– आदर्श मुख्याध्यापक प्रवीण मिसाळ यांच्यासह शिक्षकांनी घेतला होता पुढाकार!
चिखली (तालुका प्रतिनिधी) – चिखली ते सुलतानपूर बससेवेचा आज (दि.१५) स्वातंत्र्यदिनाच्या मुहुर्तावर शुभारंभ करण्यात आला. ही बससेवा सुरू करण्यासाठी कै. भास्कररावजी शिंगणे हायस्कूल, मंडपगाव चिंचखेडचे आदर्श मुख्याध्यापक प्रवीण मिसाळ तसेच शिक्षक वृंद व ग्रामस्थांनी प्रयत्न केले होते. या मान्यवरांच्या मागणीची दखल घेऊन आगार व्यवस्थापक इलागे यांनी ही बससेवा सुरू करण्यास तातडीने मान्यता दिली. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थी, विद्यार्थिनींसह ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
चिखली ते सुलतानपूर बससेवा सुरू व्हावी, अशी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मागणी होती. या परिसरातील अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी दररोज जाणे-येणे करतात. त्यांच्यासाठी ही बसगाडी उपयोगाची होती. यासाठी कै. भास्करावजी शिंगणे हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रवीण मिसाळ यांच्यासह शिक्षकवर्गाने आगार व्यवस्थापक इलागे, वरिष्ठ लिपीक गाडेकर यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेऊन स्वातंत्र्यदिनाच्या शुभमुहुर्तावर अखेर ही आज बससेवा सुरू झाली. या बसचे प्रवीण मिसाळ, शिक्षक, विद्यार्थी तसेच मंडपगाव, चिंचखेड, सुलतानपूर येथील ग्रामस्थांनी आज जोरदार स्वागत केले. याप्रसंगी चालक व वाहकांचेही जोरदार स्वागत करण्यात आले.
———–