– विविध क्षेत्रातील मान्यवरांचा साखरखेर्डा येथील पुरस्कार वितरण सोहळ्यात गौरव
– ‘ब्रेकिंग महाराष्ट्र डिजीटल’चे कार्यकारी संपादक संतोषबापू थोरहाते यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मान
बुलढाणा( संजय निकाळजे) – ज्याच्या- त्याच्या क्षेत्रामध्ये तो सर्व गुण संपन्न असतो. त्याच्या कार्याची महती खरोखरच समाजामध्ये अविस्मरणीय असते. त्याने केलेल्या चांगल्या कार्यामुळे त्याचा पुरस्कार देऊन सन्मान होणे हे क्रमप्राप्त ठरतं, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आणि आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले, तर पुरस्कार मिळाल्यामुळे त्या व्यक्तीला पुढील कार्य करण्यासाठी ताकतीने ऊर्जा मिळत असते आणि तो हिरीरीने समाज कार्य करण्यासाठी आपला सहभाग नोंदवत असतो. त्याला आणखी जोमात कार्य करण्यासाठी ऊर्जा देण्याचे काम या संस्थेने आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केले असल्याचे प्रतिपादन शेतकऱ्यांसाठी धगधगती असणारी तोफ म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त व समाजभूषण अर्जुनराव गवई यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रांमध्ये अग्रेसर राहून कामाचा ठसा उमटविणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन साखरखेर्डा येथे शनिवार, दि. ३० डिसेंबर रोजी सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपरोक्त मान्यवरांनी हे उद्गार काढले. बुद्धवाशी वच्छलाबाई कमळाजी गवई शैक्षणिक संस्था साखरखेर्डा व दै महाराष्ट्र सारथी आणि दै चौफेर दर्पण यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन अनिकेत सैनिक स्कूल साखरखेर्डा या ठिकाणी करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी जि प उपाध्यक्ष रामभाऊ जाधव हे होते. तर उद्घाटक म्हणून प्रतिभाताई अर्जुन गवई, स्वागताध्यक्ष म्हणून ललितशेठ अग्रवाल यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मंचावर सय्यद रफिक , गजानन वायाळ , सुनील जगताप, सरपंच सौ जगताप, मुख्याध्यापक देशमुख, साखरखेडा पोस्टेचे ठाणेदार नाईक, अ.भा. ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मोरे , जिल्हा सचिव संजय निकाळजे, डॉ. उबाळे, एकनाथ माळेकर यांचे सह सामाजिक, राजकीय, पत्रकारिता शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले नारीशक्ती सन्मान पुरस्कार प्राप्त महिला विजेता साळवे-पवार, एड.वर्षा कंकाळ, शिवानी गवई, प्रतिभा उबरहंडे, आशा सरकटे, शितल मोताळकर, प्रांजली जाधव यांना देण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार दैनिक निर्भीड सारथीचे मुख्य संपादक तथा ब्रेकींग महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक संतोष बापू थोरहाते, भगवान साळवे, कैलास राऊत, रवींद्र वाघ, ज्ञानेश्वर म्हस्के यांना प्रदान करण्यात आला. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार किसन पिसे, प्रा प्रशांत डोंगरदिवे, संदीप गवई, रामदास कोरडे, विकास सुखदाने, योगेश देवकर यांना तर कलाक्षेत्र पुरस्कार तेजस्विनी बंगाळे, प्रवीण डोंगरदिवे, यांना तर उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार विनोद खरात ,शेषराव भोपळे, प्रवीण गवई यांना देण्यात आला आहे, आदर्श शिक्षक पुरस्कार पुरस्कार सोमनाथ लोमटे यांना तर उत्कृष्ट प्रशासक अधिकारी म्हणून निलेश जाधव तर शैक्षणिक क्षेत्रात डॉ सीमा धोंडगे संचित ठोसरे, विकास ठोसरे ,गणेश वायाळ यांना तर संत गाडगे बाबा समाजरत्न पुरस्कार लुकमान शेख सोनाली ठाकरे, गणेश तांगडे, भानुदास साबळे, गजानन सरकटे यांना देण्यात आला आहे. याप्रसंगी प्रांजली जाधव या चिमुकलीने उत्कृष्ट असे मार्गदर्शन करून वाहवा मिळवली. यावेळी अर्जुनराव गवई यांच्या वाढदिवसानिमित्त गजेंद्र गवई यांनी शुभेच्छा पर एक गीत सादर केले. या पुरस्कार सोहळ्यासाठी आयोजक सचिन खंडारे, गणेश पंजरकर यांचे वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे संचालन गजानन ठोसरे यांनी केले.
चिमुकलीच्या भाषणासाठी डॉ. शिंगणे व रविकांत तूपकरांचा आग्रह!
या कार्यक्रमांमध्ये एका दहा वर्षाच्या चिमुकलीला नारीशक्ती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तेव्हा अनेकांना प्रश्न पडला की या चिमुकलीचे कार्य काय ? मात्र याची जेव्हा चर्चा झाली तेव्हा हा विषय डॉ शिंगणे रविकांत तुपकर यांचेपर्यंत पोहोचला आणि कळाले की ही चिमुकली चांगल्या प्रकारची वक्ता आहे. भाषण, प्रबोधन करत असते. तेव्हा लागलीच डॉ.शिंगणे व तूपकरांनी आयोजक आणि संचालन करणाऱ्यांना त्या मुलीचे भाषण ठेवा. वाटल्यास आमच्यापैकी एखाद्याचं भाषण रद्द करा, मात्र त्या मुलीला संधी द्या, आणि प्रांजली जाधव या चिमुकलीचे नाव सुचवले. तिने न घाबरता हिमतीने उपस्थित त्यांना तिच्या बोलण्याची चुणूक दाखवून दिली आणि अख्या कार्यक्रमाचा लेखाजोखा विशद करून दिला. आणि त्यानंतर बोलणारे डॉ.शिंगणे आणि रविकांत तुपकर यांनी देखील आता काय बोलावे ? असा प्रश्न पडल्यास यात वावगे ते काय?