AURANGABADBreaking newsHead linesMarathwadaWorld update

वाळूज एमआयडीसीत भीषण अग्नितांडव; सहा कामगार ठार!

छत्रपती संभाजीनगर (जिल्हा प्रतिनिधी) – येथील वाळूज एमआयडीसी परिसरातील हँडग्लोज बनवणार्‍या सनशाईन एंटरप्राईज कंपनीला काल मध्यरात्री भीषण आग लागली. आग लागली तेव्हा कंपनीतील कामगार झोपेत होते. या दुर्देवी घटनेत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून, चार कामगारांनी कसाबसा स्वतःचा जीव वाचवला आहे. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त अशोक थोरात यांचासह वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान धावून गेले होते. त्यांच्या अथक प्रयत्नांनी रात्री तब्बल चार तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. सर्व मृतदेहांची घाटी रूग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आल्यानंतर ते नातेवाईकांच्या सुपूर्त करण्यात आले. पुढील तपास एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सुरू केला आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीत अचानक आग लागली. ही आग लागल्यानंतर इमारतीतून लोक मदतीसाठी आरडाओरडा करताना दिसले होते. कंपनीत काम करणार्‍या एका कर्मचार्‍याने सांगितले की, इमारतीत सहा कर्मचारी अडकले होते. दुर्देवाने त्यांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच, सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात, अग्निशमन विभागाचे वैभव बाकडे यांनी घटनास्थली धाव घेतली. थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण १ वाजून २० मिनिटांनी कंपनीला आग लागल्याची माहिती मिळाली, अग्निशमन विभागाने धाव घेईपर्यंत कंपनीला चहूबाजूंनी आगीने वेढले होते. आग वाढेपर्यंत जवळपास १६ ते १८ कर्मचार्‍यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, चार तासानंतर आग विझविण्यात यश आले. या अग्नितांडवात मृत झालेल्यांमध्ये एका ज्येष्ठ कामगार आणि एका अठरा वर्षीय युवकाचाही समावेश आहे. अग्रिशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार मुश्ताक शेख (वय ६५), कौशर शेख (वय ३२), इक्बाल शेख (वय १८), ककनजी (वय ५५), रियाजभाई (वय ३२), मरगुम शेख (वय ३३) अशी मृतांची नावे आहेत. घाटीत दाखल केलेले मृतदेह जळीत नव्हते. काही कामगारांचा धुरात गुदमरून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.आगीतून सुखरूप बचावलेला कामगार अली अकबरने घडलेला प्रकार सांगितला. अली अकबर म्हणाला, की काम बंद करून आम्ही मध्यरात्री आम्ही झोपलो असता, आम्हाला गरमी झाल्याने जाग आली. आजूबाजूला पाहिले तर सगळीकडे आग पसरली होती. आम्ही आरडाओरड करत इतरांना जाग करण्याचा प्रयत्न केला. कंपनीतून बाहेर पडण्याच्या दरवाजाच्या बाजूने आग लागल्याने आगीतून बाहेर पडणे कठीण झाले होते. त्यानंतर दरवाजाच्या बाजूने आग लागल्यामुळे कामगारांनी वरती चढून पत्र्यावरून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. चार जण सुखरुप बाहेर पडले, तर आमच्यातील सहा जणांना आगीने कवटाळले.


सहा माणसे, एक कुत्राही आगीच्या धुरात गुदमरून ठार!

अग्निशमन दलाने ही भीषण आग विझवली, पण धूर आणि उष्णता इतक्या प्रमाणात वाढली होती की अग्निशमन दलाच्या जवानांना लगेच वर जाता आले नाही. त्यानंतर कुलिंग ऑपरेशन करण्यात आले. ते झाल्यावर जवान हे रांगत रांगत वरच्या मजल्यावर पोहोचले. जेव्हा या जवानांनी खोलीत पाहिले तेव्हा त्यांना समोर अत्यंत हृदयद्रावक असे दृश्य दिसले. त्या खोलीत सहा जण मृतावस्थेत दिसले. त्यात एक श्वानही होता. त्याचे पाय वर झालेले होते, तेव्हाच जवानांना कळाले की ते जीवंत नसतील. या फॅक्ट्रीच्या चारही बाजूने आग लागलेली होती आणि हे लोक आत पहिल्या मजल्यावर अडकलेले होते, अशी माहिती अधिकार्‍याने दिली. ही आग कशी लागली याबाबत सध्या काहीही माहिती नसल्याचेही अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!