Breaking newsBuldanaBULDHANAHead linesPolitical NewsPoliticsVidharbha

उद्याचा दिवस हजारो प्रवाशांसाठी वाईट!; मोदींच्या सभेसाठी जिल्ह्यातून दिडशे बस यवतमाळला रवाना!

– दोन दिवस आता प्रवाशांचे हालच हाल, खासगी प्रवासी वाहतूकदारांची होणार चांदी
– मोदींच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारची जोरदार धावपळ!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (दि.२८) यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाला गर्दी खेचण्यासाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारची चांगलीच पळापळ सुरू असून, राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेच बुक करण्यात आलेल्या आहेत. एकट्या बुलढाणा जिल्ह्यातून दिडशे बसेस बुक करण्यात आल्या असून, आज व उद्या प्रवासी, पासधारक विद्यार्थी, चाकरमाने यांचे अतोनात हाल होणार आहेत. मोदींची सभा म्हणजे प्रवाशांसाठी प्रचंड वैतागवाडी ठरली असून, प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. त्यातच आता परीक्षा सुरू असल्याने उद्या बसअभावी विद्यार्थी, विद्यार्थिनींचे अतोनात हाल होणार आहेत. या संधीचा गैरफायदा खासगी वाहतूकदार घेणार असल्याने त्यांची मात्र चांगलीच चांदी होणार आहे.

लोकसभा निवडणूक पाहाता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात सभांचा धड़ाका लावण्याचे ठरवले असून, उद्या दि.२८ फेब्रुवारी रोजी यवतमाळजवळील भारी येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे ही सभा यशस्वी करण्यासाठी धड़पड़ करत असून, यासाठी एसटी महामंडळ कामाला लावले असल्याचे दिसून येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातून विविध आगाराच्या दिड़शेच्या आसपास बसेस बुक केल्या गेल्याची माहिती ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ला प्राप्त झाली असून, या बसेस आज, दि. २७ फेब्रुवारीरोजी यवतमाळला रवानादेखील होत आहेत. यामुळे प्रवाशांचे दोन दिवस चांगलेच हाल होणार आहेत. हजारो विद्यार्थी, नोकरदार तसेच प्रवासी पासधारकांचीही यामुळे एकच त्रेधात्रिपिट उडणार असून, खासगी वाहनचालक प्रवाशांची आर्थिक लूट करण्याची शक्यता आहे. विशेषतः आता परीक्षेचे दिवस असल्याने पालक व विद्यार्थ्यांतून तीव्र संताप व्यक केला जात असून, हीच का मोदींची गॅरंटी? असा संतप्त सवालदेखील यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
दि. २८ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे दीड लाखांहून अधिक बचत गटांच्या महिलांना संबोधित करून एकप्रकारे लोकसभा निवडणुकीचे रणशिंगच फुंकणार आहेत. या मेळाव्यासाठी भारी परिसरात या मेळाव्याची जय्यत तयारी केली जात आहे. या मेळाव्याच्या सभास्थळी ४५ एकराच्या विस्तीर्ण जागेवरती सभामंडप उभारण्याचे काम पूर्ण झाले असून, विदर्भाभरातून बसेसद्वारे लोकं आणण्याचे नियोजन सरकारने केले असल्याचे दिसून येत आहे. या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रीत केल्याचे दिसते. ही सभा यशस्वी होण्यासाठी लोकांना ‘पुलऑन’ करण्यासाठी एकच धावपळ शासनाची दिसत आहे. यासाठी सर्वांनाच कामाला लावले गेले असून, गर्दी जमविण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सात एस.टी. आगाराच्या सुमारे दिडशे बसेस बुक करण्यात आल्या आहेत. यामध्ये मेहकर आगाराला ७६ बसेस असून, त्यापैकी २५ बसेस, खामगाव आगाराच्या ५६ पैकी ३० बसेस, शेगाव आगाराच्या ४० पैकी १८ बसेस, चिखली आगाराच्या ४६ पैकी २२ बसेस, जळगाव जामोद आगाराच्या ४६ पैकी १८ बसेस, तसेच बुलढाणा आगाराच्या ६६ पैकी २६ व मलकापूर आगाराच्या ५० पैकी २० बसेस यवतमाळला रवाना होत आहेत. मेहकर ड़ेपोवर लोणार व सिंदखेड़राजा तर चिखली ड़ेपोवर देऊळगावराजा तालुक्याचा अतिरिक्त भार आहे. या आगारांच्याही प्रत्येकी २० ते २५ बसेस यवतमाळला जात आहेत. विशेष म्हणजे, सध्या सर्वच आगारात बसेसची कमतरता आहे, त्यातच काही बसेस दुरूस्तीसाठी गेलेल्या असतात. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत काम करताना आगार प्रमुखांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रसंगी प्रवाशांच्या संतापालाही सामोरे जावे लागत आहे.


विशेषतः जेष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना प्रवासात सवलत असल्याने गाड्यांमध्ये एकच गर्दी उसळत आहे. जिल्ह्यातून एकदम दिड़शे बसेस यवतमाळला जाणार असल्याने दोन दिवस प्रवाशांचे अतोनात हाल होणार असून, हे प्रवासी मोदींविषयी मनातल्या मनात तीव्र संताप व खदखद व्यक्त करत आहेत. हजारो विद्यार्थी, नोकरदार तसेच प्रवाशीही सवलत पासेसवर प्रवास करतात. विशेषतः आता बारावीची परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थी, विद्यार्थिनींची एकच धावपळ उडणार असून, खासगी प्रवासी वाहतूकदार अव्वाच्या सव्वा भाडेघेऊन आर्थिक लूट करण्याची शक्यता आहे. याबाबत अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी विभाग नियंत्रक वाड़ीभस्मे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन उचलला नाही. त्याबाबतही माहिती घेतली असता ते सुटीवर असल्याचे समजते. त्यामुळे बुलढाणा विभागाला सद्या तरी कुणी वाली नसल्याचे दिसून येत आहे. उद्याचा दिवस हा हजारो प्रवाशांसाठी प्रचंड मनस्ताप, तारांबळ व वैतागवाडी ठरणारा उजाडणार आहे.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!