– इसरूळ, मंगरूळ, शेळगाव आटोळ, मिसाळवाडीसह १२ गावांचा समावेश
– आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनीही दिले आयुक्तांना पत्र
चिखली (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील नोंदणीकृत कामगारांना पेटी, भांडी व इतर साहित्याचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष राजीव जावळे, सरपंच संघटनेचे चिखली तालुकाध्यक्ष सतिश पाटील भुतेकर यांनी कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त यांच्याकडे केली आहे. याच संदर्भात आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे पत्रही डॉ. मिसाळ यांनी कामगार आयुक्तांकडे सुपूर्त केलेले आहे.
चिखली तालुक्यातील इसरूळ, मंगरूळ, शेळगाव आटोळ, मिसाळवाडी, अंचरवाडी, वसंतनगर, अमोना, कोनड, देऊळगाव घुबे, पिंपळवाडी, मलगी, मुरादपूर, मेरा खुर्द, भरोसा व रामनगर या गावांतील नोंदणीकृत कामगारांना पेटी, भांडी व इतर साहित्याचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी डॉ. विकास मिसाळ यांच्या नेतृत्वात करण्यात आलेली आहे. या संदर्भात आ. डॉ. शिंगणे यांनीदेखील पत्र दिले असून, याबाबत स्वतंत्र कॅम्प घेतला जाऊन लवकरच साहित्यवाटप होईल, असे डॉ. मिसाळ यांनी सांगितले आहे. चिखली तालुक्यातील परंतु, सिंदखेडराजा मतदारसंघातील या गावांत मोठ्या प्रमाणात कामगारवर्ग असून, या कामगारांना शासनाच्या या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी डॉ. मिसाळ यांनी पुढाकार घेतलेला आहे.
——–