मंत्रिपदाचा राजीनामा देऊनच ओबीसी आरक्षण लढ्यात उतरलो!
– शिवरायांची शपथ पूर्ण केली तर मग मागासवर्गीय आयोग कशाला? भुजबळांचा मुख्यमंत्र्यांना सवाल!
– नगर येथील एल्गार मेळाव्यातून ओबीसी नेत्यांचे सरकारवर घणाघाती हल्ले!
नगर (बाळासाहेब खेडकर) – सरकारमधील लोक आणि विरोधी पक्षाचे नेते भुजबळ तुम्हाला पटत नसेल तर राजीनामा द्या, असे बोलत आहेत. एका नेत्याने सांगितले, की भुजबळांना मंत्रिमंडळाच्या बाहेर हाकला. मला त्या सर्व नेत्यांना सांगायचे आहे की, अंबडमध्ये १७ नोव्हेंबरला ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली. त्याच्या एक दिवसआधी म्हणजेच १६ नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. त्यानंतर अंबडच्या सभेला रवाना झालो, असा गोप्यस्फोट राज्यातील वरिष्ठ मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी अहमदनगरमध्ये ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्यातून केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अवमान करायचा नाही, पण प्रश्न निर्माण झाले आहेत. तुम्ही २७ तारखेला मोर्चाला सामोरे गेला विरोध नाही, पण तुम्ही त्या मोर्चात मराठ्यांना आरक्षण देऊन छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली पूर्ण केल्याचे जाहीर केले. त्यामुळे शिवरायांची शपथ पूर्ण झाली असेल, तर मागासवर्गीय आयोग कशासाठी? असा थेट सवालही भुजबळांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
नगरमध्ये ओबीसी समाजाच्यावतीने ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके, माजी मंत्री महादेव जानकर, माजी आमदार पांडुरंग अभंग, प्रकाश शेंडगे, प्रा. पी. टी. चव्हाण, शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अंबादास गारुडकर, विशाल वालकर, दौलतराव शितोळे, आंधळे महाराज, शंकरराव हिंगे, दिलीप खेडकर, रामजी अंधारे, यांच्यासह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरधील ओबीसी महाएल्गार मेळाव्यात छगन भुजबळ यांनी विविध मुद्द्यांना हात घातला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत सरकारला घरचा आहेर दिला. मुख्यमंत्री शिंदे यांनी २७ तारखेला आरक्षणाची घोषणा करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर हात ठेऊन मराठ्यांना आरक्षण देण्याची शपथ घेतली व आज ती पूर्ण केली असे म्हटले. जर त्यांनी खरोखर आरक्षण दिल असेल तर मग मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला का बसतायेत? आरक्षण दिल असेल तर कोट्यवधी खर्चून सर्वेक्षण का सुरु केले आहे, असा प्रतिप्रश्न यावेळी भुजबळांनी केला. मराठ्यांना आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. वेगळे आरक्षण द्यावे. सर्वेक्षणात जात विचारून सगळी खोटी माहिती भरली जात असल्याचा घणाघात भुजबळांनी केला. सगेसोयर्यांच्या अध्यादेशावरूनही त्यांनी टीकास्त्र सोडले. आधीच कुणबी सर्टिफिकेट खोटी काढली जात आहेत. त्यात आता शपथपत्र करून सगेसोयर्यांनादेखील खोटे सर्टिफिकेट देण्यात येतील, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
मंत्री भुजबळ म्हणाले, गावातील वातावरण खराब होत आहे. ओबीसींना गावागावात त्रास देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ज्याठिकाणी ओबीसीची घरे आहेत तेथे जाऊन त्रास दिला जात आहे, काही ठिकाणचे ओबीसी गाव सोडून जात आहेत. हा अन्याय सुरु आहे. यावेळी छगन भुजबळ यांनी जातनिहाय गणना करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करावी, जेणे करून ओबीसी समाज किती आहे ते समजेल. ओबीसींच्या लोकसंख्येनुसार त्यांना त्यांचे हक्क मिळतील, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी भुजबळांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करणार्यांवरही शरसंधान साधले. ते म्हणाले, मला जे राजीनामा द्या असे जे सांगत आहेत, त्यांच्यासाठी मी सांगतो की, मी एल्गार मेळावा सुरु करण्याआधीच राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजीनामा काय मागता मी आधीच तो १६ नोव्हेंबरलाच देऊन मोकळा झालो आहे असे ते म्हणाले.
मनोज जरांगे यांच्यावरही टीकास्त्र!
मला मराठा समाजाच्या नेत्यांची, विचारवंतांची कीव येते, हा तुमचा नेता कसा? जो बजेटमधून आरक्षण देता येते का बघा असं म्हणतो, कुणी बोलायला तयार नाही. कुणाच्या मागे जाताय? गावागावात दरी पडतेय, आम्ही आमच्या हक्काची लढाई लढतोय. मराठा समाजाला त्यांचे वेगळे आरक्षण द्या आणि आमच्यातून नको असं बोलणं चूक आहे? ओबीसीतून आरक्षण घ्यायचे आणि मंडल आयोगालाच आव्हान देण्याची भाषा केली जाते. काय हुशार, दादागिरी करायची. तुम्ही सगळे एकत्रित राहा. एकावर अन्याय झाला तर सगळ्यांनी एकत्रित उभं राहिले पाहिजे, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
तर छगन भुजबळच मुख्यमंत्री होतील : जानकर
ओबीसी समाज ७२ टक्के आहे. आपल्यामध्ये एक नेता ठेवणे गरजेचे आहे. एक नेता मानून त्याच्या आदेशाने आपण चालणे गरजेचेच आहे. आपण आपली भांडणे विसरून आता एक येऊ. आपला समाज जवळपास ७२ टक्के आहे. तिकडे मुलायमसिंह, लालू प्रसाद, मायावती या मुख्यमंत्री होतात, आता आपल्याकडे छगन भुजबळ मुख्यमंत्री होऊ शकतील. कारण आपली संख्या तेवढी मोठी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले. ओबीसी समाज जर एकत्र झाला तर तुम्ही मुख्यमंत्री व्हाल व सर्व प्रश्न तुम्ही स्ाोडवाल, अशी अशा त्यांनी मंत्री भुजबळांकडे व्यक्ती केली.
रोहित पवार हा जातीयवादी चेहरा : पडळकर
अहमदनगरमधील ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलताना गोपीचंद पडळकर यांनी अनेक मुद्यांना हात घालत घणाघात केला. त्यांनी यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाचा दाखला देत ज्याच्याकडे बुद्धी, बळ, चातुर्य आहे त्यांच्याकडे सत्ता स्थापन करण्याची ताकद असते असे म्हणाले. जर सत्तेचा माज असेल तर अशा सरकारला खाली खेचण्याचा अधिकार तुम्हा आम्हाला आहे असे ते म्हणाले. त्यांनी यावेळी रोहित पवार यांच्यावर घणाघात केला. आ. रोहित पवार हे जातीयवादी चेहरा असल्याचे ते म्हणाले. रोहित पवार यांच्या अंगात रक्त नव्हे तर जातीयवाद वाहत आहे. अशा जातीयवादी माणसाचे पार्सल पुन्हा बारामतीला पाठवा. ते ओबीसींचे नसून जातीयवादी आहेत, असा घणाघात त्यांनी केला. मनोज जरांगे यांनी मंडल आयोगला चॅलेंज करणार आहे असे वक्तव्य केले होते. त्यावरही त्यांनी टीका केली. मंडल आयोगाने जे आरक्षण दिले ती म्हसोबाची खीर आहे का की आम्ही घेतली आणि घरी आणली, अगदी तावून सुलाखून प्रक्रिया होऊन नऊ न्यायाधीशांनी आम्हाला आरक्षण दिले आहे. ते कुणीही चॅलेंज करू शकणार नाही, असे पडळकर म्हणाले. मराठा समाजाला कुणबी दाखले देणे व सगेसोयरे या शब्दावरून त्यांनी सरकारवरच निशाणा साधला. आपले हक्क मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावेत व मंत्री छगन भुजबळ यांना पाठिंबा द्यावा, आपल्या हक्कांचे रक्षण करावे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
खोटी वंशावळ जोडण्याचे प्रकार सुरू!
३६० कोटी रुपये खोटे रेकॉर्ड तयार करण्यासाठी देण्यात आले का? अशी विचारणा भुजबळ यांनी केली. कुणबी जिथं म्हटलं आहे त्या अक्षरात बदल आहे, त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र देता येत नाही, असे मुख्याध्यापकचं पत्र आहे. कोणाशी लग्न केलं तरी तुम्ही आरक्षण पात्र ठरणार नाही असे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहे. खोटी वंशावळ जोडण्याचे प्रकार सुरू आहेत. तसेच झुंडशाहीने कोणी आरक्षण घेतल्यास त्याला विरोध करता येईल, असा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, तर ओबीसीला मिळणार्या सर्व सुवधिा द्या, मग ब्राह्मण, जैन आशा सर्वच समाजाला द्या अशी मागणी त्यांनी केली. ज्या दिवशी मागणी केली त्या दिवशी अधिसूचना निघते असे का? आम्हाला सांगावे लागते जे मराठा समाजाला देता ते ओबीसी समाजाला द्या. एक समिती सथापन केली त्यात मराठा नेते आहेत त्यांना सर्व सवलती दिल्या जात आहेत, असे भुजबळ म्हणाले.
ओबीसी एल्गार मेळाव्यातील उत्साह…
एकच पर्व…. ओबीसी सर्व! ❣️#OBCElgarMelava #ओबीसी_एल्गार_मेळावा_अहमदनगर #ObcReservation #ElgarMelava #OBC #Ahmadnagar pic.twitter.com/L3Oe7EVlcP— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) February 3, 2024