बिबी (ऋषी दंदाले) – बालग्राम सहारा अनाथालयाच्या बालकलाकारांचा महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारा सांस्कृतिक कार्यक्रम बालाविष्कार हा बिबी शहरातील वसंतराव नाईक विद्यालय येथे दि. १ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या खेडे गावातील संतोष गर्जे या ऊसतोड कामगारांच्या मुलाने बालग्राम हे अनाथालय २००४ साली सुरू केले आहे. या अनाथालयात आज रोजी १२७ मुले आहेत. यांचा एका दिवसाचा खर्च साधारण १६ हजार रुपये इतका आहे. अतिशय बिकट परिस्थितीतून मार्ग काढत संतोष व त्यांची पत्नी सौ. प्रीती हे अनाथालय चालवत असतात. याशिवाय भान तरुणाईचे हे शिबिर सुद्धा हे घेतले जाते. या शिबिरात लोणार तालुक्यातील काही शिबिरार्थी सहभाग घेतात. या तरुणांनी एकत्र येत बालग्राम परिवार बिबी असा समूह निर्माण केला आहे. खरंतर ३१ डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस असतो आणि या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रकाराच्या पार्ट्यांचे आयोजन केलेले जाते पण बिबी येथील तरुणाईने या पार्ट्यांना फाटा देत एक आगळावेगळा उपक्रम गेल्या पाच वर्षापासून सुरू केलेला आहे. कुठेही अपव्यय खर्च न करता जो काही पार्ट्याचा खर्च आहे तो बालग्राम परिवाराला न चुकता ही तरुणाई देत आहे.
त्याचबरोबर गावामध्ये मदत फेरी आयोजित करून गावकरीदेखील मोठ्या संख्येने या समूहाला मदत करत आहेत. सालाबादाप्रमाणे याही वर्षी या समूहाने नवं वर्ष साजरे न करता त्यासाठीचा येणारा खर्च बालग्रामच्या सहारा अनाथालयाच्या कारणी लागावा व तेथील अनाथ बालकांच्या सप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून एक अनोखा नजराना हिम्मत व प्रेरणा देणारा कार्यक्रम संतोष गर्जे व प्रीती गर्जे ही माणुसकीची जिवंत रूप त्यांच्या त्यागातून, कष्टातून व मायेतून उभा राहिलेल्या सहारा अनाथालय बालग्राम येथील बालचमुने साकारलेल्या नृत्यकलेने डोळ्याचे पारणे फेडणारा बालाविष्कार या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन बिबी येथे केले आहे. या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने या अनाथ बालकांच्या व त्याचबरोबर सलग २६ तास लावणी सादर करणारे ज्यांची ऑरेंज बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे, असे शिवम इंगळे सातारकर यांच्या कलागुणांचे कौतुक करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन बिबी बालग्राम परिवाराने केले आहे.