आळंदी (अर्जुन मेदनकर) – श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष, राष्ट्रसंत पूज्य स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज यांच्या ७५ व्या जन्मसोहळ्या निमित्ताने आळंदीनगरी सज्ज झाली असून, रविवारी मलुक पीठ, वृंदावनचे संत राजेंद्रदास महाराज यांचे उपस्थितीत धार्मिक अनुष्ठान संपन्न झाले. जवळपास पंधरा हजारांहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वर माऊलींना अभिषेक व त्यानंतर झालेल्या वारकरी सन्मान सोहळ्याने शुभारंभ झालेला गीताभक्ति अमृत महोत्सव दि. ११ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
गीता परिवार, महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान, श्रीकृष्ण सेवानिधी व संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुल या संस्थानी गीताभक्ति अमृतमहोत्सव सोहळ्याचे आयोजन करुन भारतीय संस्कृती आणि परंपरेचा अनोखा मेळ घातल्याचे श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला वारकरी संप्रदायासह स्वामी श्रीगोविन्ददेव गिरि महाराज यांना मानणारे हजारो भाविक उपस्थित होते. देशभरातील साधुसंतांच्या उपस्थितीने इंद्रायणीकाठी संतांचा मेळा भरल्याचीच अनुभूती मिळत होती. धर्मरक्षा आणि राष्ट्रनिर्माणासाठी जीवन समर्पित करणारे पूज्य स्वामी श्रीगोविन्ददेव गिरिजी महाराज संत परंपरेचे प्रचारक आहेत. दरवर्षी त्यांचा जन्मदिवस गीताभक्ति दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र यावर्षी स्वामीच्या जीवनाची 75 वर्ष पूर्ण होत असल्याने संलग्न संस्थांनी ‘गीताभक्ति अमृत महोत्सवा’चे आयोजन केले आहे. रविवारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना अभिषेक व त्यानंतर वारकरी सत्कार, यज्ञ विधीचा शुभारंभ व कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तपोमूर्ती कल्याणदास महाराज, ह.भ.प.संदीपन महाराज शिंदे व ह.भ.प.भास्करगिरि महाराज यांची किर्तने संपन्न झाली.
ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
पुणे-आळंदी या पालखी मार्गावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात श्रीगुरू निवृत्तींनाथ महाराज त्र्यंबकेश्वर यात्रा व श्री संत ज्ञानेश्वर माऊली व श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ति प्राणप्रतिष्ठापना वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सोहळा ६ ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आल्याची माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर देवस्थांन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर , खजिनदार दत्तात्रय गायकवाड यांनी दिली.
सोहळ्याचे काळात श्रींची महापूजा, काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, श्री गाथा पारायण , महिला भजनी मंडळाची भजने ,हरिपाठ, हरिकीर्तन व हरी जागर असे कार्यक्रम होणार आहेत. या शिवाय मान्यवर कीर्तनकार यांची कीर्तन सेवा संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत होणार आहेत. यामध्ये गोरक्षनाथ महाराज वर्पे, महारुद्र महाराज रेडडे, बालाजी महाराज मोहिते, संतोष महाराज काळोखे, लक्ष्मण महाराज पाटील, आधार महाराज कुमावत, ज्ञानेश्वर महाराज करंजीकर, ओम महाराज अटकळ, हरिदास महाराज पालवे, बाळासाहेब महाराज शेवाळे यांचे काल्याचे कीर्तन सेवेने सप्ताहाची सांगता होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी भाविकांना महाप्रसाद वाटप होणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांनी दिली. सप्ताहात सहभागी होवून श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲड. तापकीर यांनी केले आहे.