Breaking newsHead linesMaharashtraPolitical NewsPolitics

जरांगे पाटलांच्या आंदोलनाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी!

– महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा सहन केली जाणार नाही; सत्ताधारी-विरोधकांची भूमिका
– ‘जरांगे माझ्यावर बोलले, अन मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला, मी मराठा समाजासाठी काय केले, यासाठी कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही’ : फडणवीसांनी जरांगे पाटलांना फटकारले!

मुंबई (खास प्रतिनिधी) – मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे, या मागणीसाठी आंदोलन उभे करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी (विशेष तपास पथक) चौकशी करण्याचे आदेश विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज (दि.२७) दिलेत. तसेच ‘जरांगे यांच्यासंदर्भात मला घेणंदेणं नाही. मात्र त्यांचा बोलवता धनी कोण आहे, हे शोधणारच’, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजप नेते आ. आशीष शेलार यांनी आज सभागृहात जरांगे यांच्या आंदोलनाची चौकशी करण्याची मागणी केली होती. शेलार यांनी विधानसभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र बेचिराख करुन टाकण्याची भाषा केल्याचा उल्लेख करत या प्रकरणात चौकशी व्हावी, अशी मागणी केली. तर विधानपरिषदेमध्ये आमदार प्रवीण दरेकर यांनी शेलार यांचाच मुद्दा उचलून धरत, जरांगेवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी केली. त्यानंतर आता जरांगे पाटलांच्या आंदोलनाची, त्यांना देण्यात आलेल्या आर्थिक मदतीची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करावी, असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत.

मंगळवारी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला. मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. ‘महाराष्ट्रात काहीतरी भयंकर घडण्यासाठी कट रचला जातोय, अशी परिस्थिती आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महाराष्ट्र बेचिराख करण्याच्या भूमिकेविरोधात या सदनात नाही बोलणार तर कुठे बोलणार?’ असा प्रश्न आशीष शेलारांनी उपस्थित केला. ‘महाराष्ट्र बेचिराख करायची भाषा कोणी करत असेल तर त्या भूमिकेविरोधात विरोधक उभे राहतील, असा आमचा विश्वास आहे. महाराष्ट्र बेचिराख करण्याची केवळ धमकी आहे का? यामागची भूमिका काय? त्यासाठी कटकारस्थान-योजना केली आहे का? याबाबत गांभीर्याने विचार करावा लागेल. कारण, आता मराठा समाजाचीही बदनामी होतेय’, अशी परिस्थिती आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातल्या मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांवर आरोप केले आहेत. त्यांच्या आंदोलनात कोणत्या कारखान्यातून दगड आले? जेसीबी कोणाकडून आले? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आमदार आशीष शेलार यांनी विधानसभेत केली. आ. शेलारांच्या या निवेदनानंतर विरोधी पक्षानेही भूमिका मांडली. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सत्ताधार्‍यांना चोख प्रत्युत्तर दिले. आ. थोरात यांनी मुख्यमंत्री आणि जरांगे यांची काय चर्चा झाली, हे जाहीर करावे, अशी मागणी केली. तुम्ही त्यांच्याशी काय संवाद केला हे जाहीर करा, असे ते म्हणाले. विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनीही यावर बोलताना सरकारला आवश्यक वाटत असेल तर या प्रकरणाची चौकशी करावी. चुकीचे आरोप झाल्याने जरांगे आक्रमक झाले, महाराष्ट्र बेचिराख होऊ देणार नाही. समाजाचा हिरो होण्याचा प्रयत्न कोण करत आहे? असा प्रश्न विचारला. हे आंदोलन कोण करतंय, यामागे कोण आहे हे पाहिले पाहिजे, असेही ते म्हणाले. यानंतर निर्माण झालेल्या गोंधळाच्या स्थितीमुळे सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर विधानसभा अध्यक्षांनी यासंदर्भात चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करावी, असे आदेश राज्य सरकारला दिले. ‘लोकशाहीवर ज्याचा विश्वास आहे ते हिंसक कृत्य किंवा हिंसक वक्तव्य करत नाही. जी काही हिंसा झाली त्यात कोण सहभागी होते, यासंदर्भात शासनाने एसआयटीमार्फत चौकशी करावी’, असे आदेश नार्वेकर यांनी दिले.
मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रतिक्रिया दिली. ”मला बोलायचं नव्हतं. मराठा समाजच्या संदर्भात मी काय केलं हे महाराष्ट्राला माहीत आहे. मी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिल ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात टिकवलं, सारथीला निधी शिष्यवृत्ती दिली, कर्ज दिले. मराठा समाज्यातल्या संदर्भात मला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. जरांगे पाटील माझ्यावर बोलले त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला, त्यांच्यापाठीशी नाही”, असे फडणवीस म्हणाले. शिवाजी महाराजांचे नाव घ्याचचे आणि दुसर्‍यांना शिव्या द्यायच्या. लाठीचार्जच्या आधी मनोज जरांगे यांना परत कोणी आणले, त्यांना घरी कोणं भेटले, हे शोधायला हवे असे फडणवीसांनी सांगून, आरोपी सांगत आहे की, दगडफेक करायला कोणी सांगितले. पोलीस आपले नाहीत का? समाजाला विघटीत करण्याचा प्रयत्न होतोय. त्यांना पैसे कोण देतेय, त्यांना मदत कोण करतंय, हे सर्व बाहेर येईल, असे फडणवीसांनी ठणकावून सांगितले. जरांगे पाटलांवर बोलताना फडणवीसांनी सांगितले, की जर आयमाय काढणार असेल तर योग्य नाही. तुमच्याबद्दल जर कोणी बोलले तर, तुमच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस राहतील. जरांगे पाटील यांच्या संदर्भात मला घेणं देणं नाही, मात्र त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे शोधल जाईल. छत्रपती संभाजीनगर याठिकाणी वॉररुम कोणी सुरु केली, याची सखोल चौकशी होईल, असेही फडणवीसांनी याप्रसंगी सांगितले.

विधानपरिषदेतही गाजला मुद्दा!

विधानपरिषदेतही भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला, आणि या आंदोलनात कोणी मदत केली याची एसआयटी चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली. जरांगे अश्लाघ्य भाषा वापरत असतील तर त्यांना अटक केली पाहिजे. सर्वांना एकच कायदा लागू केला पाहिजे. अशा वक्तव्यांची चौकशी केली पाहिजे, असे ते म्हणाले. ‘जरांगे यांच्याकडे जेसीबी, ट्रॅक्टर कुठून आले? याला आर्थिक मदत कोणी केली याची ईडीकडून चौकशी झाली पाहिजे.’ अशी मागणी दरेकर यांनी केली. यानंतर निर्माण झालेल्या गोंधळामुळे विधानपरिषदेचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. सभागृह पुन्हा सुरू झाल्यावर दरेकर म्हणाले, ‘शरद पवार म्हणून जरांगेंना फोन येत होते. आंदोलनाचा खर्च शरद पवारच करत होते. शरद पवार जसे सांगतात तसे जरांगे करतात. आंदोलनाचे मारेकरी शरद पवार, कारण शरद पवार यांचा पक्ष संपला. आंतरवलीत जी दंगल झाली त्याची चौकशी करावी. पवार यांचा कसा हात आहे हे संगिता वानखडेंनी सांगितले आहे.’ दरेकर यांच्या या माहितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह विरोधकांतील अनेक आमदारांनी आक्षेप घेतला. गदारोळामुळे सभागृह पाच मिनिटांसाठी पुन्हा एकदा तहकूब करण्यात आले होते.


आंदोलनातील नुकसानीची भरपाई वसूल करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू!

  • मराठा आंदोलनात झालेल्या नुकसानीची माहिती संकलन करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतून याबाबतची माहिती संकलित करण्यात येत आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधित लोकांकडून वसूल केली जाण्याची शक्यता आहे. एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा आंदोलनात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे प्रशासन मात्र कारवाईच्या दिशेने सूचना देत आहेत.
  • मराठवाड्यात मराठा आरक्षणाचे पडसाद अधिक उमटताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक आणि पोलिस आयुक्त कार्यालय हद्दीत दाखल झालेल्या गुन्ह्यांची, मालमत्तेच्या नुकसानीची व कारवाईची माहिती संकलन करण्याचे आदेश सोमवारी जिल्हा प्रशासनाला शासनाने दिले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतून याबाबतची माहिती संकलित केली जात आहे.
  • दरम्यान, सोमवारी मनोज जरांगे पाटील हे उपचारासाठी सायंकाळी ६ वाजेदरम्यान छत्रपती संभाजीनगरातील खासगी रुग्णालयात दाखल झाले. १७ दिवस उपोषण केल्याने त्यांना अशक्तपणा आहे. त्यांच्या रक्त व लघवीचे नमुने घेत तपासणीला पाठवण्यात आले आहे. आज त्यांचे रिपोर्ट येणार असून, त्यानंतर पुढील उपचार सुरू केले जाणार आहेत, अशी माहिती डॉ. विनोद चावरे यांनी दिली.
    ————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!