– आंबा, जांभुळ वृक्षांची होत आहे सर्रास कत्तल!
चिखली (कैलास आंधळे) – तालुक्यातील अंचरवाडी बीटमध्ये सगळीकडे अवैध वृक्षतोडीने धुमाकूळ घातला आहे. चिखली – देऊळगाव राजा महामार्गावरील असोला, मेरा खुर्द, रामनगर भागात दिवसाढवळ्या अवैध वृक्षतोड सुरू असल्याचे दिसून येत आहे. याभागात अवैध वृक्षतोडीवाले व्यापारी आंबा, जांभूळ यांसारख्या मोठमोठ्या झाडांची कत्तल करीत असून, या अवैध वृक्षतोडीला वनरक्षक आळा घालत नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याभागातील अवैध व्यापारी आणि वनरक्षक यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याची परिसरात जोरदार चर्चा होत असून, सदर बिट रामभरोसे असल्याने अंचरवाडी बिट वर कोणाचाच वचक राहिलेला दिसत नाही. अंचरवाडी बिट अंतर्गत येणारे मेरा खुर्द ते रामनगर भागात महामार्गाला लागुनच असलेल्या शेतात मोठमोठी आंबा, जांभूळ वृक्षांची अवैध कत्तल केली मोठमोठाली लाकडे महामार्गावरील येणाऱ्या जाणाऱ्यानां दिसतात. याबाबत अंचरवाडी बीटचे वनरक्षक हबीब पठाण यांना विचारणा केली असता, अवैध वृक्षतोड केलेल्या मालाचा पंचनामा न करता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे त्यांच्याबाबत संशयाला वाव मिळत आहे.
जिल्ह्याला एक कर्तव्यदक्ष महिला उपवनसंरक्षक अधिकारी सरोज गवास लाभलेल्या असताना त्यांच्या कार्यकाळात सर्रास अवैध वृक्षतोड होत असल्याने त्यांनी अंचरवाडी बीटमध्ये वैयक्तिक लक्ष घालण्याची गरज आहे. मेरा बुद्रुक परिसरात ब्रेकिंग महाराष्ट्रने प्रसारित केलेल्या बातमीच्या धाकाने अनेक महिन्यापासून चंदनतस्कर या परिसरात दिसून येत नव्हते, पण अचानक पंधरा दिवसापासून चंद तस्करांनी मेरा बुद्रुक परिसरातील अनेक चंदनाचे झाडे तोडून नेली, याकडेही वन विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.