चिखली (महेंद्र हिवाळे) – एकीकडे सर्व देशभरात ‘मेरी माती मेरी शान, मेरा भारत देश महान’ अंतर्गत ‘घर घर तिरंगा’ अभियान उत्साहात राबविण्यात येत असताना, चिखली शहरातील अत्यंत जुने व मुख्य महसूल तलाठी कार्यालय म्हणजेच जुनेगांव चावडीवर स्वतंत्र दिनाच्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत ध्वजारोहणाचा कार्यक्रम न झाल्याने, जुन्या गावातील नागरिकांसह मनसे व इतर बर्याच पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित येत, ऐन वेळेवर संपूर्ण परिसर स्वच्छ करित ध्वजारोहण केले व त्यानंतर प्रशासनाचा निषेध केला.
सविस्तर असे, की ‘घर घर तिरंगा’ अभियान अंतर्गत १३,१४ व १५ ऑगस्टरोजी प्रत्येक कार्यालयावर तिरंगाध्वज फडकाविण्याचे आदेश असताना जुन्या गावातील जुने व महसूल विभागाचा जुना इतिहास असलेली ऐतिहासिक वास्तू म्हणून प्रसिध्द असलेल्या तलाठी कार्यालयावर पहिले दोन दिवस तिरंगाध्वज तर फडकवलाच नाही. परंतु, दि.१५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीदेखील ध्वजारोहण न केल्याने संतप्त जुनेगाववासी, मनसे व इतर पक्ष व संघटनाच्या प्रतिनिधींनी एकत्रित येत ध्वजारोहण केले. ऐन वेळेवर त्याठिकाणी असलेली घाण साफ करून घेऊन सदर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संतप्त जनतेनी प्रशासनाचा निषेध नोंदविला.
यावेळी मनसे, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, मनविसे जिल्हाध्यक्ष शैलेश कापसे, शहर अध्यक्ष नारायण देशमुख, मनविसे प्रसिध्दी प्रमुख प्रकाश गुळवे, मनविसे तालुकाध्यक्ष स्वप्निल असोले, शहराध्यक्ष अंकित कापसे, बाबा खान, गणेश शेटे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे दीपक गुळवे, शिवसेना नेते अनिल हिवाळे, भाजपचे युवानेते आनंद पाटील, संजय दळवी, बाबा खान यांच्यासह जुन्या गावातील ज्येष्ठ व युवामंडळी मोठ्या संख्येत उपस्थित होते. तर प्रशासनाच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आल्याचे यावेळी दिसून आले.