांधावर पाहून अनेक शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. भाऊ, तुम्हीच खरे शेतकर्यांचे वाली आहात, अशा प्रतिक्रिया शेतकर्यांनी व्यक्त केल्यात.
———–
बुलढाणा जिल्ह्यात काल (ता.२६ फेब्रु.) रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीपिकांचे व शेडनेटचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक आपत्तीने हिरावून घेतल्याने बळीराजा हवालदिल झाला. देऊळगावराजा व सिंदखेडराजा तालुक्यातही गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. देऊळगावराजा तालुक्यातील टाकरखेड भागीले, मेहुणाराजा, गारगुंडी, सिनगाव जहाँगिर, गव्हाण, चिंचखेड, रोहणा, पिंपळगाव, सावंगी टेकाळे तर सिंदखेडराजा तालुक्यातील वाघजाई, जळगाव व साठेगाव या गावांमध्ये झालेल्या नुकसानीची ॲड.शर्वरी तुपकर यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना आधार दिला.
जिल्ह्यात तुफान गारपीट; गहू, हरभरा, कांदा झोपला; आंब्याचा सडा!