बंडाच्या निर्णयाला आधार नाही, बंडखोरांना जनतेपुढे खरे कारण सांगावेच लागेल : शरद पवार
– राज्यपाल कोश्यारींनाही काढला चिमटा : इतके तत्पर राज्यपाल पहिल्यांदा पाहिले
– औरंगाबादच्या नामांतराबाबत मला माहिती दिली नाही
औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी) – बंडखोरांच्या बंडाच्या निर्णयाला काहीच आधार नाही, त्यामुळे बंडखोरांना जनते पुढे येऊन खरे कारण सांगावेच लागेल, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिवसेना बंडखोरांना फटकारले. एकनाथ शिंदे यांचे बंड एका दिवसात झालेले नाही. परंतु, बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी जी तत्परता दाखवली, अशी तत्परता दाखवणारे हे पहिलेच राज्यपाल आहेत, पहिल्यांदाच ४८ तासांत बहुमत चाचणीचा निर्णय देण्यात आला, अशा शब्दांत पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही चिमटा काढला. औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी बंडखोरांचा चांगलाच समाचार घेतला.
मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या निर्णयाबाबत सुसंवाद ठेवला नाही. नामांतर मंजूर झाल्यानंतर आम्हाला माहिती मिळाली, असेही पवार यांनी सांगून, नामांतराचा निर्णय शिवसेनेचा होता, असे सूचित केले. तसेच, संजय राऊत यांच्यावर टीका करणारे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, असा टोलाही त्यांनी बंडखोर नेते आमदार दीपक केसरकर यांना लगावला. शिवसेनेला झालेली मोठी हानी आणि सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचे काय होणार, असे प्रश्न निर्माण झाले आहेत, त्यावर पवार म्हणाले, की पुढील काळात येणार्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढवाव्यात, अशी आपली इच्छा आहे. मात्र, हे निर्णय बसून चर्चेतून घ्यावे लागतील, असेही पवारांनी नमूद केले. याप्रसंगी पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. सत्ता गेल्याने अस्वस्थता निर्माण झाली होती. आता ती अस्वस्थता कमी झाली असेल, असा टोला त्यांनी फडणवीस यांचा नामोल्लेख टाळून लगावला. यावेळी पवारांनी शिवसेना नेमकी कुणाची, याचा निर्णय उद्या कोर्टात लागेल, असे म्हणत न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे पवारांनी सांगितले.
औरंगाबाद व उस्मानाबादच्या नामांतराबाबत मला काहीच माहिती नव्हते, असे सांगून शरद पवार यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयाबाबत कानावर हात ठेवले. नामांतराचा निर्णय घेणार, हे मला माहिती नव्हते. तसा सुसंवादही साधला गेला नाही. थेट मंत्रिमंडळातून प्रस्ताव मंजूर झाल्याचे आपल्याला कळाले. नामांतराचा मुद्दा हा किमान समान कार्यक्रमाचा भाग नव्हता, असे शरद पवार म्हणाले.
————–