आ.गायकवाड यांच्या संकल्पनेतून पुतळ्यांचे लोकार्पण
संदीप शेळके यांच्या संकल्पनेतून सिंहगडावर गुंजले राष्ट्रगीत
पोलीस अंमलदार यांना सेवानिवृत्तीच्या पूर्वसंध्येला ध्वजारोहणाचा मान !
बुलढाणा (प्रशांत खंडारे) – आजचा स्वातंत्र्य दिन बुलढाण्यात वैविध्यपूर्ण ठरला. मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वज फडकविण्यात आला. ना.पाटील यांनी आ. संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतील साकारलेल्या कारंजा चौकात भारतमातेच्या पूर्णाकृती पुतळ्याचे तर जयस्तंभ चौकात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताच्या प्रतिकृतीचे लोकार्पण करण्यात आले. तसेच राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या संकल्पनेतून किल्ले सिंहगड येथे सामूहिक राष्ट्रगीत व शिवचरित्र व्याख्यानाने प्रबोधन करण्यात आले. शिवाय त्यांच्या वन बुलढाणा मिशनने ‘घर तिथे राष्ट्रगीत’उपक्रमांतर्गत शेगाव तालुक्यातील निराधार कुटुंबाच्या उघड्या संसारावर छत टाकून देण्यात आले. मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलीस ठाण्यात ठाणेदार बळीराम गीते यांनी सेवा निवृत्तीच्या पूर्वसंध्येला एका कर्मचाऱ्याला ध्वजारोहणाचा मान देऊन स्वातंत्र्य दिन दिमाखात साजरा केला.
मदत व पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील काही तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर आलेल्या या संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी संजय गायकवाड यांच्या सह शहर सौंदर्यकरणाच्या दृष्टिकोनातून येथील कारंजा चौकात भारत मातेच्या पूर्णाकृती पुतळ्याचे व जयस्तंभ चौकात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताच्या प्रतिकृतीचे लोकार्पण करण्यात आले.
▪ किल्ले सिंहगडावर गुंजले राष्ट्रगीत
वन बुलढाणा मिशन तर्फे किल्ले सिंहगडावर आयोजित सामूहिक राष्ट्रगीत व शिवचरित्र पर व्याख्यानाने स्वातंत्र्य दिन साजरा झाला. तर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील लासुरा येथील श्रीमती भिकाबाई राजू शिरसाट यांचा काही दिवसापूर्वी वादळामुळे संसार उघड्यावर आला होता. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. पतीचे निधन झाले. मुलगा विशाल याच्यासह त्या राहतात मजुरी करून उदरनिर्वाह चालवितात. वादळाने त्यांच्या घरावरील तीन पत्ती उडाल्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले होते. त्यामुळे वन बुलढाणा च्या सहकाऱ्यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहून तात्काळ मदत गोळा करून त्यांना हक्काची छत मिळवून दिले. दरम्यान भिकाबाई शिरसाट यांच्या घरी सामूहिक राष्ट्रगीत गाऊन स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
▪ पोलीस अंमलदार शास्त्री यांना ध्वजारोहणाचा मान
मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे ठाणेदार बळीराम गीते यांनी अभिनव संकल्पनेतून सहाय्यक फौजदार सुनील शास्त्री यांना सेवानिवृत्तीच्या पूर्वसंध्येला ध्वजारोहण करण्याचा सन्मान दिला. अलीकडे अधिकारी पुढार्यांना खुर्चीचा मोह सुटत नाही. त्यांना मानपान हवा असतो. पत्रिकेत नाव नाही,बॅनर वर फोटो नाही, अशा लहान-सान गोष्टींना घेऊन नाराज होतात. अशा परिस्थितीत सेवानिवृत्त होणाऱ्या सहाय्यक फौजदार सुनील शास्त्री यांना राष्ट्रध्वज फडकविण्याचा मान देण्यात आला आहे.