Pachhim MaharashtraPolitical NewsPolitics

रविकांत तुपकरांच्या तलवारीला ‘रक्त’ लागणार? की समझोत्याची ‘शाई’?

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आक्रमक भूमिकेने राजू शेट्टी हादरले आहेत. या राजकीय भूकंपाचा केंद्र बिंदू बुलढाणा असला तरी हादरे मात्र हातकणंगले लोकसभा मतदारसंघाला बसले आहेत. या वादाबद्दल स्थानिक वर्तमानपत्रातून राजू शेट्टी यांनी सबुरीने घेण्याचा सल्ला दिला असला तरी, रविकांत तुपकर एवढ्यात तलवार म्यान करतील, असे त्यांच्या अविर्भावावरून दिसत नाही.


मी १९८० पासून शेतकरी संघटनेत काम करतोय. शरद जोशी यांची कोल्हापूर जिल्ह्यात उभारत असलेली शेतकरी संघटना राजू शेट्टी यांनी कशी फोडली हे आम्ही कार्यकर्त्यांनी डोळ्यांनी बघितले आहे. राजू शेट्टी हे अतिशय महत्वाकांक्षी व्यक्तिमत्व आहे. एकवेळ हुकूमशहा आपल्या सहकार्‍यांचे ऐकेल, पण राजू शेट्टी स्वतःच्या मनाशिवाय कोणाचेही ऐकत नाहीत. आपल्या बुडाखालच्या खुर्चीला धोका तयार होवू नये, याची अतिशय काळजी ते घेत असतात. शिवाय, ते अतिशय हलक्या कानाचे आहेत. एखाद्याने त्यांना सांगितले, की ”अमका कार्यकर्ता तुमच्या विरोधात आहे असं दिसतंय”, तर राजू शेट्टी तातडीने त्या कार्यकर्त्याचा सर्वशक्तीनिशी बंदोबस्त करतात. एक प्रकारचा सततचा संशयकल्लोळ त्यांच्या मनाला सतावत असतो. मानसशास्रात याला ‘पॅरानॉईड पर्सनालिटी डिसऑर्डर’ म्हणतात. अशा व्यक्तीला सतत कोणीतरी आपल्या विरोधात कट कारस्थान करत आहे, याची शंका येत राहते. या अवास्तव भीतीतून ती व्यक्ती आपल्याच सहकार्यांचे खच्चीकरण करायला बघते. या असुरक्षित भावनेतून शेट्टी यांनी सदाभाऊ खोत, उल्हास पाटील, रघुनाथदादा पाटील, अजित नरदे, शंकरराव अंदरघिसके, शिवाजीराव माने, विकासराव देशमुख, श्रीकांत घाटगे, पी.जी. पाटील, बी.जी. पाटील यांना संघटनेत राहणे मुश्कील केले. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात जवळपास दोनशेच्या आसपास प्रमुख कार्यकर्त्यांचे त्यांनी पूर्णपणे खच्चीकरण केले. शेट्टी आपल्या महत्वकांक्षेच्या आड येणार्‍या कोणत्याही कार्यकर्त्याचे मनसुबे निर्दयपणे छाटून काढतात. अगदी अलिकडील उदाहरण म्हणजे सावकार मादनाईक यांचे. मादनाईक यांचे शिरोळ तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बांधणीत मोठे योगदान आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तळापासून बांधणी मादनाईक यांनी केली आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांविरोधात आक्रमक आंदोलने सदाभाऊ खोत, उल्हास पाटील आणि सावकार मादनाईक यांनी केली. शेकडो पोलिस केसेस या तिघावर झाल्या. पैकी सदाभाऊ खोत आणि उल्हास पाटील यांना आमदारकी मिळाली. आता सावकार मादनाईक यांना संधी मिळावी, असे ‘स्वाभिमानी’च्या बहुसंख्य कार्यकर्त्यांची तीव्र भावना होती. पण या भावनेला वाचा फुटतय अशी शंका येताच शेट्टी यांनी नाराजी अस्र काढून कार्यकर्त्यांच्या रास्त भावना ठेचून काढल्या.
आपल्यापेक्षा वरचढ होईल, या भीतीने शेट्टी सहजासहजी कोणाचे नाव सूचवत नाहीत. सदाभाऊ खोत, उल्हास पाटील आणि देवेंद्र भुयार यांच्या बंडानंतर तर आता संघटनेतील कोणाला आमदारकी लाभेल की नाही, याची शंका आहे. सदाभाऊ खोत आणि उल्हास पाटील यांनी शेट्टीविरोधात बंड केले व ते यशस्वी झाले. शेट्टी यांच्या पाताळयंत्री आणि कटकारस्थानी स्वभावाचा, सहकार्‍यांचे पाय छाटण्याच्या वृत्तीचा सदाभाऊ खोत आणि उल्हास पाटील यांना पुरेपूर अनुभव होता. पण या दोघांनी बंड करण्यासाठी दीर्घकाळ वाट बघितली. अनुकूल वातावरण तयार होण्याची वाट बघितली आणि शेट्टी विरोधात बंड केले. ऊल्हास पाटील आमदार होण्यात यशस्वी झाले. तर सदाभाऊ खोत यांनी लोकसभा निवडणुकीत रान उठवून शेट्टी यांच्या राजकीय कारकीर्दीचा अस्त केला. तेंव्हापासून शेट्टी कमालीचे सावध झाले आहेत. गवंडी जसा एक एक वीट रचत बांधकाम करतो त्या प्रमाणे शेट्टी संघटनेवरील आपली पकड घट्ट करायला बघत आहेत. पण त्यांचे दुर्दैव असे की शेट्टी यांच्या पाताळयंत्री आणि कटकारस्थानी वृत्तीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्णपणे खिळखिळी झाली आहे. शेट्टी यांच्या धरसोड वृत्तीमुळे आणि रोज एका पक्षाशी आघाडी तर कधी अचानक एकला चलो रे ही या घोषणेमुळे सर्व सामान्य कार्यकर्ता संघटनेपासून तुटला आहे. पूर्वी साखर कारखानदारांच्या छातीवर बसण्याची भाषा करणार्‍या शेट्टींनी जिल्हा बँक निवडणुकीत दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांचे पोलिंग एजंट म्हणून काम केल्यानंतर तर शिरोळ तालुक्यातील बहुसंख्यसामान्य कार्यकर्ते संघटनेपासून पूर्णपणे बाजूला गेले आहेत. याच कारखान्याच्या वार्षिक सर्व साधारण सभेत पोलिसांनी आणि कारखाना समर्थकांनी स्वाभिमानीच्या शेकडो कार्यकर्त्यांना झोडपून काढले होते. राजू शेट्टी आता काँग्रेस पक्षाच्या हातातील बाहुले झाले आहेत. काँग्रेस पक्षातील साखर कारखानदार आपल्याला मदत करतील, एवढ्या आशेवर त्यांच्या राजकीय अपेक्षा जीवंत आहेत. पण मुळातच हातकणंगले लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाची हालत इतकी पातळ झाली आहे, की शेट्टी निवडून येण्याची कोणतीही शक्यता नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारीवर शरद पवार, अजित पवार यांची पूर्णपणे पकड आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिंदे यांची शिवसेना मिळून शेट्टी यांचा दारूण पराभव करतील हे उघड सत्य आहे.
आता आपल्या राजकीय अस्तित्वासाठी शेट्टी बुलढाणा जिल्ह्यातील संघटनेची मदत घेत आहेत. रविकांत तुपकर यांच्यामुळे हातकणंगले नंतर बुलढाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काम आहे. माझा आणि रविकांत तुपकर यांचा परिचय नसला तरी कित्येक वर्षे माध्यमांतून तुपकर यांच्या आंदोलनाच्या बातम्या ऐकायला मिळतात. पीकविमा, सोयाबीन आणि कापूस यावर सातत्याने त्यांची आंदोलने होत असतात. शिवाय, ते ओघवत्या शैलीत भाषण करतात. संघटना बांधण्यासाठी त्यांनी बुलढाणा जिल्ह्यात परिश्रम घेतले आहे. त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. नेमकी हीच बाब राजू शेट्टी यांना खुपत आहे. अलिकडील काळात माध्यमांचा मोठा प्रकाशझोत (फोकस) रविकांत तुपकर यांच्यावर पडत आहे. सोयाबीन आणि कापूस या दरातील चढ-उतारामुळे तुपकर यांनी या दोन पिकांच्या दरावर शासनाशी संघर्ष केला आहे. याउलट एफआरपी नियमित मिळत असल्याने गेल्या सात वर्षांत ऊस आंदोलन ठप्प झाले आहे. स्वतःचा दूध संघ असल्याने शेट्टी यांनी दूध उत्पादक शेतकर्‍यांनाही वार्‍यावर सोडून दिले आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आज आक्रमक आंदोलन करणारा नेता म्हणून रविकांत तुपकर यांचे नेतृत्व पुढे आले आहे.

शेट्टी तुपकर यांचे नेतृत्व छाटणार काय?

कावेबाज राजू शेट्टी हा प्रयत्न करणार. पण हे तेवढे सोपे नाही. कारण तुपकर यांनी अचूकवेळी शेट्टी यांच्यावर शरसंधान केले आहे. तोंडावर लोकसभेच्या निवडणुका आहेत. संधीसाधू शेट्टी यांना काँग्रेस व्यतिरिक्त कोणताही राजकीय पक्ष जवळ करायला तयार नाही. त्यामुळे आपली राजकीय प्रतिमा कमकुवत होवू नये म्हणून शेट्टी तुपकर यांच्याशी जुळवून ही घेतील. कुठल्यातरी प्रशांत डिक्कर या कार्यकर्त्याला हाताशी धरून शेट्टी तुपकर यांच्यावर दबाव आणत आहेत. त्यासाठी त्यांनी ठेवणीतील शिस्तपालन समितीचा जुगाड पुढे आणला आहे. त्यासमोर तुपकर यांना बोलावून घेतले जाणार आहे, असे शेट्टी यांनी वर्तमानपत्रातून सांगितले आहे. शिस्तपालन कमिटी हा एक हास्यास्पद प्रयोग शेट्टी मैदानावर लढणार्‍या कार्यकर्त्याविरोधात करत असतात. मागे सदाभाऊ खोत यांनाही शिस्तपालन समितीसमोर शेट्टी यांनी उभे केले होते. हा एक मजेशीर किस्सा आहे. सदाभाऊ यांचा जबाब नोंदल्यानंतर ही समितीच शेट्टी यांना सोडून गेली. या शिस्तपालन समितीची प्रश्नावली (आरोपपत्र) शेट्टी यांच्या सांगण्यावरून तयार केले जाते. या सगळ्या घोळात शेट्टी ७ ते ८ महिने घालवतील. आपल्या पाताळयंत्री स्वभावाचा थांगपत्ता लागू न देता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एक दिवस अचानक रविकांत तुपकर यांचा पत्ता कट करतील. अर्थात तुपकर यांना शेट्टी यांच्या कारस्थानी आणि पाताळयंत्री स्वभावाचा अंदाज आहे. पण एक आहे तुपकर यांनी शेट्टी यांना खिंडीत गाठले आहे. उद्या दोघात तह झाला तरी तो तुपकर यांच्या अटीवर होईलही. पण, झालेला तह उधळून टाकण्यात शेट्टी पटाईत आहेत, हे रविकांत तुपकर यांनी ओळखून रहावे. आपल्या सहकार्‍यांशी सूडबुद्धीने वागणारे शेट्टी कधी तुपकर यांचा राजकीय काटा काढतील, याचा नेम नाही. शेट्टी यांच्या खात्यावर जवळपास दोनशे कार्यकर्त्यांच्या बळीची नोंद आहे. इतरांची उदाहरणे थोडा वेळ बाजूला ठेवू, पण साक्षात शरद जोशी यांच्या पाठीत खंजीर खुपसताना शेट्टी यांचा हात थरथरला नाही. सुज्ञास अधिक सांगायला नको!

(दिलीप माणगावे (शिरोळ, ता. कोल्हापूर) हे शेतकरी संघटनेच्या चळवळीचे अभ्यासक असून, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे कोल्हापूर विभागाचे संपादक आहेत. गेली 45 वर्षे त्यांनी शेतकरी संघटनेच्या चळवळीत व्यतीत केले असून, ते पश्चिम महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकारदेखील आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!