सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे स्वातंत्र्यदिनी उत्कर्ष फाउंडेशनच्यावतीने दिल्या जाणार्या पुरस्काराचे वितरण आज करण्यात आले. यावेळी पहिल्या उत्कर्ष पत्रकारिता पुरस्काराने ‘दै. देशोन्नती’चे जिल्हा प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. श्री काळे हे ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ मीडिया ग्रूपचे सल्लागार संपादकदेखील आहेत.
महाराष्ट्र शासन मंत्रालयातील गृह विभागाचे सचिव सिद्धार्थ खरात व महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या सचिव डॉ. सुवर्णाताई खरात, ही सामाजिक चळवळीने भारलेलं दांपत्य. त्यासाठीच त्यांनी स्थापन केलं, उत्कर्ष फाउंडेशन. या फाउंडेशनच्या वतीने मातृत्व सिंदखेडराजा येथे कला वाणिज्य व विज्ञान शाखांचे महाविद्यालय ४ वर्षांपूर्वी १५ ऑगस्टला सुरू करण्यात आले आहे. ३ वर्षापासून वर्धापन दिनी ते साहित्य व शिक्षण क्षेत्रातला एक-एक पुरस्कार देत असतात. यावर्षी प्रथमच त्यांनी ‘उत्कर्ष पत्रकारिता’ हा पुरस्कार सुरू केला, अन् पहिल्याच पुरस्कारासाठी त्यांनी जेष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांची निवड केली. याच पुरस्काराचे वितरण आज मंगळवार १५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता त्यांच्यासह साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी श्रीकांत देशमुख यांच्याहस्ते राजेंद्र काळे यांना सन्मानपूर्वक करण्यात आले.
यावेळी राजेंद्र काळे यांना दिलेल्या दिलेल्या मानपत्रात नमूद केले आहे की, ‘मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात आपण पत्रकारिता क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक आर्थिक प्रश्न सातत्याने आपल्या लेखणीच्या रूपाने मांडत आला आहात. आपण करीत असलेल्या पत्रकारितेतून समाजातील वंचित उपेक्षित प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम आपण करीत आहात. आपण पत्रकारिता क्षेत्रामध्ये अनेक विषयाला स्पर्श करुन निर्भिडपणे व निःपक्षपणे मांडून पत्रकारिता क्षेत्राला एक वेगळी ओळख देण्याचे कार्य केले आहे, तसेच भावी राष्ट्रनिर्माण करण्यात आपले अतुलनीय योगदान आहे. आपल्या या कार्याचा आम्ही आदर करत आहोत, आणि आपल्या कार्याचा सन्मान म्हणून उत्कर्ष फाऊंडेशन सिंदखेडराजा आपणास ‘उत्कर्ष पत्रकारिता पुरस्कार’ देऊन सन्मानित करीत आहोत.’