वर्धेत वर्दळीच्या रस्त्यावर कार चालवीत मद्यधुंद महिला पोलिसाचा धुमाकूळ!
वर्धा (प्रकाश कथले) – खासगी कारने जाणाऱ्या महिला पोलिसाने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार दोघे जखमी झाले. हा अपघात वर्धा-आर्वी मार्गावरील अग्रगामी शाळेसमोर झाला. नागरिकांनी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या पोलिस महिलेला हटकले असता, पोलिसी रुबाब झाडून ते कार घेऊन पसार झाले. या घटनेचा व्हिडीओ ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या हाती आला आहे. रितीक कडू, पवन आदमने अशी जखमींची नावे आहेत.
सविस्तर असे, की पवन आणि रितीक हे दोघे दुचाकीने आर्वी नाक्याकडे जात होते. दरम्यान मागून येणाऱ्या एमएच.४८ पी ०८६४ क्रमांकाच्या कारने धडक दिली. अपघातात रितीक कडू याच्या हाताला मार लागला, तर पवन आदमने हा किरकोळ जखमी झाला. अपघात होताच नागरिकांनी धाव घेतली असता स्टेअरिंग सीटवर गणवेशात महिला पोलिस दिसली. नागरिकांनी हटकले असता महिला पोलिस मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आले. दारू प्राशनाचा वास येत होता. इतकेच नव्हेतर मागील सीटवर एक पुरुष अंमलदारही मद्यधुंद अवस्थेत निपचीत पडून असलेला दिसून आला. नागरिकांनी त्यांना हटकले असता, पोलिसी रुबाब झाडून तेथून पळ काढला. याप्रकाराबाबत रामनगर पोलीसांनी अपघाताची नोंद घेतली असल्याचे माहिती आहे. कारमध्ये मद्यधुंद अवस्थेत महिला व पुरुष कर्मचारी होते. साधे बोलण्याचेही त्यांना भान नव्हते. मात्र, पोलिसी रुबाब कायम होता. सर्वसामान्यांना व्यक्तीला कायद्याच्या चौकटी सांगत गुन्हे दाखल केले जाते. मात्र या प्रकरणात दोषींवर कारवाई होणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.