शहीद जगदीश जोहरे यांच्या स्मारकाचे झाले अनावरण
मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – तालुक्यातील मेरा बुद्रूक येथे नियमित ग्रामपंचायत करभरणा करणार्या सौ. तीर्थकन्या पडघान यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या सन्मानासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली होती. त्या ईश्वरचिठ्ठीतून सौ. पडघान यांची ग्रामपंचायतीवर राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी निवड करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापन दिन गावात विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला. तसेच, यानिमित्त माजी सैनिकांचा गौरव व शहीद जगदीश जोहरे यांच्या स्मारकाचेही मान्यवरांच्याहस्ते अनावरण करण्यात आले.
चिखली तालुक्यातील मेरा बुद्रूक हे मोठे गाव असून, लोकसंख्या १३ हजारांपेक्षा जास्त आहे. दोन वर्षापूर्वी सरपंच सौ.अनिताताई वायाळ यांनी सरपंचपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गावाच्या पाचवीला पुजलेली पाणीटंचाई आपले दीर तथा राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे नेते व ग्रामपंचायत सदस्य गजानन वायाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपवली व माजी मंत्री आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या माध्यमातून निधी मिळवून विकास कामांना गती दिली. विविध विकासकामांना निधी मिळवता येतो. परंतु काही कामे जी आहेत ती करवसुलीच्या माध्यमातून आलेल्या पैशातून करावी लागतात, त्यामुळे थकीत करवसुली हा चिंतेचा विषय झाला होता. लोकांना कर भरण्याची सवय लागली पाहिजे या उद्देशाने अतिशय मानसन्मानाचा असलेला ध्वजारोहणाचा अधिकार त्यागण्याचा निर्णय सरपंच ताईंनी आपल्या सहकार्यांसह चर्चा करुन घेतला. जे सुज्ञ नागरिक आपला कर भरणा करतील अशांमधून ईश्वरचिठ्ठी काढून तीन महिलांची निवड करण्यात येईल, त्यापैकी एका महिलेला ध्वजारोहणाचा मान देण्यात येईल, साडी देवून सन्मान करण्यात येईल, व उर्वरित दोन महिलांच्याहस्ते ध्वजपूजन करण्यात येईल, व साडी देवून सन्मान करण्यात येईल, अशी योजना आखली व याचा प्रचार सामाजिक व इतर प्रचारप्रसार माध्यमाद्वारे करण्यात आला. १४ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये ज्या ५७ लोकांनी कर भरणा केला, अशा लोकांच्या नावे लिहून चिठ्ठ्या करण्यात आल्या व लहान मुलीच्या हाताने तीन चिठ्ठ्या काढल्या. त्यामध्ये ध्वजारोहणासाठी सौ.तीर्थकन्याताई भरत पडघान व ध्वजपूजनासाठी सौ.मंदाकिनी रुस्तुम चेके व गोदावरी एकनाथ डोंगरदिवे ह्यांची निवड झाली. त्यामुळे १५ ऑगस्ट २०२३ रोजी सर्वप्रथम या तिन्ही निवड झालेल्या महिलांचा साडी-चोळी देवून सन्मान करून ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व माजी सरपंच, उपसरपंच, विद्यमान उपसरपंच, सदस्य, माजी सैनिक उपस्थित होते. याप्रसंगी माजी सैनिकांचासुध्दा सन्मान करण्यात आला. ग्रामपंचायतच्यावतीने बांधण्यात आलेले शहीद सैनिक जगदीश जोहरे यांच्या स्मारकाचे स्वातंत्र्य दिनानिमित्त अनावरण करण्यात आले, व शहीद सैनिकाच्या माता-पित्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जमलेल्या सर्व गावकर्यांच्यावतीने शहीद जगदीश जोहरे यांना मानवंदना देण्यात आली. तसेच गावातील जिल्हा परिषद शाळा, श्री.शिवाजी हायस्कूल, जिल्हा परिषद वस्ती शाळा मेरा बुद्रुक फाटा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र या ठिकाणीसुद्धा ध्वजारोहण करण्यात आले. शाळेच्यावतीने गावातून प्रभातफेरी काढून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.