शिंदे गटाचे ‘टेन्शन’ वाढले; भाजप बुलढाण्याच्या जागेवर दावा ठोकणार!
– भाजपच्या ‘गाव चलो अभियाना’चा आजपासून शुभारंभ!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद मोठी आहे. त्यामुळे बुलढाण्याची जागा भाजपला मिळावी, अशी कार्यकर्ते व पदाधिकारी यांची इच्छा आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडे बुलढाण्याची जागा भाजपकडे मागणार आहोत, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे व जिल्हा संपर्कप्रमुख विजयराज शिंदे यांनी शिवालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. अगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ‘महाविजय २०२४’च्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी प्रत्येक बूथ व पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण भागात ‘गाव चलो अभियान’ राबवून केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवावी. या ‘गाव चलो अभियाना’चा शुभारंभ आज (दि.४) पासून करण्यात येत असल्याचेही डॉ. मांटे यांनी सांगितले.
डॉ. मांटे म्हणाले की, गाव चलो अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील १९५१ गावांमध्ये भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख हे ४ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारीपर्यंत प्रवास करणार आहेत. या प्रवासात केंद्र शासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणार आहे. तसेच या योजनांचा लाभ घेणार्या लाभार्थ्यांशी संवाद साधून व त्यांचे समर्थन मिळवून त्याचे परिवर्तन मतांमध्ये करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, शेतकरी, शेतमजूर यांचेसुद्धा समर्थन मिळविण्यासाठी हे गाव चलो अभियान राबवले जात असून, राष्ट्रीयस्तरावर ३७० कलम, रामजन्म भूमी मंदिर उभारण्यात भाजपा सरकारचे मोठे योगदान आहे. हेसुद्धा बूथ कमिट्यांच्या माध्यमातून समाजात पोहोचविण्याचे काम गाव पातळीवर केले जाणार आहे. प्रत्येक बूथ प्रमुख, कार्यकर्त्यांचा प्रशिक्षण वर्गसुद्धा झालेला आहे. अनुभवी कार्यकर्त्यांचा संच त्या माध्यमातून करण्यात आला असून, संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात हे अभियान मोठ्या ताकदीने भाजपकडून राबविण्यात येणार असल्याचे डॉ. मांटे यांनी सांगितले.
या गाव चलो अभियानाचे जिल्हा संयोजक म्हणून विनायक कुळकर्णी, सहसंयोजक म्हणून युवराज नागरे, डॉ. कृष्णकुमार सपकाळ, मोताळा मंडल संयोजक सचिन शेळके, सहसंयोजक म्हणून नितीन हिवाळे, बुलढाणा ग्रामीण सयोजक सतिश देहाडराय, सहसंयोजक देवेंद्र पायगण, बुलढाणा शहर संयोजक अण्णा पवार, सुनील देशमुख, चिखली हरिभाऊ परिहार, विजय खरात, देऊळगावराजा गजानन नांदवे, गणेश पालवे, सिंदखेडराजा गजानन वायाळ, संतोष डोईफोडे, तर लोणार मंडळ सयोजक म्हणून अॅड. शिवाजी सानप, सहसंयोजक म्हणून तेजराव घायाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी माजी आ. चैनसुख संचेती, आ. संजय कुटे, आ. आकाश फुंडकर, आ. श्वेता महाले, माजी आ. विजयराज शिंदे, प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ, ज्येष्ठ नेते तोताराम कायंदे हेसुद्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये या अभियानाअंतर्गत प्रवास करणार असल्याचे डॉ. मांटे म्हणाले.
लोणार येथे विमानतळाची मागणी करणार!
जागतिक पातळीवर नावजलेले खार्या पाण्याचे सरोवर पाहण्यासाठी जगातून पर्यटक लोणार या ठिकाणी येतात. त्यांचे सुविधेसाठी भाजपाच्या वतीने लोणार या ठिकाणी विमानतळ उभारण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे डॉ. गणेश मांटे यांनी सांगितले.
बुलढाण्याच्या जागेबाबत जिल्हा भाजपचे पक्षश्रेष्ठींना साकडे!
बुलढाणा हा मतदारसंघ भाजपचाच असून, पी. जी. गवई, सुखदेव नंदाजी काळे हे भाजपच्या तिकीटावर विजयी झाले आहेत. पी. जी. गवई हे निवडणुकीत उभे असताना २५ दिवस निवडणूक लांबली होती. दरम्यान, राजीव गांधी यांचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे तेव्हा भाजपचा पराभव झाला होता. त्यानंतर युतीत ही जागा शिवसेनेला दिल्या गेली. असे असले तरी मूळ जागा भाजपचीच आहे. त्यामुळे ही जागा भाजपाला सोडण्याची मागणी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेही करण्यात आल्याची माहिती डॉ. गणेश मांटे व विजयराज शिंदे यांनी दिली. विशेष बाब म्हणजे, महायुतीत बुलढाण्याच्या जागेवर भाजप दावा करणार असल्याचे वृत्त मागील काही दिवसांपूर्वी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने प्रसारित केले होते. या वृत्तावर डॉ. मांटे यांच्या दाव्याने आपसूकच शिक्कामोर्तब होत आहे.