बुलढाणा (खास प्रतिनिधी) : सुशिक्षित बोरोजगारांच्या न्याय्य मागण्या रेटून धरत स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला १४ ऑगस्ट रोजी वंचित बहुजन युवा आघाडीने राज्य व केंद्र सरकारविरोधात एल्गार केला. हजारोंच्या संख्येने बोरोजगारांसह वंचितच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. बेरोजगारांना तातडीने न्याय न मिळाल्यास आम्ही सगळे लंगोट गुंडाळून मंत्रालयावर लंगोट मोर्चा काढू, असा खणखणीत इशारा युवा जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी यावेळी दिला.
सुशिक्षित बोरोजगारांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी आज वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चा काढण्यात आला. यावेळी जयस्तंभ चौकातील गांधी भवन येथून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चेकऱ्यानी प्रचंड घोषणा देत बुलढाणा शहर दणाणून सोडले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. एकंदर वंचित बहुजन युवा आघाडीने काढलेला एल्गार मोर्चा लक्षवेधी ठरला. यावेळी सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्ला चढावत सतीश पवार म्हणाले, केंद्र व राज्य सरकारने सुशिक्षित बेरोजगारांच्या हिताचे कुठलेही निर्णय घेतले नाहीत. सर्व जनतेला गुलामीकडे नेण्याचे मोठे षडयंत्र रचले आहे. इंग्रजांच्या नीतीवरच हे सरकार चालले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हुतात्म्यांनी बलिदान दिले. आज केंद्र व राज्य सरकारच्या जाचातून युवकांना स्वातंत्र्य मिळवून देण्याची वेळ आल्याचा घणाघात सतीश पवार यांनी केला. राजकीय नेते कमी शिकलेले असल्यामुळे त्यांना शिक्षणाचे मूल्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानणाऱ्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची हेळसांड केली जाते. एकीकडे शिवाजी महाराज शेतकऱ्यांच्या पिकांच्या देठाला जरी धक्का लावला तरी सहन करत नव्हते आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचे नेते म्हणवून घेणारे शेतीमालाला भाव देत नाही. हा षड्यंत्राचा एक भाग आहे.
बहुजनांच्या मुलांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे एकमेव माध्यम आहे. परंतु सरकार शिक्षण कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही पवार यांनी केला. टीसीएस आणि आयबीपीएस या कंपन्यांचे नोकर भरतीचे कंत्राट तत्काळ रद्द करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली. या मोर्चाची दखल न घेतल्यास मंत्रालयावर लंगोट मोर्चा काढू, असा इशाराही पवार यांनी यावेळी दिला. या मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव जिल्हा संघटक भालेराव जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे जिल्हा महासचिव अर्जुन खरात जिल्हा उपाध्यक्ष राजू भाऊ वाकोडे जिल्हा महासचिव विशाल गवळी यांच्यासह सतीश गुरसाळे सदाशिव वानखेडे राहुल दाभाडे संतोष कदम गौतम गवई राहुल वानखेडे उत्तम पैठणे समाधान डोंगरे प्रदीप वाकोडे वसंत वानखेडे न ल खंडारे दिलीप राठोड महेंद्र भाई पन्हाड कृष्णा सुरडकर राजूभाऊ तायडे समाधान पवार अनिल पारवे किरण पवार विजय पवार राजू पवार शरद सपकाळ रतन पवार यांचे सह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
तगडा बंदोबस्त
जिल्हाभरातून बेरोजगार आणि कार्यकर्ते येणार असल्याने पोलीस प्रशासन अलर्ट झाले होते. त्यानुसार पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधिकारी व कर्मचारी असा सुमारे ५० जणांचा फौजफाटा तैनात होता.
अशा आहेत मागण्या…
सुशिक्षित बेरोजगार तरुणांना विविध मंडळामार्फत रोजगार उभा करण्यासाठी तत्काळ कर्जपुरवठा द्या, कर्ज देताना सिबिलची अट रद्द करावी, शासकीय नोकरीचे आवेदनपत्र भरताना आकारण्यात येणारे शुल्क (चलान) सरसकट माफ करावे, जिल्हा परिषद शाळेवर रिक्त जागा भरण्यासाठी होत असलेली सेवानिवृत्त शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपातील कंत्राटी पद्धतीची भरती प्रक्रिया तत्काळ थांबवावी व रखडलेली पवित्र पोर्टल शिक्षक भरती करण्यात यावी, नोकर भरती करताना पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्र स्थानिक किंवा विद्यार्थ्यांच्या पसंती क्रमाप्रमाणे देण्यात यावे, पोलीस किंवा सैनिकी भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची जेवण व निवास व्यवस्था करावी, सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळेपर्यंत निर्वाह भत्ता देण्यात यावा, खासगी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय नियमानुसार किमान वेतन लागू करावे, या मागण्या यावेळी रेटून धरण्यात आल्या.