स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. टालेंसह तिघांवरील प्राणघातक हल्ला हा मोठा कट?
– स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा गंभीर आरोप
– सातपुते शिक्षक दाम्पत्याने अकोला येथून नातेवाईक, गुंड बोलावून पूर्वनियोजित कट रचून केला हत्येचा प्रयत्न – साखरखेर्डा पोलिसांना निवेदन
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष व शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे सहकारी डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यावर सातपुते शिक्षक दाम्पत्याने अकोला येथून नातेवाईक व गुंड बोलावून पूर्वनियोजित कट रचून प्राणघातक हल्ला केला आहे. तसेच, डॉ. टाले यांच्या हत्येचा प्रयत्न केवळ नशीब बलवत्तर म्हणून टळला आहे. या दाम्पत्याला कुण्या राजकीय पुढार्याची फूस आहे, कुणी डॉ. टालेंच्या हत्येचे षडयंत्र रचले आहे, याचा तपास करून पोलिसांनी सत्य उजेडात आणणे अपेक्षित असताना, पोलिसही दबावात असल्यासारखे वागत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किशोर गाऱोळे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी केलेला असून, या संदर्भात सविस्तर निवेदन साखरखेर्डा पोलिसांना देण्यात आलेले आहे.
पोलिसांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे, की दिनांक १ फेब्रुवारी २०२४ रोजी अंदाजे सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान गजानन सातपुते व छाया सातपुते या जिल्हा परिषदेच्या शिक्षक दाम्पत्याने एका तक्रारीच्या रागातून अकोला येथील नातेवाईकांना तसेच पैसे देऊन गुंडांना बोलावून जाणीवपूर्वक राजकीय लोकांच्या सांगण्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले व देवेंद्र आखाडे यांची हत्या करण्याच्या उद्देशाने कट रचून डोणगांव येथे देवेंद्र आखाडे यांच्या सी.एस.सी. सेंटरवर काही दस्तावेजाची माहिती घेण्यासाठी डॉ. टाले हे गेले असता तिथे सातपुते दाम्पत्याने व महिलांनी जाऊन डॉ.टाले व देवेंन्द्र आखाडे यांच्यासोबत हुज्जत घालून जाणीवपूर्वक वाद तयार केला. यावेळी अकोला येथील नातेवाईकांना व गुंडांना बोलावून पूर्वनियोजित कट रचत कोयत्याने व लोखंडी रॉडने मारहाण करत हत्या करण्याच्या उद्देशाने गंभीर स्वरूपाचा जीवघेणा हल्ला चढविला. त्यात आरोपी गजानन सातपुते, छाया सातपुते, धृवल सातपुते, रोहिणी सातपुते, निशा चव्हाण, वैष्णव सातपुते, मंगेश इंगळे अकोला येथील त्याचे साथीदार चोरीच्या प्रकरणातील कुख्यात गुन्हेगार असलेले चार ते पाचजण यांच्या मदतीने हत्येचा कट रचून हा हल्ला घडवून आणला. यामागे मोठे राजकीय षडयंत्र असून, जिल्ह्यातील काही सत्ताधारी पुढार्यांच्या सांगण्यावरून हा हत्येचा कट घडवून आणल्याचा संशय व दाट शक्यता असल्याची शंका डॉ.टाले यांनी पत्रकारांसमोर रुग्णालयात व्यक्त केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत शेतकरी नेते रविकांत तुपकर हे उभे राहणार आहेत. त्यांच्या विजयासाठी डॉ. टाले व त्यांचे सहकारी मेहकर, लोणार तालुक्यांत जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. त्यांचे वाढते काम व वलय पाहून मेहकर-लोणार मतदार संघातील परिस्थिती बदलत असून, त्यामुळे काही सत्ताधारी पुढार्यांच्या पायाखालाची वाळू सरकली आहे. टाले व त्यांच्या सहकार्यांचे काम त्यांच्या डोळ्यात खुपत असून हा रागसुध्दा मनात धरून या सातपुते दाम्पत्याला हाताशी धरून रविकांत तुपकर हे लोकसभेचे उमेदवार असून, आपल्याला मात देणार म्हणून त्यांची बदनामी करुन याला राजकीय रंग देऊन त्यांच्यासह डॉ. ज्ञानेश्वर टाले यांचा राजकीयदृष्ट्या व जिवाने संपविण्यासाठी, तसेच अडकविण्याचा डाव सातत्याने राजकीय पुढारी करत आहेत. डॉ.टाले हे रविकांत तुपकर यांचे अत्यंत जवळचे व ताकदीचे सहकारी आहेत. त्यांना अडकून त्यांचे या भागातील काम थांबवण्याचा प्रयत्न काही पुढार्यांनी केल्याचा दाट संशय आहे व हे प्रकरण देवेंन्द्र आखाडे यांच्या जागेबद्दल असून त्यामध्ये इतरांना बदनाम करुन गोवण्याचा प्रयत्न राजकीयदृष्ट्या चालू आहे. मात्र खरी परिस्थिती वेगळी आहे. याला राजकीय रंग देऊ नये. सत्तेचा एवढा गैरवापर करणे योग्य नाही, असे मत जिल्हाध्यक्ष डॉ. टाले यांनी व्यक्त केले. तसेच, या पूर्वनियोजित हल्ल्यापूर्वी या राजकीय पुढार्यांचे फोन सातपुते दाम्पत्याला व काही अधिकार्यांना गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने सुरू होते. त्यांच्या फोनचे डिटेल व सीडीआरसुद्धा पोलिसांनी तपासले पाहिजे, अशी मागणी डॉ.टाले यांनी केली आहे. जेणेकरुन सर्व सत्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाही, आणि या राजकीय पुढार्यापासून तसेच सातपुते दाम्पत्यापासून माझ्या व सहकार्यांच्या जीवाला धोका आहे. कारण आम्ही त्यांच्या कायम विरोधात शेतकर्यांचे प्रश्न सोडवत चळवळीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे काम मेहकर व लोणार मतदारसंघामध्ये उभे केले असून, यामुळे राजकीय पुढार्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे हे अतिशय खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करण्याची पद्धत करत आहेत. फार पूर्वीपासून स्थानिक राजकीय नेत्यांची ही स्टाईल असल्याचेही टाले म्हणाले. या नेत्याने याआधीसुद्धा स्वतःच्या पक्षातील काही लोकांचा घातपात केल्याचे मतदारसंघात सर्वश्रुत आहे.
बोगस शिक्षक गजानन सातपुते व छाया सातपुते यांच्याबद्दल शिक्षण विभागात तक्रार केल्याच्या रागातून व देवेंद्र आखाडे यांच्याविरोधातील राग मनात धरून आपली नोकरी जाते, असे गजानन सातपुते व छाया सातपुते या शिक्षक पती-पत्नीला कळाले आहे. त्यांना चार अपत्ये असल्यामुळे या दाम्पत्याची शिक्षण विभागाच्यावतीने चौकशी लागलेली आहे. त्या भीतीने या राजकीय पुढारी यांना घरी जाऊन ठीकठिकाणी भेटून मदत घेण्याचा संपुर्ण प्रयत्न केला. त्याबाबत आपल्याकडे पुरावेसुध्दा आहेत व त्या माध्यमातूनच काही राजकीय पुढार्यांच्या मदतीने हा हत्या करण्याचा डाव, कट काही दिवसांपासून रचण्यात आला असावा. अकोल्यातील लोकांचा डोणगाव मध्ये येऊन हल्ला करणे म्हणजे हा किती मोठा हत्त्येचा कट असू शकतो यावरून लक्षात येते. त्यामध्ये असलेल्या व्यक्ती इंगळे व त्याचे मित्र हे अज्ञात असून, त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे अकोला येथे दाखल आहेत. मात्र त्यांना पैसे (सुपारी) देऊन डोणगावमध्ये बोलून घेण्यात आले, यासाठी सर्व मदत स्थानिक राजकीय काही सत्ताधारी पुढार्यांनी केल्याची दाट शक्यता असल्याने सदर राजकीय पुढार्यांचे व सातपुते दाम्पत्याचे संपूर्ण कॉल डिटेल्स पोलिसांनी तपासले पाहिजे, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. पोलिसांनी या बाबीकडे दुर्लक्ष न करता यांचे पाळेमुळे शोधून याचा खरा सूत्रधार कोण आहे, तो शोधून काढून त्या राजकीय लोकांना सुद्धा जेलमध्ये टाकले पाहिजे. खर्याअर्थाने कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करुन बिघडवण्याचे काम कोण करत आहे व त्यांचे सूत्रधार कोण आहे, हे महत्त्वाचे असून पोलिसांनी त्या दिशेने तपास करणे गरजेचे आहे, असे स्वाभिमान शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी सांगितले. तसेच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असतांनादेखील सातपुते दाम्पत्य व त्यातील इतर आरोपींना त्यांना कुठली दुखापत नसतानासुद्धा मोकाटपणे उघड माथ्याने गावात फिरत आहेत, त्यांना पोलिसांनी तात्काळ अटक केली पाहिजे. अन्यथा यांना खुले सोडल्यास पुन्हा कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. व सदर आरोपी हे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू शकतात, असा गंभीर आरोप जिल्हाध्यक्ष टाले यांनी केला. शासकीय नोकरीवर असलेल्या या दाम्पत्याला अटक करू नये, म्हणून राजकीय पुढार्यांचा पोलिसांवर प्रचंड दबाव आहे, असे परिस्थिती पहाता असे लक्षात येत आहे. मात्र पोलिसांनी त्यांचे काम राजकीय दबावाखाली न येता कायदेशीरपणे केले पाहिजेत. भविष्यकाळात पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नयेत. शेवटी कायदा हा सर्वांसाठी सारखाच असतो, असे पोलिसांनी कृतीतून दाखवून द्यावे, असेही डॉ. टाले यांनी नमूद केलेले आहे.
——–