वर्धेतील मद्यधुंदअवस्थेत अपघात करणारी महिला पोलिस व तिचा साथीदार अखेर निलंबीत
– ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या सडेतोड वृत्ताची पोलिस अधीक्षकांनी घेतली गंभीर दखल
वर्धा (प्रकाश कथले) – मद्यधुंद अवस्थेत कार चालवून, दुचाकीला धडक देऊन दोघांना जखमी करणार्या महिला पोलिसासह कारमधील दुसरा मद्यधुंद पोलिस कर्मचारी, अशा दोघांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. या महिला पोलिसाचा कारनामा ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने चव्हाट्यावर आणला होता. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी ही कारवाई केली असून, पूजा गिरडकर असे पोलिस महिलेचे तर मनोज सूर्यवंशी असे दारूच्या नशेत मागील सीटवर लोळत पडलेल्या पोलिस कर्मचार्याचे नाव आहे. या कारवाईने शहरवासीयांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
सविस्तर असे, की रितीक कडू, पवन आदमने हे दोघे दुचाकीने आर्वी नाक्याकडे जात असताना, मागून येणार्या एमएच ४८ पी ०८६४ क्रमांकाच्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातात रितीक कडू याच्या हाताला जबर मार लागला, तर पवन आदमने हा किरकोळ जखमी झाला. अपघात होताच नागरिकांनी धाव घेतली असता, स्टेअरिंग सीटवर गणवेशात महिला पोलिस दिसली. नागरिकांनी हटकले असता महिला पोलिस मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आले. दारू प्राशनाचा वास येत होता. इतकेच नव्हेतर मागील सीटवर एक पुरुष अंमलदारही मद्यधुंद अवस्थेत लोळत पडून असलेला दिसून आला. नागरिकांनी त्यांना हटकले असता, पोलिसी रुबाब झाडून तेथून त्यांनी पळ काढला.
या घटनेचा व्हिडिओ ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या हाती आल्यानंतर याबाबतचे सविस्तर वृत्त प्रसारित करण्यात आले होते. त्याची जिल्हा पोलिस अधीक्षकांनी गांभिर्याने दखल घेतली असून, दारूच्या नशेत कार चालवून दुचाकीला धडक देणार्या महिला पोलिस कर्मचारी पूजा गिरडकर तसेच त्याच कारमध्ये मागील सीटवर दारूच्या नशेत लोळत असलेला पोलिस कर्मचारी मनोज सूर्यवंशी यांना पोलिस अधीक्षकांनी निलंबीत केले आहे. दारूच्या नशेत पूजा गिरडकर ही महिला पोलिस कर्मचारी एमएच ४८ पी ०८६४ क्रमांकाची कार चालवीत तिने दुचाकीला धडक देत दुचाकीस्वाराला जखमी केले होते, याबाबतचा चौकशी अहवाल काल आला होता, त्यात दोन्ही कर्मचारी दोषी असल्याचे स्पष्ट झाले होते. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने या घटनेची लाईव्ह व्हिडिओसह माहिती प्रसारित केल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती.
———
वर्धेत वर्दळीच्या रस्त्यावर कार चालवीत मद्यधुंद महिला पोलिसाचा धुमाकूळ!