किनगावराजा ठाणेदार म्हणतात अपुर्या पोलीस कर्मचारी, जीपअभावी तपास कसा करायचा?
– तीन महिन्यांत एकदाही तपास अधिकारी घटनास्थळी गेला नाही?
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – तालुक्यातील लिंगा येथील गणेश बाजीराव मुंढे या भारतीय सैन्यदलात जम्मू-काश्मीर येथे कार्यरत असलेल्या व देशसेवा करणार्या जवानांच्या घरी तीन महिन्यांपूर्वी झालेल्या चोरीप्रकरणी तपासकार्यात किनगावराजा पोलिस अक्षम्य दुर्लक्ष करीत असून, ठाणेदार म्हणतात की पोलीस स्टेशनला अपुरे कर्मचारी, व नादुरुस्त जीप यामुळे तपास कार्यात अडचणी येत आहेत. देशाची सुरक्षा करणार्या जवानाचे कुटुंबच असुरक्षित असेल तर सैन्यात जवानांनी आपली सेवा द्यायची कशी? असा प्रश्न पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे निर्माण झाला आहे.
किनगावराजा पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम लिंगा येथे २७ ऑक्टोबररोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील साडेसात तोळे सोन्याचे दागिने व नगदी ३० हजार रुपये चोरून नेले होते. या घटनेची कल्पना किनगावराजा पोलिसांना मिळताच पोलिस स्टेशनचे ठाणेदार दत्तात्रय वाघमारे, पोलिस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील, बुलढाणा येथून डॉग स्कॉड पथक, ठसेतज्ज्ञ पथक हे घटनास्थळी हजर झाले. मात्र सदर चोरीचा काहीही पुरावा सापडला नाही. या चोरीचा तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक केदार यांच्याकडे देण्यात आला. मात्र तीन महिन्यांपूर्वी झालेल्या चोरीचा तपास हा या तपास अधिकार्यांनी कुठल्याही प्रकारे केल्याचे दिसून येत नाही. या चोरी प्रकरणात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील कॉटमधील सोन्याचे दागिने झुंबर वेल, गंठन, नेकलेस, गोलमण्याची पोत, अंगठी, जोडवे, कारलेमन्याची पोत यासह नगदी ३० हजार रूपये चोरून नेलेले आहे. सदर चोरीची फिर्याद शीतल गणेश मुंढे यांनी २८ ऑक्टोबर २०२३रोजी किनगावराजा पोलिस ठाण्यात दाखल केली होती. मात्र अद्याप सदर चोरीचा तपास पोलिसांनी लावला नाही, नुसता तपास सुरू आहे, असे सांगितले जात आहे. याबाबत पोलिस ठाण्यात चौकशी केली असता, ठाणेदार दत्तात्रय वाघमारे यांनी सांगितले, की पोलिस स्टेशनमध्ये पोलिसाची संख्या कमी असून, आमच्या पोलिस स्टेशनची गाडी नादुरुस्त असल्याने आम्ही तपास कसा करायचा? असा प्रश्न त्यांनीच उपस्थित केला. सदर चोरीप्रकरणी तपास अधिकारी व पोलिस उपनिरीक्षक केदार यांच्याकडे चौकशी केली असता तेही समाधानकार उत्तर देऊ शकले नाहीत. विशेष बाब अशी की, पीएसआय केदार हे एका सत्ताधारी राजकीय कार्यकर्त्याचे नातलग असल्याने तीन महिन्यांत एकदाही घटनास्थळी तपासकार्यासाठी गेले नाही, अशी शोकांतिका आहे. आजरोजी या तपास अधिकार्यांची बदली झाली आहे, आता नवीन तपास अधिकारी या प्रकरणी लक्ष घालतील का, व चोरांचा शोध लावून मुद्देमाल परत मिळवून देतील का? असा सवाल निर्माण झाला आहे. देशाच्या सुरक्षेसाठी जीवाची बाजी लावणार्या जवानांच्या घरीच जर त्यांचे कुटुंबीय सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य माणसांनी पोलिसांकडून काय अपेक्षा ठेवायच्या आहेत? याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासणे यांनी तातडीने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
याबाबत किनगाव राजा ठाणेदार दत्तात्रय वाघमारे यांना भेटून चोरीबाबत माहिती घेतली असता ठाणेदार यांनी सांगितले की, आमच्या पोलीस स्टेशनला पोलिसांची संख्या कमी तर आहेच, त्याचबरोबर पोलीस स्टेशनला जीप नादुरुस्त असल्याने तपासात अडचणी येत आहेत, असे उत्तर दिले.
माझे पती भारतीय सैन्यात उदयपूर येथे कर्तव्य बजावत असून, देशाची चोवीस तास सेवा करत आहेत. अशा देशसेवेत कार्यरत असलेल्या जवानाच्या घरी चोरी होऊन तीन महिने उलटले तरीदेखील किनगावराजा पोलिसांनी अद्याप चोरीचा तपास लावला नाही. पोलिस काहीच हालचाल करत नाही, ही खेदाची बाब आहे.
– सौ. शीतल गणेश मुंढे, लिंगा येथील फिर्यादी
——–