बुलढाणा (प्रशांत खंडारे) : कर्तव्य भावना चोखपणे बजावली की, कोणतीही सेवा असो, ती देवपूजेतील आत्मिक समाधानासारखी ठरते.अशी सेवा बजावण्यात काही खाकीधारी आहेत. यामध्ये बोराखेडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार बळीराम गीते यांना बुलढाणा जिल्ह्यात तत्पर म्हणावे लागेल. त्यांनी आज स्वातंत्र्यदिनी एका घरातून चोरी गेलेले ७०,५०० रुपयांचे सोन्या -चांदीचे दागिने परत मिळवून दिले. या चोरीप्रकरणातील चोरट्याच्या मुसक्या केवळ २४ तासात आवळून कार्यतत्परतेचा दाखला दिल्याने स्वातंत्र्यदिनी बळीराम गीते यांच्यासाठी हेच ‘सेवापदक ठरले आहे.
बुलढाणा जिल्ह्याचा पसारा प्रशासकीय दृष्टीने मोठा आहे. सरकारे बदलली की, अधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या होतात. राजकीय दबावामुळे व घोडेबाजारामुळे सक्षम- असक्षम अधिकाऱ्यांची पाहिजे तिथे बदली होऊ शकते. हप्तेखोरी करूनही त्यांना वरिष्ठांच्या सहकार्याने पदके मिळू शकतात, असे उघडपणे बोलल्या जाते. परंतु काही खाकी वर्दीतील भलेमाणूस प्रामाणिकपणे कर्तव्य पार पडत असतात. बळीराम गीते हे स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन प्रभारी पोलिस निरीक्षक असताना त्यांनी अनेक गुन्ह्यांची उकल करून अवैध धंदे नियंत्रणात आणले होते. सध्या ते मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलीस स्टेशनचा ठाणेदार म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. हे सांगायचे कारण की, त्यांनी आजही एक चोरी उघड करून आपले कर्तव्य बजावले. 23 ते 30 जुलै रोजी मोताळा तालुक्यातील पुनई येथे राहणाऱ्या नारायण सहावे यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप बनावट चाबीने उघडून दोन आरोपींनी धान्याच्या कोठीतील ७०,५०० रुपयांचे दागिने लंपास केले होते.
या चोरी प्रकरणी २ ऑगस्ट रोजी कलम ४५७,३८०,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार बळीराम गीते यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली तपासचक्र फिरवून अवघ्या २४ तासात आरोपींचा छडा लावला. शिवप्रसाद विश्वनाथ सहावे व अजय मोतीराम सुरडकर दोघे रा. पुनई मोताळा असे चोरट्यांचे नाव आहे.या चोरी प्रकरणातील हस्तगत करण्यात आलेला सोन्या-चांदीचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने ठाणेदार बळीराम गीते यांनी आज 15 ऑगस्ट रोजी फिर्यादी नारायण सहावे यांना कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुपूर्द केला आहे. चोरी गेलेले दागिने परत मिळाल्याने नारायण सहावे यांचे कुटुंब आनंदले तर बळीराम गीते यांची लाखमोलाची कर्तव्यनिष्ठा अधोरेखित झाली. हेच तर गीते यांच्यासाठी स्वातंत्र्यदिनाचे खरे सेवापदक म्हटले पाहिजे.