बिबी (ऋषी दंदाले) – बिबी ग्रामीण रुग्णालयात अनेक समस्या उद्भवत असून, संबंधित गंभीर प्रकाराकडे वरिष्ठ आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. गोरगरीब जनतेला नाहक त्रास होत असल्यामुळे बिबी ग्रामपंचायतीच्या सरपंच चंदाबाई गुलमोहर यांनी जिल्हाधिकारी यांना लोणार तहसीलदार यांचेमार्फत निवेदन दिले आहे.
बिबी येथील ग्रामीण रुग्णालयात दररोज शंभर ते दीडशे रुग्ण तपासणीसाठी ग्रामीण भागातून येत असतात. मात्र येथे रुग्णांना पुरेशी सुविधा वेळेवर मिळत नाही. रुग्णांसाठी इसीजी मशीन चालू नाही. रक्त, लघवी तपासणी मशीन चालू नाही. एक्स-रे मशीनमध्ये फक्त छातीचा फोटो निघतो तसेच मशीनला नेहमी आर्थिंग प्रॉब्लेम दाखवण्यात येतो. दंत विभागात पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे गोरगरीब जनतेला खाजगी लॅबमधून रक्त, लघवी, इसीजी, एक्स-रे काढून आणावे लागतात. त्यामुळे गोरगरीब जनतेला मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
बिबी आस्थापनेवर तीन डॉक्टरांची नियुक्ती आहे. मात्र एकाच डॉक्टरांकडून दिवसा सेवा मिळते. मात्र रात्री आलेल्या रुग्णांना आयुष विभागाच्या डॉक्टरांना तपासावे लागते आणि रेफर करावे लागते. बिबी येथे नियुक्ती असलेले बालरोगतज्ञ डॉक्टर पगार बिबी ग्रामीण रुग्णालयामधून घेतात आणि नोकरी खामगाव येथे करत असल्याचे समजते. बदल्या फक्त नावापुरत्याच का? बिबी येथे नोकरी न करणे यामागे एखाद्या वरिष्ठ अधिकार्यांचे यांना पाठबळ आहे का, किंवा काही आर्थिक देवाणघेवाण होत असल्यामुळे तर हे डॉक्टर येत नसतील का? कारण १०४ वर तक्रार करूनही वरिष्ठांनी दखल घेतलेली नसून तक्रारीला केराची टोपली दाखवल्याचे समजते. अशीही चर्चा जनतेतून होत आहे. तरी बिबी ग्रामीण रुग्णालयासाठी नियुक्ती असलेल्या डॉक्टरांनी बिबीतच नोकरी करावी, अशी मागणी होत आहे. तरी वरिष्ठांनी तात्काळ दखल घेऊन रुग्णालयाच्या समस्या दूर कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ, ग्रामपंचायत बिबी यांच्याकडून करण्यात आली आहे.