भुजबळांविषयी बोलतांना चुकलोच; आमदार संजय गायकवाडांची प्रांजळ कबुली!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात असल्याने, तसेच ते ज्येष्ठ मंत्री असल्याने त्यांनी मराठा समाजाविषयी टोकाची भूमिका घेऊ नये, जर मराठा समाजाला ओबीसी कास्ट सर्टिफिकेट मिळत असेल तर मिळू द्यावे. त्यांच्याविषयी बोलताना आपण चुकलोच. परंतु, संबंधित व्यक्तीने रात्रीच्या वेळेस कॉल करून उचकावल्याने आपण तसे बोलून गेलो होतो, अशी प्रांजळ कबुली बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी ज्येष्ठ पत्रकार तथा पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे यांच्याशी संवाद साधून दिली. या संदर्भात काल ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने सविस्तर वृत्त व श्री काळे यांचा आ. गायकवाड यांचे सौम्य शब्दांत कान उपटणारा लेख प्रसारित केला होता. त्याची राज्यस्तरावर जोरदार चर्चा झाली होती. हे वृत्त व श्री काळे यांचे लिखान आ. गायकवाड यांनी गांभिर्याने घेत, वादग्रस्त विधाने करण्यासंदर्भात काळजी घेण्याचे निर्धारित केले आहे. ही यानिमित्ताने चांगली उपलब्धी ठरली आहे.
ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांच्या संवाद साधताना आ. संजय गायकवाड म्हणाले, की छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात मंत्री असल्यामुळे, त्यांनी मराठा समाजाविषयी टोकाची भूमिका घेवू नये. जर मराठा समाजाला ओबीसी सर्टीफिकेट मिळत असेलतर मिळू द्यावे, जर त्यांना विरोधात बोलायचेच असेल तर त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडून बोलायला पाहिजे. अन् जर ते असेच बोलत असतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढायला पाहिजे, अशी आपली भूमिका होती. आपण जी भूमिका मांडली त्याला उत्तर देतांना ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनीदेखील नगरच्या सभेत आपण याआधीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले, म्हणजे आपल्या ‘त्या’ बोलण्यामुळे भुजबळांना राजीनाम्याचे जाहीर करावे लागले. मात्र भुजबळांबद्दल एका व्हायरल कॉलमध्ये आपण जे बोललो, ती वस्तुस्थिती अशी आहे की.. संबंधित व्यक्तीने आधी आपल्याला उचकावले होते. दिवसभर काम करुन रात्री झोपेत असतांना हा कॉल आला. त्यामुळे आपलीही सटकली व आपण बोलून गेलो. परंतु ते जे बोललो ते चुकीचेच होते, याची जाणीव आपल्याला झाली असल्याचे आ.संजय गायकवाड यांनी बोलतांना सांगून.. तुम्ही याविषयी जे लिहिले ते योग्य असल्याचीही प्रांजळ प्रतिक्रिया आ.गायकवाड यांनी दिली आहे. आ. गायकवाड यांनी शिवसेना नेत्या प्रा. सुषमा अंधारे यांच्याविषयीही आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यावर मात्र ठाम असल्याचे ते म्हणालेत.
आ.संजय गायकवाड यांनी ओबीसी नेते छगनराव भुजबळ यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभर निषेधाचे रान पेटले होते. यावरच काही पत्रकारांनी जिल्ह्यात आलेल्या शिवसेना (ठाकरे) नेत्या प्रा. सुषमा अंधारे यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी अशा मुजोर आमदारांना मुख्यमंत्र्यांनी लगाम लावण्याची मागणी केली. यावर काही पत्रकारांनी आ.संजय गायकवाड यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता, जर कोणत्या सती-सावित्रीसारख्या महिलेने आपल्यावर आरोप केलेतर आपण त्यांचे उत्तर देण्यास बांधील राहू, सुषमा अंधारेच्या नाही, अशी प्रतिक्रिया दिली. प्रा. अंधारेंबद्दल बोलल्याची आपल्याला कुठलीही खंत नसल्याचे त्यांनी सांगून, जातीच्या पलीकडे जावून आपण विकासाचे प्रामाणिक राजकारण करत असल्याचे आ. संजय गायकवाड हे श्री काळे यांच्याशी बोलताना म्हणालेत.
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे अत्यंत अश्लाघ्य, वादग्रस्त अशी भाषा वापरत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्याबद्दल काल ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांनी त्यांचे अतिशय सौम्य शब्दांत कान टोचले होते. आ. गायकवाड यांच्या आक्षेपार्ह व आक्रास्तळ भाषेला प्रसिद्धी दिल्यामुळे काही प्रसारमाध्यमांचे भलेही ‘रेटिंग’ वाढत असेल; परंतु त्यामुळे बुलढाणा जिल्ह्याची प्रतिमा कमालीची खराब होत आहे. अनेकांनी आपल्या कर्तृत्वाने आपल्या जिल्ह्याचे नाव मोठे केले आहे. हा राजमाता जिजाऊंचा जिल्हा आहे, अनेक महापुरूष व राजकारणातील दिग्गजांनी हा जिल्हा नावारूपाला आणला आहे. अशा परिस्थितीत मुंबई, पुणे किंवा नवी दिल्लीतही पत्रकारिता, व्यवसाय करताना गेले, की पत्रकार, विविध अधिकारी, राजकीय-सामाजिक नेते हे बुलढाणा जिल्ह्याचा उल्लेख आला की आवर्जुन आ. संजय गायकवाड यांच्या विधानांचा उल्लेख करतात, अशावेळी ओशाळल्यासारखे होते, आणि लाजही वाटते. इतर प्रसारमाध्यमांनी काय भूमिका घ्यावी, हा ज्याचा त्यांचा प्रश्न आहे. परंतु, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ मीडिया ग्रूप एक जबाबदार प्रसारमाध्यम म्हणून आ. गायकवाड यांची वादग्रस्त विधाने प्रसारित करणार नाही. तथापि, त्यांचे विकासात्मक मुद्दे, विकासकामे, जबाबदारीची राजकीय विधाने, आणि जिल्ह्याचा लौकिक वाढविणारे कार्य मात्र नेटाने प्रसारित करत राहील. शेवटी त्यांना वाईट बोलण्यापासून थांबविण्याची जबाबदारी ही पत्रकारांचीच आहे. तसा प्रयत्न केल्याबद्दल आमचे मार्गदर्शक तथा ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांची आम्ही अभिनंदन करत आहोत. इतर पत्रकारांनीही ‘रेटिंग’च्या नादात चुकीचा पायंडा पाडण्याचे टाळायला हवे. आपण सर्व संजूभाऊंना अनेक वर्षांपासून ओळखतो. ते आक्रमक आहेत, आपणच त्यांना उचकावतो, आाfण ते बोलून जातात, ते आपण दिवसभर चालवत बसतो, त्यामुळे आपले भलेही ‘रेटिंग’ वाढत असेल, काहींना त्यांचे बोलणे आवडतही असेल, परंतु आपण ज्या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहोत, त्या जिल्ह्याकडे बघण्याचा इतरांचा दृष्टिकोन बदलत चालला आहे, आपल्या जिल्ह्याची प्रतिमा खराब होत आहे, याची आपण पत्रकार म्हणून दक्षता घेणे गरजेचे आहे.
– पुरूषोत्तम सांगळे, मुख्य संपादक