देऊळगावराजा/बिबी (राजेंद्र डोईफोडो/ऋषी दंदाले) – राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त देऊळगावराजा तालुक्यातील डोईफोडेवाडी व लोणार तालुक्यातील बिबी येथे दिंडी सोहळा, भंडारा व भगवानबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना ग्रामस्थांसह विविध मान्यवरांच्यावतीने अभिवादन करण्यात आले. तसेच, कीर्तनकारांची कीर्तनसेवादेखील पार पडली. यानिमित्त भगवानबाबांच्या अलौकिक कार्याला उजाळा देण्यात आला.
देऊळगावराजा तालुक्यातील डोईफोडेवाडी येथे श्री संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त गावकर्यांनी भंडारा व कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यानिमित्त फुगडी, मिरवणूक, कीर्तन व भंडार्याच्या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी लाभ घेतला. यावेळी प्रभू श्रीराम व सीतामाता यांची कु. प्रतीक्षा डोईफोडे हिने साकारलेली सुंदर अशी रांगोळी सर्वांचे आकर्षण ठरली होती. दुसरीकडे, बिबी (ता. लोणार) येथे संत श्री भगवान बाबा पुण्यतिथीनिमित्त बिबी शहरामध्ये भगवान बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून वारकरी संप्रदायाच्यावतीने पायीदिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता, आणि संध्याकाळी ८ वाजता कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी श्रीराम प्रतिष्ठान बिबी यांच्याकडून प्रसाद म्हणून शिरा वाटप करण्यात आला. या वेळी सर्व गावकरी मंडळी हजर होती. शिरा वाटप करताना श्रीराम प्रतिष्ठान बिबीचे अध्यक्ष अजय कायंदे, उपाध्यक्ष संतोष बनकर, सचिव आकाश बनकर, अभिषेक भालेराव, स्वप्नील बनकर, संकेत कुलकर्णी, कृष्णा दिनोदे, प्रदीप रामायने व सर्व सदस्य व बिबी परिसरातील सर्व भाविक भक्त हजर होते.
—————