Breaking newsHead linesPolitical NewsPoliticsWorld update

विश्वकर्मा जयंतीपासून देशात ‘विश्वकर्मा योजने’ची अमलबजावणी!

– २०२४मध्येदेखील आपणच लालकिल्ल्यावरून तिरंगा फडकावू – मोदी
– पुढील वर्षी ते लालकिल्ल्यावरून नाही तर स्वतःच्या घरावर तिरंगा फडकावतील, काँग्रेसचा टोला

नवी दिल्ली (विशेष राजकीय प्रतिनिधी) – देशातील कारागिरांसाठी महत्वपूर्ण ठरणारी तसेच, आगामी लोकसभा निवडणुकीत ‘गेम चेंजर’ ठरू शकणारी बहुचर्चित अशी ‘विश्वकर्मा योजना’ विश्वकर्मा जयंतीदिनी अर्थात १७ सप्टेंबररोजी सुरू करण्यासह पुढील पाच वर्षांत भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनविणे, शहरात राहणार्‍या भाडेकरूंना स्वतःच्या घरांचे मालक बनविण्यासाठी बँक लोनमध्ये सवलत योजना लागू करणे, आणि देशभरात २५ हजार जनऔषधी सुरू करण्याच्या महत्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.१५) लालकिल्ल्यावरील आपल्या भाषणातून केल्यात. पंतप्रधानांच्याहस्ते लालकिल्ल्यावर तिरंगा फडकावून देशाचा ७७वा स्वातंत्र्य दिन देशाने साजरा केला. तत्पूर्वी राजघाट येथे पोहोचून पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग दहा वर्षे लालकिल्ल्यावरून तिरंगा फडकावित असून, पुढील २०२४ मध्येदेखील आपणच येथून तिरंगा फडकावून, असे त्यांनी यावेळी नीक्षून सांगितले. तर पंतप्रधान मोदींच्या भाषणातून अहंकार झळकत होता. पुढील वर्षी ते लालकिल्ल्यावरून तिरंगा फडकावू शकणार नाही, तशी संधीच देशातील जनता त्यांना देणार नाही. त्यांना आपल्या घरावरच तिरंगा फडकावा लागेल, असा टोला काँग्रेसचे अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खारगे यांनी मोदींना लगावला. अहंकारी नेता देशाला निर्माण करू शकत नाही, तो देश बरबाद करू शकतो, अशी भीतीही खारगे यांनी वर्तविली.

लालकिल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की २०४७ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करत असताना, भारत हा जगात महासत्ता हवा. महासत्तेचा तिरंगा गौरवाने फडकावयाचा असेल तर पुढील पाच वर्षे महत्वाची आहेत. पुढील पाच वर्षात भारत हा निश्चित जगातील तिसरी महत्वपूर्ण अर्थव्यवस्था बनेल. मणिपूर येथील हिंसाचारावरही यावेळी मोदींनी भाष्य केले. मणिपूरमध्ये आई-बहिणींच्या सन्मानाला धक्का लागला. अनेकांचे बळी गेले. परंतु, आता तेथे शांतता प्रस्थापित होत असून, लवकरच या भागात शांततेचा सूर्य उगवेल. आपल्या भाषणाची सुरूवातच मोदींनी १४० कोटी बंधु-भगिनी आणि माझे कुटुंबीय अशा वाक्याने केली होती.यावेळी त्यांनी विश्वकर्मा योजना सुरू करण्याची महत्वपूर्ण घोषणा केली. पुढील महिन्यात विश्वकर्मा जयंतीला ही योजना सुरू होईल. योजनेत १३-१५ हजार कोटी रूपये सरकार देणार असल्याचेही मोदींनी जाहीर केले. यावेळी त्यांनी आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीचा हिशोबही मोदींनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!