BuldanaBULDHANAChikhaliHead linesVidharbha

महसूल प्रशासनाचा वाळूमाफियांना दणका; रात्रभर ‘सर्चऑपरेशन’, नऊ टिप्पर पकडले!

– खडकपूर्णा जलाशयासह पूर्णा नदीपात्रातील वाळूतस्करी रोखण्यासाठी ‘टास्क फोर्स’!

चिखली/बुलढाणा (कैलास आंधळे) – खडकपूर्णा जलाशयासह पूर्णा नदीपात्रातील वाळूतस्करी रोखण्यासाठी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी टास्क फोर्स निर्माण केला असून, बुलढाण्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, चिखलीचे तहसीलदार सुरेश कव्हळे यांच्यावर या टास्क फोर्समध्ये महत्वपूर्ण जबाबदारी सोपावली आहे. तसेच, परिसरातील वाळूमाफिया यांच्यासह वाळूतस्करांना मॅनेज झालेल्या स्थानिक पातळीवरील तलाठी व मंडळ अधिकारी यांनादेखील या कारवाईने मोठा झटका बसला आहे. दरम्यान, काल रात्री दीड ते पाच वाजेदरम्यान या टास्क फोर्सने चिंचखेड पॉइंटवर सर्च ऑपरेशन राबवून तब्बल नऊ टिप्पर पकडले. तर अनेक टिप्पर हे वाळू खाली करून रात्री पसार झाले. या कारवाईत बुलढाणा, चिखली, सिंदखेडराजा महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी व पोलिस सहभागी झाले होते. अशी कारवाई सातत्याने केली जाणार असून, या कारवाईने वाळूतस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे, मागील महिन्यातच महसूल प्रशासनाने खडकपूर्णा जलाशयात धडक कारवाई करून वाळूतस्करांच्या बोटी उद््ध्वस्त केल्या होत्या.

देऊळगावमही पॉइंट, चिंचखेड-सुलतानपूर पॉइंट येथून मोठ्या प्रमाणात वाळूतस्करी सुरू असल्याची माहिती बुलढाण्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी चिखलीचे तहसीलदार सुरेश कव्हळे, बुलढाणा, चिखली, सिंदखेडराजा येथील महसूल अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन देऊळगावमही, चिंचखेड, सुलतानपूर येथे रात्री अचानक छापेमारी सुरू केली. महसूल विभागाच्या या कारवाईची खबर लीक झाल्याने वाळूमाफिये सावध झाले व त्यांनी वाळूचे टिप्पर खाली करून शेजारच्या जालना जिल्हाहद्दीत आपली वाहने लपवली. तरीदेखील महसूल विभागाच्या या टास्कफोर्सने रात्रभर सर्च ऑपरेशन राबवून नऊ टिप्पर पकडले व सकाळी ते अंढेरा पोलिस ठाण्यात लावण्यात आले. वाळूतस्करांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती तहसीलदार सुरेश कव्हळे व एसडीओ जाधव यांनी दिली आहे.


काही दिवसांपूर्वीच इसरूळचे माजी सरपंच संतोष भुतेकर पाटील यांचा जिल्हाधिकार्‍यांची बदनामी करणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओचा व महसूल विभागाच्या टास्क फोर्सच्या कालच्या कारवाईचा काहीही संबंध नसला तरी, चिखली, सिंदखेडराजा, देऊळगावराजा तालुक्यात सुरू असलेली वाळूतस्करी रोखण्याचे मोठे आव्हान महसूल प्रशासनापुढे आहे. महसूल विभागातील अनेक कर्मचारी हे वाळूमाफियांना मॅनेज असल्याचा संशय असून, वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कारवाईची खबर लीक होत असल्याने वाळूतस्कर शेजारील जालना जिल्ह्यात जाऊन आपली वाहने व बोटी लपवत आहेत. तसेच, खडकपूर्णा जलाशय व पूर्णा नदीपात्रातून सर्रास वाळूतस्करी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!