लातूर (जिल्हा प्रतिनिधी) – मराठवाड्यातील प्रतिपंढरपूर म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र श्री समर्थ सद्गुरु धोंडूतात्या महाराज डोंगरशेळकी ता.उदगीर येथे मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भाविक भक्तांचा दर्शनासाठी सागर उसळला होता. सकाळी ५:३० वा उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गौरे यांच्याहस्ते सपत्नीक शासकीय महापूजा करण्यात आली, तर आरतीचे मानकरी गोपाल रेड्डी बाळापुर ता.धर्माबाद हे ठरलेत. तद्नंतर मंदीर संस्थांनच्यावतीने तहसीलदार रामेश्वर गोरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच, त्यांच्या हस्ते भक्तांना फराळाचे वाटप करण्यात आले व सर्वासाठी दर्शन खुले करण्यात आले.
दुपारी श्री समर्थ धोंडुतात्या महाराज मंदिरात भाविकांच्या भेटीला माजी राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी जिल्हा अध्यक्ष राहुल केंद्रे हे आले होते. त्यांच्यासमवेत अनिकेत कदम सहाय्यक पोलीस अधीक्षक, अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक हेही उपस्थित होते. मंदिर संस्थानच्यावतीने श्रीफळ व तात्यांची प्रतिमा व जीवन चरित्र पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंदीर पुजारी राजू महाराज, मंदीर संस्थानचे विश्वस्त व्यंकटराव मुंडे, बाबुराव घटकार पोलिस पाटील, भालचंद्र शेळके, भानुदास मुंडे, अविनाश बरुरे, मारोती मुंडे, हणमंत मुडे, हणमंत हंडरगुळे, जी.टी.मुंडे, गणेश मुंडे, तलाठी जकाते आदी मान्यवर उपस्थित होते.
भाविकांना दोन वर्षे कोरोना महामारीमुळे दर्शन घेता आले नव्हते, भाविक भक्त प्रतिपंढरपूर समजून मोठ्या श्रद्धेने धोंडूतात्या महाराजांच्या दर्शनासाठी येतात. हे भक्त केवळ मराठवाड्यातून येतात असे नाही तर सीमावर्ती कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणातील भक्त मोठ्या संख्येने येतात. देवस्थान समितीच्यावतीने येणार्या भाविक भक्तांची दर्शनासाठी, त्यांना मोफत चहा फराळाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने वाढवणा पोलिस स्टेशनच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उदगीर आगाराने भाविकांसाठी जादा बसेसची व्यवस्था केली होती. विशेष म्हणजे, वरुण राजानेही उपस्थिती लावली. गावातील विद्यालयातील विद्यार्थी यांनी सुंदर असे दिंडी रथाचे आयोजन करत विठ्ठल – रुख्मिणी मातेची वेशभूषा परिधान केली होती. तर मंदीर परिसरात खेळाचे, पेढे, नारळाचे दुकान मोठ्या संख्येने लागली होती.
Leave a Reply