BuldanaBULDHANAHead linesPolitical NewsPoliticsVidharbha

‘चांगलं चालू असताना उगंच मुंग्या कशाला आणता’?

– ३५ वर्षांचा संघर्ष अन् कैक छावांनी रक्त सांडल्यानंतर आमदार झालात, जीभेला आवरा!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – गेल्या साडेचार दशकांतील बुलढाणा जिल्ह्याच्या बदलत्या राजकारणाचे साक्षीदार असलेले आणि अनेक राजकारण्यांना पुढे आणणारे ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक देशोन्नती या भूमिपुत्रांच्या हक्काच्या दैनिकाचा जिल्ह्यातील चेहरा असलेले राजेंद्र काळे यांनी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना जीभेला आवर घालण्याचा सल्ला दिला आहे. तब्बल ३५ वर्षांचा संघर्ष आणि कैक छावांनी रक्त सांडल्यानंतर तुम्ही आमदार झाला आहात. तोंडातून सुटलेल्या एका वाक्याने आर. आर. पाटील यांच्यासारख्या प्रचंड लोकप्रिय नेत्याने उपमुख्यमंत्रीपद गमावले होते. राजकारणातली एक चूकही तुमचे राजकीय आयुष्य हुकवू शकते, असा सल्ला देत, सगळं चांगलं चालू असताना तुम्ही मुंग्या का आणत आहात, अशा शब्दांत काळे यांनी आ. गायकवाड यांचे सौम्य शब्दांत कानही उपटले आहेत.

ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे हे बुलढाणा जिल्ह्याचा चालताबोलता इतिहास आणि भूगोल आहेत. त्यांच्या ‘वृत्तदर्पण’ स्तंभाने वाचकप्रियतेची सर्व उच्चांके ओलांडलेली आहेत. शेतकरी भूमिपुत्रांचे हक्काचे दैनिक असलेले देशोन्नतीतून प्रकाशित होणार्‍या लोकनायक प्रकाशभाऊ पोहरे यांच्या ‘प्रहार’ या स्तंभानंतर श्री काळे यांचे ‘वृत्तदर्पण’ हा स्तंभ सर्वाधिक वाचला जातो, या दोघांच्या लिखानापुढे इतर स्तंभ हे भंकस नमुने वाटतात. ‘देशोन्नती’चा बुलढाण्यातील चेहरा म्हणजे राजेंद्र काळे असून, त्यांचे लिखाण वाचणारा मोठावर्ग बुलढाणा जिल्ह्यात आहेत.
आ. संजय गायकवाड यांनी ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांच्यावर अतिशय घाणेरड्या शब्दांत टीका केल्यानंतर आ. गायकवाड यांच्यावर केवळ ओबीसीच नाही तर सर्व समाजातून तीव्र टीकेचा सूर उमटला आहे. आ. गायकवाड यांच्यामुळे बुलढाणा जिल्ह्याचे नाव खराब होत असल्याने अनेक मान्यवरांनीही काळजी व्यक्त केली होती. या सर्व पृष्ठभूमीवर राजेंद्र काळे यांनी आपल्या स्तंभातून आ. संजय गायकवाड यांचे सौम्य शब्दांत कान उपटले असून, त्यांना मित्र म्हणून महत्वाचा सल्लाही दिला आहे. राजेंद्र काळे यांचा संबंधित स्तंभलेख येथे पुनर्प्रकाशित करत आहोत.


अंगावर न आलेल्यांनाही, कशासाठी घेतांय शिंगावर..?
संजुभाऊ, जीभेला आवरा- राजकारण सावरा!

शरीर सुटायला लागलं की, डॉक्टर जीभेवर ताबा ठेवण्याचा सल्ला देतात. तसंच नेत्यांनीही जीभेला आवर घातलं की, राजकारण सावरु लागतं. कमालीचे लोकप्रिय असणारे आर.आर.आबाही मुंबई बॉम्बस्फोटानंतर ‘बडे बडे शहरों में एैसी छोटी छोटी बाते होती है..’ या तोंडातून सुटलेल्या एका वाक्याने उपमुख्यमंत्रीपद गमावून बसले होते. म्हणून राजकारणातली एक चूकही तुमचं राजकीय आयुष्य हुकवू शकते!

बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड हे अशाच काही बोलण्यातून राज्यभर चर्चेत येतात, वास्तविक पाहता त्यांचं ‘दमदार कर्तृत्व’ त्यांना बहुचर्चीत करणारं आहे.. पण अनेकदा त्यांचं ‘वायफळ वर्क्तृत्व’ त्यांच्या प्रतिमेला वेगळ्याच चर्चेत घेवून जातं. त्यामुळं प्रतिभेपुढे नाहक प्रश्नचिन्ह उभे होते. भुजबळांवरील अशाच एका वादग्रस्त वक्तव्यानं ते राज्यभर ओबीसी व विशेषत: माळी समाजाच्या रोषाला कारणीभूत ठरत आहेत. राज्य मंत्रीमंडळात मंत्री असतांनाही छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यावरुन व सगे-सोयर्‍याच्या अध्यादेशावरुन स्व-सरकारलाच धारेवर धरले. शिंदे शिवसेनेच्या प्रवत्तäयांनी त्यावर भूमिका मांडलीही. असा एखादा प्रसंग राज्याच्या राजकारणात चर्चीत ठरत असला की, बुलढाण्यातील इलेक्ट्रॉनिक मीडियावाले संजुभाऊ बोलतात म्हणून त्यांचा बाईट घ्यायला ‘बूम’ घेवून ‘धूम’ ठोकतात. पत्रकारांनाही काय, २४ तास बातम्यांचा रतीब हवा असतो. त्यात संजुभाऊ असे काही स्फोटक बोलून जातात की, न्यूज चॅनल्स त्याला हेडलाईन करतात. मग काय राज्यभर सोशल मीडियावरही सुरु असतो, पॉलिटीकल धांगडधिंगा!
तर ना.छगन भुजबळ यांच्या भूमिकेवर व्यक्त होण्यासाठी संजुभाऊ नेहमीप्रमाणे बुलढाण्यात सध्या स्पोर्टस् माहौल असल्यामुळे ट्रॅक्टसूटवरच बूमपुढे आलेत. आधी ते व्यवस्थित बोलले, की ‘भुजबळांनी मंत्री म्हणून सर्वधर्मभावाची व सर्वहिताची शपथ घेतल्यामुळे कुठल्याही विशिष्ट समाजाविरोधात भूमिका घेवू नये..’ मात्र त्यांचे हे स्टेटमेंट मीडियाला मिळमिळीत वाटल्यामुळे ते हेडलाईन्स होवू शकत नव्हते, मग त्यांनी भुजबळांचा एकेरी उल्लेख करुन ‘मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रिमंडळातून हाकलून देण्याची’ खळबळजनक मागणी केली.. अर्थात मग हे त्यांचे स्टेटमेंट न्यूज चॅनल्सचा पडदा व्यापून गेले. मीडियाला दिलेलं स्टेटमेंटतरी कमरेपर्यंत होतं, पण यावरुन कल्याणच्या दुर्गेश बागुल यांनी केलेल्या कॉलवर तर संजुभाऊ कमरेखाली असे घसरले की, ती व्हायरल क्लीप चारचौघात सोडाच एकांतातही ऐकावी वाटत नाही. त्यावरुन ओबीसी व विशेषत: माळी समाज किंवा समता परिषदेने राज्यभर आ.गायकवाड यांच्याविरोधात निषेधात्मक वातावरण तयार केले. बुलढाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयापुढे समता परिषदेने निषेध व्यक्त केला. माळीबहुल पट्ट्यात तर जोरदार निषेध झालेत, साखरखेर्ड्यात तर ‘निम का पत्ता कडवा..’ अशी रोषपूर्ण घोषणा देवून प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली.
आ.संजय गायकवाड यांच्याकडून असे प्रकार बोलण्यातून अनेकदा घडत आहेत, विशेषत: ते आमदार झाल्यापासून जास्तच.. ते ठाकरेंजवळ असतांना त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे उध्दव ठाकरेंच्या विरोधात बोलले असता, फडणवीसांच्या तोंडात कोरोनाचे जंतू कोंबण्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यावेळीही भाजपाच्यावतीने त्यांचा ठीकठिकाणी निषेध झाला होता. आ.संजय कुटे व विजयराज शिंदेंविरोधात तेंव्हा गायकवाड समर्थक थेट भिडले होते. कोरोना काळात अंडी-मटण खाण्यावरुन त्यांच्यात व काही वारकर्‍यांमध्ये ‘कॉल रेकॉर्ड’ चांगलेच व्हायरल झाले. सदानंद माळी प्रकरणातलेही २ कॉल्स व्हायरल चर्चेत राहिले होते. संजय राऊत हे तर त्यांच्या कायम निशाण्यावर असतात. खामगाव तालुक्यातील चितोडा व मेहकरच्या प्रकरणात आ.गायकवाड यांची धडाकेबाज एन्ट्री त्यांच्याच शिवसेनेत धडकी भरवणारी ठरली होती.
आतापर्यंत वादग्रस्त ठरलेल्या त्यांच्या या सर्व विधानांवर दृष्टीक्षेप टाकलातर, कोणतंही प्रकरण अंगावर आलेलं नसतांनाही संजुभाऊंनी ते स्वतः हून शिंगावर घेतलेलं दिसतं. फडणवीस हे ठाकरेंवर बोलले म्हणून, त्यांनी फडणवीसांना कोललं.. तर आता भुजबळ हे एकनाथ शिंदेंवर बोलले म्हणून त्यांनी भुजबळांना भिरभीर भिरवलं. हे बोलतांना त्यांनी राजकीय फायदा-तोट्यापेक्षा नेतृत्वासाठी स्वत:ला टिकेचं अन् निषेधाचं लक्ष्य बनवलं. वास्तविक पाहता यापैकी कोणत्याही प्रकरणात आ.संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली नसतीतरी, काहीही फरक पडला नसता. इतर ३९ आमदारांसारखे कातडीबचाव संधीसाधू राजकारण त्यांना करता आले असते. परंतु पटकन अन् त्यावेळी मनात येईल तसे बोलण्याचा त्यांचा स्वभाव, बूम पुढे आल्यावर त्यांना रोखू शकला नाही. वास्तविक यातील काही स्टेटमेंट त्यांचे काही कार्यकर्ते त्याच पठडीतील असल्यामुळे, त्यांनी जाम उचललेही. पण प्रत्येकवेळी असा उथळ खळखळाटपणा चालत नाही, कधी कधी शांत जलाशयासारखा धीरगंभीरपणाही हवा!
३५ वर्षांच्या संघर्षानंतर अन् कैक छावांनी रक्त सांडल्यानंतर, आ.संजय गायकवाड यांच्या पदरात आमदारकी पडली. त्यातलेही ६ महिने २ वेळा सत्तास्थापनेत अन् २ वर्ष कोरोनात गेले. म्हणजे अर्धी आमदारकी वायाच गेली. अवघ्या २ वर्षात २०/३० वर्षात जेवढी विकासकामे होणार नाहीत, अशी विकासकामे त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघात केली. विविध भवनांसह ते स्मशानभूमीपर्यंत प्रत्येक क्षेत्रातील काम त्यांनी केले. नगरपालिकेच्या कॉन्व्हेंट शाळा, वैद्यकीय व कृषी महाविद्यालय, उपसा सिंचन योजना, सोलर सिस्टीम, पुतळे अन् सुशोभीकरण तर विचारुन नका.. या ‘वर्क पॅटर्न’मधून जाती-पातीच्या राजकारणाला तिलांजली देण्याचा त्यांचा ‘गडकरी पॅटर्न’ अगदी समाजातील उच्चभ्रूंनाही मोहात पाडणारा ठरला. आकार घेताना जे पुतळे टिकेचे लक्ष्य ठरत होते, साकार झाल्यावर तेच पुतळे अनेकांचे लक्ष वेधत आहे. कोणीही काम घेऊन आला की त्याला ‘रिझन’ न दाखवता ‘सोल्युशन’ काढत नवा ‘व्हिजन’ देणारा हा महाराष्ट्रातील एकमात्र आमदार आहे. हा माणूस एवढा निधी कसा खेचून आणू शकतो ? याविषयी अनेक वर्षे आमदार व मंत्री राहिलेलेही अचंबित आहे, एवढेच काय विद्यमान मंत्रीही या गायकवाड पॅटर्नचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या खाजगी सचिवांना बुलढाणा मतदारसंघात पाठवतात. या नेत्य विषयी नेहमीच वेगळा दृष्टिकोन ठेवणारे विचारवंतही आता त्यांच्याबद्दल या विकासात्मक जाणीवांमुळे, वेगळा विचार करू लागले आहेत.. ही बाबही तेवढीच वैचारिक!
आ. गायकवाड यांच्या माध्यमातून महिनाभराचा राज्यस्तरीय क्रीडा महाकुंभ सध्या बुलढाण्यात सुरु आहे, त्यातून स्पोर्टली संजूभाऊ दिसतात. कामाच्या माध्यमातून हे सर्व सुरळीत सुरु असतांना व त्यांचे नेतृत्व सर्वव्यापी होत असतांना, मध्येच संजुभाऊ अंगावर न आलेल्या विषयालाही शिंगावर घेवून विरोधकांना बिननांगराचा पेंड काढल्याचा आनंद देवून जातात. विरोधकांनी टाकलेल्या जाळ्यात न अडकता, तेच स्वत: अविरत कष्टाने सुंदर जाळे विणूनही कोळी शेवटी त्याच जाळ्यात अडकतो.. तसे स्वत:चे करुन टाकतात. त्यांचा हा काय ‘केमीकल लोच्या’ आहे, हे जवळच्यांनाही समजले नाही.

काही वर्षापूर्वी भागवत नावाचे एक इंजिनिअर म्हणायचे- ‘टीव्ही.वर चांगले चित्र दिसत असतांनाही मध्येच छतावर जावून संजूभाऊ अ‍ॅन्टीना फिरवून मुंग्या आणतात..’

संजूभाऊ, सध्या तुमच्या राजकीय टीव्हीवरचा विकासात्मक पिक्चर क्लिअर दिसत आहे. त्यात विविधांगी योजनांचे कल्पक रंग आहेत. का उगाच बोलू बोलून स्क्रीनवर मुंग्या आणता..? बरं भाईजी म्हणा की खा.प्रतापराव जाधव, यांनीही तुम्हाला याबाबतीत बर्‍याचदा सांगितलं आहे. तुम्ही ते मान्यही करता, पण कालांतराने पुन्हा तुमच्या अंगात ‘बुम’पुढे शक्तिमान संचारतोच.. कॉल आला की तुमची सटकतीच.. कशासाठी?? अंगावर न आलेल्यांनाही शिंगावर घ्यायचं, सर्व सुरळीत असतांना. विरोधकांकडून कुठलीही गुगली, स्विंग किंवा यॉर्कर न येता तुम्हीच का हिट विकेट देता ??? यावर विचार व्हायला हवाय संजूभाऊ, फक्त त्यासाठी एकच करा, जिभेला आवरा अन् राजकारण सावरा!

(श्री राजेंद्र काळे हे दैनिक देशोन्नतीचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी असून, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र मीडिया ग्रूप’चे संपादकीय मार्गदर्शकदेखील आहेत. संपर्क ९८२२५९३९२३)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!